शेकापच्या जयंत पाटीलांकडून सुनील तटकरेंवर टीकास्त्र; फसवणुकीचा बदला घेण्याचा इशारा
धाटाव : प्रतिनिधी
आम्ही जमिनीची दलाली कधी केली नाही. ज्यांनी केली त्यांच्याकडे पैसे कुठून आले याची चौकशी लावणार असल्याचा इशारा शेकाप सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी नाव न घेता खासदार सुनील तटकरे यांना रोहा तालुक्यातील मेढा येथे दिला.
रोहा तालुक्यातील यशवंतखार येथील माजी जि. प. सदस्य नंदूशेठ म्हात्रे व रोह्याचे माजी सभापती लक्ष्मण महाले यांनी शुक्रवारी (दि. 8) राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांसह शेकापमध्ये प्रवेश केला. मेढा येथील हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमात आमदार जयंत पाटील बोलत होते. या वेळी त्यांनी खासदार सुनील तटकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली. त्यांना मोठे करण्याचे पाप मी केले, ती माझी चूक झाली. यापुढे अशी चूक होणार नाही, असा घणाघात आमदार पाटील यांनी केला.
आम्ही मंत्री व खासदार नाहीत, पण आमची वाणी काम करणारी आहे, कुणाला फसवणारी नाही. मला कार्यकर्ते म्हणाले होते तुम्हाला तुमच्या निर्णयाचा पश्चाताप होईल आणि तरीही मी आयुष्यात पहिल्यांदा निवडणुकीत फसलो. याचा बदला मी नक्की घेणार, असे आमदार जयंत पाटील यांनी या वेळी सांगितले.
राष्ट्रवादीत ज्येष्ठ निष्ठावंताना डावलले जात असल्याचा आरोप लक्ष्मण महाले यांनी केला, तर माजी आमदार धैर्यशील पाटील आणि नंदूशेठ म्हात्रे यांनीही राष्ट्रवादी व खासदार तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली.