महिला दिनी सांभाळली पोलीस ठाण्याची धुरा
पनवेल ः वार्ताहर
पोलीस दलात महिलांचे प्रमाण जेमतेम असले तरी मंगळवारचा दिवस त्यांच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरला. 8 मार्च रोजी महिला दिनाचे औचित्य साधत पनवेल शहर पोलीस ठाण्याची धुरा महिलांनी सांभाळून प्रत्यक्ष कामकाजात भाग घेऊन सगळी कामे केली. अतिशय सक्षमपणे महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्यांनी दिवसभर पोलीस ठाणे सांभाळले. येणार्या नागरिकांच्या तक्रारींचे निरासन करण्यापासून सर्व जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. याबद्दल वरिष्ठ पोलीस निरिक्षक विजय कादबाने यांनी महिलांचे कौतुक केले.
कधी काळी चूल आणि मूल सांभाळणार्या महिला आता पुरुषांच्या बरोबरीने सर्वच क्षेत्रात काम करत आहेत. असे असले तरीही अजून काही क्षेत्रात पुरुष मंडळींची मक्तेदारी आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात महिला पोहोचल्या असल्या तरीही अनेक क्षेत्रात महिलांची संख्या नगण्य आहे. ज्या क्षेत्रात पुरुषी वर्चस्व आहे अशा ठिकाणी महिलांना प्रोत्साहन देऊन त्यांना सन्मानाची वागणूक देण्याची गरज आहे.
महासंचालक यांच्या आदेशानुसार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनी महिलांचा सन्मान म्हणून प्रत्येक ठाण्यात ठाणे अंमलदार म्हणून महिला कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पनवेल शहर पोलीस ठाण्याचा कारभार वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कादबाने यांनी पोलीस उपनिरीक्षक मोनाली चौधरी यांच्याकडे महिला दिनानिमित्ताने पनवेल शहर पोलीस ठाण्याची एक दिवसासाठी जबाबदारी देण्यात आली. यावेळी चौधरी यांनी एफआयआर नोंद करुन घेणे, गुन्ह्याची कलमे दाखल करणे, ठाण्यातील नोंद होणारा प्रत्येक गुन्हा त्यांच्या स्वाक्षरीनिशी नोंद करुन घेत त्याला कायदेशीर स्वरुप प्राप्त करुन देण्यात आले आहे.
महिला दिनी पनवेल शहर पोलीस ठाण्याचा कारभार सांभाळण्याची संधी मिळाल्याने महिला पोलिसांचे मनोबल वाढण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. मला आज काम करण्याची मिळालेली संधी म्हणजे नारी शक्तिला सलाम म्हणावा लागेल. वरिष्ठांनी घेतलेला निर्णय प्रेरणादायी आहे.
-मोनाली चौधरी, पोलीस उपनिरीक्षक, पनवेल शहर पोलीस ठाणे
RamPrahar – The Panvel Daily Paper