वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची माहिती
गडचिरोली ः प्रतिनिधी
जांभूरखेडा येथे शहीद झालेल्या 16 पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना सरकारकडून 25 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे, तसेच त्यांच्या वास्तव्यास लागणार्या घरांसाठीही सरकार मदत करेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी सांगितले. शहीद जवानांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही सरकारचीच राहील, असेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.
गडचिरोलीतील कुरखेड्यापासून सहा किमी अंतरावर असलेल्या जांभूरखेडा येथे सी-60 हे पथक खासगी वाहनाने जात असताना नक्षलींनी भूसुरूंगाचा स्फोट घडवला. या स्फोटात एकूण 16 पोलीस जवान शहीद झाले. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात खासगी वाहनचालक असलेल्या तोमेश्वर सिंगनाथ यांचाही मृत्यू झाला. सिंगनाथ यांनाही शहिदाचा दर्जा देण्यासाठी सरकारी स्तरावर प्रयत्न सुरू आहेत. सिंगनाथ यांच्या परिवाराला योग्य ती मदत देऊ, असे आश्वासन पोलीस महानिरीक्षकांनी दिले, तर शहीद पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना 25 लाख रुपये रोखीने म्हणजेच बँकेत त्यांच्या नावे चेकने पैसे जमा केले जाणार आहेत, तसेच शहीद जवानांच्या कुटुंबीयांना कॅडरनुसार घरे देऊन त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही सरकार घेईल, असे मुनगंटीवर यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्रातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या चार जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात नक्षलवाद फोफावला आहे. आपल्या पोलीस दलाने उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. यापूर्वी नक्षलवादी 15 ते 20च्या गटाने फिरत होते, मात्र आता हेच नक्षलवादी 100 ते 200च्या गटाने या भागात राहतात. यापूर्वी नक्षलवादी मारण्याचा दर 4.48 होता, मात्र मागील पाच वर्षांत 98 नक्षलवादी मारले असून तो दर साधरणत: 20वर पोहचला आहे. गेल्या 39 वर्षांत 2018मध्ये एकही दुर्दैवी घटना पोलीस दलाबाबत घडली नाही, मात्र यंदा ही दुर्दैवी घटना घडल्याचे दु:ख असल्याचेही मुनगंटीवर यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper