पुरुष संघाच्या कर्णधाराची नेरळमध्ये मिरवणूक
कर्जत ः बातमीदार
केरळमध्ये चौथ्या मास्टर गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या महिला आणि पुरुष या दोन्ही संघांनी विजेतेपद पटकाविले. यातील पुरुष संघाने सलग दुसर्यांदा विजेतेपद पटकावले असून या संघाचा कर्णधार अनिल जैन यांचे नेरळमध्ये मिरवणूक काढून स्वागत करण्यात आले. चौथी मास्टर गेम्स स्पर्धा केरळची राजधानी तिरुवनंतपुरम येथे नुकतीच झाली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातून कबड्डीचे तीन संघ सहभागी झाले होते. 40 प्लस गटात महाराष्ट्राच्या पुरुष आणि महिला संघाने अंतिम विजेतेपद मिळवून सुवर्णपदक मिळविले. यातील पुरुष संघाचे नेतृत्व रायगड जिल्ह्यातील नेरळ येथील अनिल जैन यांनी केले. मास्टर्स स्पर्धेचे विजेतेपद पटकाविणार्या महाराष्ट्र संघाचे कर्णधार अनिल जैन नेरळमध्ये आले असता ग्रामस्थ तसेच जैन सकल संघ यांनी त्यांची गावाच्या वेशीवरून मिरवणूक काढली. नेरळ बाजारपेठत बँडच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत अनेक लोक सहभागी झाले होते. त्यांनी जैन यांचे अभिनंदन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper