50 पुरस्कार पटकाविणारी रायगडातील पहिली शॉर्टफिल्म
कर्जत ः प्रतिनिधी
कोलकाता येथील मानाच्या अशा ग्रेट इंडियन शॉर्ट फिल्म फेस्टिवल अवार्ड सिझनमध्ये बेस्ट चिल्ड्रेन्स फिल्म म्हणून शॉर्टफिल्म वळणला प्रथम पारितोषिक मिळाले. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील 50 पुरस्कार मिळविणारी वळण ही एकमेव शॉर्टफिल्म ठरली आहे. ’वळण’ची कथा, पटकथा व दिग्दर्शन कर्जत दहिवलीमध्ये राहणारे प्रदीप गोगटे यांचे आहे. ते गेली अनेक वर्षे उत्कर्ष प्रोडक्शनच्या माध्यमातून लहान मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी शिबिरांचे आयोजन करीत असतात. त्यांनी आपल्या शिबिरार्थींमधून बालकलाकारांची निवड करून शॉर्टफिल्मची तयारी केली. यामध्ये सिनेफोटोग्राफी हृषिकेश दांडेकर, एडिटिंग प्रथमेश जाधव, संगीत संजय पाठक, वेशभूषा अभय शिंदे, पोस्टर डिझाइन्सची जबाबदारी माधुरी गोगटे यांनी सांभाळली. प्रोडक्शन टीम म्हणून दिलीप गोगटे, बाबू सकपाळ, नितेश कोळी, तुकाराम जाधव, मोहित जाधव, शुभम कलघटकी, निचिकेत लाड यांनी काम पाहिले. वळण शॉर्टफिल्मचे चित्रण कर्जत तालुक्यातील आवळस, नेवाळी भागात करण्यात आलेले आहे. ’वळण’ मध्ये राज साळवी, ऋत्वी ओसवाल, साईराज खंडागळे, आरवी ओसवाल, स्पंदन पडते, राजवी डोंबे, स्फूर्ती पडते या बालकलाकारांसोबत पूजा बंदरकर, आरती, विशाल रोकडे, दिगंबर म्हसकर, शर्वरी जाधव, हेमंत वाघुले यांनी भूमिका साकारल्या आहेत. ’वळण’ला 21 आंतरराष्ट्रीय आणि 29 राष्ट्रीय अवॉर्ड मिळालेत तसेच प्लॅनेट मराठी शॉर्टफिल्म फेस्टिव्हलमध्ये अंतिम फेरीत निवड झाली आहे.
वळण शॉर्टफिल्मला 50 अवॉर्ड मिळणे ही गोष्ट अविस्मरणीय क्षणांपैकी एक आहे. यासाठी सर्व सहकार्यांचे चांगले मला सहकार्य लाभले. भविष्यात असेच अनेकोत्तम प्रोजेक्ट साकारण्याचा मानस आहे.
-प्रदीप गोगटे, दिग्दर्शक
RamPrahar – The Panvel Daily Paper