विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना टोला
मुंबई ः प्रतिनिधी
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या गुरुवारी (दि. 24) मविआ सरकारने केलेल्या कामांची माहिती दिली. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मात्र, मविआ सरकारने केलेल्या आश्वासनांचा मुख्यमंत्र्यांना विसर पडला असेल. पण आज अखेर त्यांचे भाषण ऐकून आनंद झाला, असा खोचक टोला लगावला.
गेल्या दोन आठवड्यांपासून सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यामध्ये तुफान कलगीतुरा रंगताना पाहायला मिळाला आहे. या पार्श्वभूमिवर अधिवेशन शेवटाकडे येत असताना आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत भाषण केले. या वेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर विं. दा. करंदीकर यांच्या कवितेतल्या ओळी ऐकवून त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरदेखील तोंडसुख घेतले.
फडणवीस म्हणाले की, आज आनंदाची गोष्ट आहे, छोटं का होईना, पण मुख्यमंत्र्यांचं भाषण या सभागृहात ऐकायला मिळालं. त्यांनी चांगलं काम करत असल्याचं सांगितलं. कदाचित ते विसरले असतील. 50 हजार रुपये हेक्टरी शेतकर्यांना द्यायचे होते वगैरे आश्वासनं होती. पण त्यांचं भाषण ऐकायला मिळालं याचा आनंद आहे. सरकार नावाची यंत्रणा किती उदास झालीये आणि लोकांबाबत काही देणंघेणंच नाहीये. केवळ टीका, आरोप, टोमणे यापलीकडे सरकारकडून काहीच होत नाहीये असं म्हणताना फडणवीसांनी ओळी वाचून दाखवल्या.
प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही?
मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील एका संदर्भाचा उल्लेख करत फडणवीसांनी टोला लगावला. आमचे मुख्यमंत्री म्हणतात, की प्रश्न विचारायला अक्कल थोडी लागते. आम्हाला माहितीच नव्हतं. आम्ही उगीच 20-22 वर्ष तारांकित-अतारांकित प्रश्न विचारत राहिलो. आधीच हे समजलं असतं, तर नसते विचारले. काहींना संसदेत संसदरत्न पुरस्कार मिळतो अधिक प्रश्न विचारल्याबद्दल. पण आज आम्हाला समजलं, प्रश्न विचारायला अक्कल लागत नाही, असं फडणवीस यावेळी म्हणाले.