कळंबोलीतील उघड्या गटारांना झाकणे बसविण्याची मागणी
सभापती प्रमिला पाटील यांचे सिडकोला निवेदन
कळंबोली : रामप्रहर वृत्त
कळंबोलीमधील उघड्या गटारांना झाकण लावण्यात यावी, अशी मागणी करीत पनवेल महापालिकेच्या प्रभाग समिती ‘ब’च्या सभापती प्रमिला पाटील यांनी सिडकोच्या अभियंताकडे निवेदन दिले. कळंबोली हे सिडकोने वसविलेले शहर आहे. आता या शहरांमधील नागरी सुविधांची वानवा झालेली दिसून येत आहे. येथील रस्ते, गटारे, उद्याने तसेच आवश्यक सोयीसुविधांची दुरवस्था झालेली असून यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता आहे. म्हणूनच नागरिकांच्या समस्या सिडकोने सोडवाव्यात, यासाठी निवेदन देण्यात आले आहे. कळंबोलीमधल्या उघड्या गटारांचे झाकण लावण्यात यावे, कारण अशा धोकादायक गटारांमुळे पावसाळ्यामध्ये दुर्घटना घडू शकते व त्यास पूर्णपणे सिडको प्रशासन जबाबदार असेल. केएल 4 सेक्टर 4 ई मोरेश्वर सोसायटीचा सांडपाणीचा निचरा झाला पाहिजे. रोडवरील सेंट्रल ड्रेनेज लाईनचा चोकअप काढण्याबाबतही सिडको अभियंताकडे निवेदन देण्यात आहे, असे सभापती प्रमिला पाटील यांनी सांगितले. निवेदन देतेवेळी भाजप कळंबोली मंडल अध्यक्ष रविनाथ पाटील, सरचिटणीस दिलीप बिस्ट, प्रभाग अध्यक्ष प्रकाश शेलार, विलास किटे व मच्छींद्र कुरुंग आदी उपस्थित होते.
स्मशानभूमीत पत्रा शेड बसवावी; भाजप नेते प्रभाकर घरत यांची मागणी
खारघर : रामप्रहर वृत्त
बेलपाडा गावातील स्मशानभूमीत पत्रा शेड टाकून देण्यात यावे, अशी मागणी भाजप नेते प्रभाकर घरत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी पनवेल महापालिकेच्या संबंधित विभागाला निवेदन दिले आहे. घरत यांनी निवेदनात म्हटले की, बेलपाडा गावातील स्मशानभूमीत अग्नी संस्कारासाठी आणलेले मृतदेह ठेवण्यासाठी जो कट्टा बांधलेला आहे. त्याच्यावर पत्रा शेड टाकून देण्यात यावी. कारण पावसाळ्यात तेथे गैरसोय होते. पाऊस चालू असताना मृतदेह ठेवता येत नाहीत व त्यांच्या नातेवाइकांना खूप त्रास होतो. जर आपण तेथे पत्रा शेड टाकून दिला तर त्यांना योग्य प्रकारे सगळ्या विधी करता येतील. पत्राशेड लवकरात लवकर टाकून द्यावे.
खड्ड्यामुळे अपघातात एकाचा बळी; भाजप नगरसेवकाने घेतली दखल
खारघर : रामप्रहर वृत्त
खारघर सेक्टर 4 निफ्ट महाविद्यालयाजवळ वळणावर एका सेवानिवृत्त मेजरचा दुचाकी अपघातामध्ये मृत्यू झाला. मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव रोनाल्ड गोम्स (वय 66) असे आहे. अपघाताची दखल घेत भाजप नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांनी सिडकोकडून खड्डा झालेल्या चेंबरचे काम करून घेतले. खारघर वसाहतीतील काही सेक्टरमध्ये सिडकोकडून डांबरीकरण करण्यात आले होते; मात्र डांबरीकरण करताना मॅनहोलचा भाग तसाच सोडण्यात आला होता. सेक्टर 14 मधील रघुनाथ विहारमध्ये वास्तव्य करणारे निवृत्त मेजर रोनाल्ड गोम्स हे शुक्रवारी कामानिमित्त जात असताना निफ्ट महाविद्यालयालगत रस्त्यावर असलेल्या खड्ड्यात त्यांची दुचाकी अडकली. दुचाकी काढताना ते थेट दुभाजकाला धडकले आणि त्यांच्या मानेला गंभीर दुखापत झाली. उपचारामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, या अपघाताची दखल पनवेल महानगरपालिका प्रभाग 5चे नगरसेवक शत्रुघ्न अंबाजी काकडे यांनी घेतली. ही बाब त्यांनी सिडको अधिकार्यांना दाखवून सेक्टर 3 व 4 मधील रस्त्यांवरील टेलिफोन केबल चेंबरची उंची वाढविण्याची सूचना सिडको अधिकार्यांना देऊन वरील चेंबरचे काम करून घेतले. येत्या पाच दिवसांत सेक्टर तीन व चारमधील सर्व चेंबर हे रस्त्याच्या समपातळीत केले जाईल, असे आश्वासन या वेळी सिडको अधिकार्यांनी दिले.