भंडारा उधळत साजरा झाला सोहळा

अलिबाग ः प्रतिनिधी
ऐतिहासिक ठेवा जतन करणे हे आपले आद्यकर्तव्य आहे. तरच पुढच्या पिढीला इतिहासाची ओळख होऊ शकते. हाच उद्देश डोळ्यासमोर ठेवून अलिबागमधील सागरगड किल्ल्यावर असलेल्या तोफेसाठी मित्रो ग्रुप चिंचोटी, ग्रामस्थ मंडळ व शिवभक्त मावळे यांनी तोफगाडा घडवला आहे.
रविवारी (दि. 3) या तोफगाड्याचा लोकार्पण सोहळा किल्ले सागरगड येथे मोठ्या उत्साहात पार पडला. महाराजांना वंदन करून भंडारा उधळून लोकार्पण सोहळा झाला.
किल्ले सागरगड याला ऐतिहासिक वारसा आहे. किल्ल्यावरील ऐतिहासिक ठेवा जतन करण्यासाठी शिवभक्त हे नेहमी स्वच्छता मोहीम आखत असतात. किल्ल्यावर अडगळीत गेलेल्या तोफा शिवभक्तांनी बाहेर काढल्या आणि त्यांना पुनर्जीवित केल्या. किल्ल्यावर सध्या पाच तोफा असून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याशेजारी चार तोफा लावल्या आहेत, तर सर्वांत मोठ्या असलेल्या तोफेला गाडा तयार करण्यात आला आहे.
चिंचोटी ग्रामस्थ आणि शिवभक्त मावळ्यांनी भंडारा उधळून तोफ तोफगाड्यावर बसविली. या वेळी महाराजांची गारद देण्यात आली. यामुळे सागरगडावर शिवमय वातावरण तयार झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणेने सारा परिसर दुमदुमला होता.

RamPrahar – The Panvel Daily Paper