पनवेल : प्रतिनिधी
महापालिका हद्दीतील गावांना पाणी वितरणासाठी व देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवण्यास गुरुवारी स्थायी सभेने मंजुरी दिल्याने या गावांना आता सुरळीत पाणीपुरवठा होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांनी दिली.
स्थायी समितीची सभा गुरुवारी (दि. 28) महापालिकेमध्ये अध्यक्ष मनोहर म्हात्रे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या सभेला सभागृह नेते परेश ठाकूर, अमर पाटील, सीताताई पाटील, वृषाली वाघमारे, प्रमिला पाटील, आरती नवघरे, तेजस कांडपिळे, गोपीनाथ भगत, विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे, हरेश केणी, मुकादम आदी उपस्थित होते.
सभेत 14 पैकी 12 विषयांना मंजुरी देण्यात आली. आजच्या सभेत पनवेल शहर वगळता इतर गावांना 107 किमीच्या परिसरात पाणी वितरणासाठी व देखभालीच्या कामासाठी मनुष्यबळ पुरवण्यासाठी तीन वर्षासाठीच्या निविदेला आज मंजुरी देण्यात आली. याशिवाय महापालिका हद्दीत आवश्यकतेनुसार विविध ठिकाणी गटार बांधण्यास आणि दुरुस्ती करण्यासाठी 2021 पर्यंत आलेल्या कमी दाराच्या निविदेला मंजुरी देण्यात आली आहे.
याशिवाय महापालिका हद्दीतील गावांमध्ये पथ दिव्यांकरिता अष्टकोनी खांब, स्ट्रीट लाईट, पॅनल, केबल इत्यादी साहित्य पुरवण्यास मान्यता
मिळाल्याने गावातील रस्ते लवकरच उजळून निघतील. याशिवाय नावडे आणि तळोजे पाचनंद येथे मच्छी मार्केट बांधण्यास मंजुरी देण्यात आली. कीटकनाशके पुरवण्यास आणि तीन प्राथमिक शाळा एकत्र बांधण्याच्या बांधकामास आणि रेल्वे स्टेशन ते राष्ट्रीय महामार्ग, सावरकर चौक ते व्ही. के. हायस्कूल ते राष्ट्रीय महामार्गपर्यंतच्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. सभेत धुरीकरण आणि फवारणी सेवा पुरवण्याचा विषय आणि महापालिकेला प्रवासी वाहने भाड्याने घेण्याच्या विषयाबाबत अधिक माहिती घेण्यासाठी त्या विषयांना स्थगिती देण्यात आली.