लोकशाही पद्धतीने काँग्रेस पक्षाध्यक्षपदी निवडून आलेल्या मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षात रुजलेली हायकमांड संस्कृती कायमची संपवावी आणि अधिक सर्वसमावेशक धोरण स्वीकारावे अशी काँग्रेस कार्यकर्त्यांची किमान अपेक्षा होती, परंतु पक्षाच्या सुकाणू समितीतील नावे पाहिली असता काँग्रेस पक्षात यापुढील काळातदेखील हायकमांडचेच वर्चस्व राहणार हेच स्पष्ट दिसते. गांधी घराण्याच्या पादुका अध्यक्ष पदाच्या खुर्चीत ठेवून काँग्रेसचा कारभार चालणार असेल तर या पक्षाला नजीकच्या काळातही काहीही भविष्य नाही असेच म्हणावे लागेल. दिवाळीच्या सुटीमध्ये लहान मुले आपापल्या घर-अंगणात किंवा सोसायटीच्या आवारात किल्ले उभे करण्यासाठी धडपडत असतात. आपापली कल्पकता वापरून ते सजवत असतात. खेळण्यातले मावळे, मोहरी आणि धने पेरून तातडीने निर्माण केलेली वनराई, पाण्याचा पाट असे बरेच नैसर्गिक वाटणारे घटक मुले हौसेने निर्माण करतात. यामुळे बालमनाला कल्पकता वापरण्याची संधी मिळते. मुलांच्या कलात्मक-बौद्धिक विकासात किल्ले तयार करण्यासारखी ही क्रिया आवश्यक असते, परंतु किल्ले उभारावेत ते बालपणीच. 138 वर्षांचे वय असलेल्या राजकीय पक्षाने असाच काहिसा प्रकार केला तर ते साधत नाही आणि शोभतही नाही. जवळपास पंचवीस वर्षांनी का होईना, देशातील सर्वांत जुना पक्ष म्हणजेच काँग्रेसने नेहरू-गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष निवडला. दिवाळीच्या पाडव्याचा मुहुर्त साधत नवनिर्वाचित अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षाची सूत्रे विधिवत हाती घेतली. खरगे हे पक्षातील जुने-जाणते अनुभवी नेते आहेत. मुख्य म्हणजे आपल्या सार्या निष्ठा त्यांनी गांधी घराण्याला कधीच्या वाहिल्या आहेत. गेल्या दशकभरात काँग्रेसची जी पडझड झाली, ती रोखण्याची आव्हानात्मक जबाबदारी खरगे यांच्यावर येऊन पडली आहे. दुसर्या शब्दांत सांगावयाचे तर जे श्रीमती सोनिया गांधी आणि त्यांचे पुत्र राहुल गांधी यांना अजिबात जमले नाही, ते खरगे यांना करून दाखवायचे आहे. पक्षाची सूत्रे हाती घेताच त्यांनी धडाडीने काही निर्णय घेतलेही आहेत. त्या निर्णयाची पार्श्वभूमी अभ्यासणे आवश्यक ठरते. कारण अवघ्या काही दिवसांवर हिमाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुका येऊन ठेपल्या असून पाठोपाठ गुजरातमध्येही निवडणुका होणार आहेत. एक प्रकारे खरगे यांच्यासाठी ही सत्वपरीक्षाच ठरणार आहे. या पार्श्वभूमीवर खरगे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर लागलीच पक्षाची कार्यकारी समिती (वर्किंग कमिटी) बरखास्त करून जी काही नवी सुकाणू समिती नेमली, त्यावर नजर टाकल्यास मनात शंका निर्माण होतात. पक्षाचे नवे अध्यक्ष शेवटी जुन्याच पद्धतीने कारभार करणार का अशी शंका येते. खरे तर, काँग्रेस पक्षाला खूप मोठी मजल मारावी लागणार आहे. उत्तर भारतातील हिंदी भाषिक पट्ट्यात काँग्रेसचे जवळजवळ उच्चाटन झाले आहे. दक्षिणेमध्ये काही प्रमाणात काँग्रेसचे अस्तित्व दिसत असले तरी निवडणुका जिंकण्याइतकी ताकद या पक्षात उरलेली नाही. ही वस्तुस्थिती आहे. गेल्या आठ वर्षांत भारतीय जनता पक्षाने काँग्रेसची अवस्था दयनीय करून टाकली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगल्भ आणि द्रष्ट्या नेतृत्वापुढे संपूर्ण काँग्रेस पक्ष निष्प्रभ झालेला दिसतो आहे. खरे तर कुठल्याच राष्ट्रीय समस्येबाबत काँग्रेसकडे ना दृष्टी उरली आहे ना उत्साह. त्यामुळे नवा अध्यक्ष निवडण्याचा काँग्रेसचा खेळ दिवाळीतील किल्ला बनवण्यासारखाच भासतो.
Check Also
‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम
दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …
RamPrahar – The Panvel Daily Paper