Breaking News

नागोठणे एसटी बसस्थानकाचे झाले डबक्यात रूपांतर

नागोठणे : प्रतिनिधी

राज्य परिवहन महामंडळ (एसटी)च्या नागोठणे येथील स्थानकाचे यावर्षीही पावसाळ्यात डबक्यात रुपांतर झाले आहे. या स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भला मोठा खड्डा पडला आहे, तर स्थानकाच्या आवारात लहान-मोठे दगड निघाले असून ते उडून जखमी होण्याच्या भीतीने प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास  करीत आहेत. रायगड जिल्ह्यातील नागोठणे हे शहर मध्यवर्ती व महत्वाचे आहे. या ठिकाणाहून मुंबई, ठाणे, वसई, बोरीवली, रोहा, मुरुड, कर्जत, खोपोली, नाशिक, पुणे त्याचबरोबर श्रीवर्धन, चिपळूण, रत्नागिरी तसेच कोकणात जाण्यासाठी सोयीचा मार्ग जातो. या स्थानकातून दिवसभरात सुमारे 145 ते 150 स्थानिक व लांब पल्ल्याच्या एसटी बसेस ये-जा करीत असून या सर्व बसेसमधून दररोज हजारो प्रवासी नागोठणे येथून प्रवास करीत असतात. त्यामध्ये शाळा, कॉलेजचे विद्यार्थी, महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांचा समावेश मोठ्या प्रमाणात आहे. नागोठणे एसटी स्थानकाचा कारभार रोहा आगाराच्या अखत्यारित चालतो. पावसाळा नुकताच चालू झाला असला तरीही पाहिजे तसा पाऊस पडला नसतानाही नागोठणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच भला मोठा खड्डा पडला असून त्याचे रुपांतर डबक्यात झाले आहे. तेथून ये-जा करताना प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत असून समोरून बस आली तर अंगावर खड्यातील पाणी उडणार या भीतीने पादचार्‍यांची तारांबळ उडत आहे. त्याचप्रमाणे स्थानकात जागो-जागी पडलेल्या खड्ड्यांत पावसाचे पाणी साचून त्याचे रुपांतर लहान मोठ्या डबक्यात झाले आहे. त्यातून मार्ग काढीत प्रवासी एसटी बसमध्ये चढ-उतार करीत आहेत. यामध्ये महिला, लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांना जास्त त्रास सहन करावा लागत आहे.  नागोठणे एसटी स्थानकात सर्वत्र लहान-मोठे दगड-धोंडे निघाले असून ते उडून प्रवाशी जखमी झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे. नागोठणे बस स्थानकातील खड्डे लवकरात लवकर बुजवून बाहेर आलेले दगड बाजूला करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

नागोठणे बस स्थानकांतील समस्यांबाबत रायगड विभागीय कार्यालयात पत्रव्यवहार करण्यात आला असून, तेथील स्थापत्य अभियंत्याकडे संपर्क साधून या बस स्थानकातील सर्व खड्डे लवकरात लवकर भरण्यात येतील. 

 -सोनाली कांबळे, आगार व्यवस्थापक, रोहा

Check Also

पनवेलमध्ये मानवी साखळीद्वारे जोरदार निदर्शने करत बांगलादेश सरकारचा निषेध

पनवेल : रामप्रहर वृत्त बांगलादेशात हिंदूंवरील अत्याचाराविरोधात सकल हिंदू समाज रायगडच्या वतीने मंगळवारी (दि. 10) …

Leave a Reply