Breaking News

गुरेचोरांवर कारवाई करा; अन्यथा आंदोलन!

नऊगाव आगरी समाज संघटनेचे मुरूड तहसीलदारांना निवेदन

मुरूड : प्रतिनिधी

गुरे चोरून त्यांची कत्तल करणार्‍यांचा त्वरीत शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, तसेच ज्यांच्या गुरांची चोरी झाली आहे त्या शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी, अन्यथा जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा नऊगाव आगरी समाज संघटनेने मुरूड तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.  संघटनेचे अध्यक्ष तुकाराम पाटील यांनी मुरूड तहसीलदारांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नरेश वारगे, सचिव संदिप कमाने, खजिनदार आदेश भोईर, अ‍ॅड. मानसी बैकर, अ‍ॅड. दत्ता पाटील, प्रविण बैकर यांच्यासह सदस्य उपस्थित होते. मुरूड तालुक्याच्या विविध भागात गुरे चोरून त्यांची कत्तल करण्याच्या घटनेत वाढ होत आहे. तालुक्यातील पारगाण जंगलात बैल व गाईची कत्तल केल्याची तक्रार   संबंधित शेतकर्‍यांनी केली आहे. त्यावरुन तालुक्यातील गुरे चोरून त्यांच्या मांसाची विक्री करण्याचे प्रकार घडत आहेत. या घटनांमुळे हिंदू समाजात चिड निर्माण झाली असून, अशा घटना वारंवार होत राहिल्यास हिंदू समाजात असंतोष निर्माण होईल. गुरांची चोरी झाल्याबाबतची तक्रार दाखल करण्यासाठी शेतकरी मुरूड पोलीस ठाण्यात जातात. त्यावेळी ‘तुमची गुरे जंगलात चरायला का सोडता? गुरे  घरी बांधून सांभाळता येत नाही का? अशा प्रकारच्या तक्रारी केल्यास तुमच्यावर कारवाई केली जाईल, असे सांगून पोलीस शेतकर्‍यांना धाक दाखवित आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. मुरूड पोलिसांना दोन आरोपीना पकडण्यात यश आले आहे. परंतु इतर आरोपी मोकाट आहेत. त्यांना तात्काळ जेरबंद करावे, या कत्तलीमध्ये वापरण्यात आलेली साधन-सामुग्री व वाहने जप्त करावी, संबंधीतांवर गुन्हा दाखल करावा तसेच ज्या शेतकर्‍यांची गुरे चोरुन नेऊन कत्तल करण्यात आली आहे, त्यांना योग्य ती नुकसान भरपाई मिळावी, अशा मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपीचा पंधरा दिवसांत शोध न घेतल्यास नऊ गाव आगरी समाज संघटनेतर्फे जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे. रायगडचे जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक व मुरूड पोलीस ठाणे यांना या निवेदनाच्या प्रती देण्यात आल्या आहेत. 

Check Also

‌‘एसआयआर‌’संदर्भात सर्वपक्षीय शिष्टमंडळाची प्रशासनाशी चर्चा

पनवेल : रामप्रहर वृत्तभारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) अभियानाच्या …

Leave a Reply