कर्जत : प्रतिनिधी
तालुक्यातील वारे ग्रुपग्रामपंचायत हद्दीतील सर्व गावांमध्ये पथदिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र महावितरणकडून सार्वजनिक वीज वितरण करण्यासाठी आवश्यक असलेली वीजवाहिनी टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे तेथील विजेच्या खांबावरील दिवे 24 तास दिवस-रात्र सुरू असतात.
महावितरणचे कळंब उपकेंद्र कर्जत तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीत आहे. त्या उपकेंद्राची निर्मिती होत असताना वारे ग्रामपंचायतीने महावितरण आणि महाइन्फ्रा कंपनीकडे सार्वजनिक वीज वितरण करण्यासाठी विजेच्या खांबावर लावलेल्या दिव्यांसाठी स्वतंत्र वीजवाहिनी टाकून देण्याची मागणी केली होती. मात्र महावितरणकडून वारे ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही गावात तशी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासनाकडून लावण्यात आलेल्या एलईडी दिव्यांचा प्रकाश फक्त रात्रीच नाहीतर दिवसभर पडलेला असतो. विजेच्या खांबावर सर्व्हिस लाईन टाकली नसल्याने सर्व गावातील पथदिवे 24 तास कार्यरत असतात. त्याबद्दल ग्रामपंचायतीकडून सातत्याने पाठपुरावा करूनदेखील महावितरणकडून कोणत्याही स्वरूपात सहकार्य केले जात नाही.
याबाबत स्थानिक ग्रामस्थ नितीन चवरे यांच्याकडून रायगड जिल्हा परिषदकडे ऑनलाईन स्वरूपात तक्रार करण्यात आली होती. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेकडून वारे ग्रामपंचायतीकडे त्याबाबत विचारणा करण्यात आली होती. त्यावेळी सरपंच योगेश राणे यांनी महावितरणचे कर्जत येथील सहाय्यक अभियंता प्रकाश देवके यांची भेट घेवून सर्व्हिस लाईनबाबत विचारणा केली आणि लवकरात लवकर सार्वजनिक वितरण व्यवस्थेसाठी नवीन सर्व्हिस लाईन टाकण्यात यावी, असे सूचित केले आहे.
Check Also
‘लाडक्या बहिणी’ महायुतीच्या पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग 14 मध्ये झालेली विकासकामे आणि ’लाडकी बहीण’ योजनेचा …