Breaking News

अखेर माथेरानमध्ये ई-रिक्षा धावणार!

डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात होणार प्रारंभ

कर्जत : विजय मांडे
प्रसिद्ध पर्यटनस्थळ माथेरानमध्ये डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात ई-रिक्षा सुरू होणार आहे. त्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांची दमछाक दूर होईल. त्याचबरोबर हातरिक्षाची अमानवी प्रथा हद्दपार होणार आहे. ई-रिक्षेचे विद्यार्थ्यांसाठी पाच रुपये, तर माथेरानचे नागरिक व पर्यटकांसाठी 35 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे.
माथेरान हे मुंबई व पुण्याजवळील लोकप्रिय असे पर्यटनस्थळ आहे. दरवर्षी सुमारे दहा लाख पर्यटक येथे भेट देतात. परदेशी पर्यटकांनाही येथे यायला आवडते. ब्रिटिश काळापासून येथे वाहनांना बंदी आहे. त्यामुळे घोडा व माणसाने ओढणार्‍या हातरिक्षा यांचा वापर अंतर्गत वाहतुकीसाठी केला जातो. माथेरान प्रदूषणमुक्त रहावे यासाठी वाहनांना बंदी आहे, मात्र याचे दुष्परिणाम शंभर वर्षांपासून स्थानिक रहिवासी, पर्यटक सहन करीत आहेत. माथेरानचे टॅक्सी स्टॅण्ड गावापासून तीन किलोमीटर दूर असल्याने ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व महिलांची प्रचंड दमछाक होते. आता ही गैरसोय व त्रास दूर होणार आहे.
ई-रिक्षा खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली असून येत्या तीन-चार दिवसांत  सात वाहने माथेरानमध्ये दाखल होणार आहेत. ई-रिक्षेसाठी माथेरानमधील दस्तुरी नाका, शास्त्री हॉल, कर्सनदास वाचनालय व पालिका ऑफिस येथे चार्जिंग स्टेशन तयार करण्यात आली आहेत तसेच दस्तुरी नाका टॅक्सी स्टँड ते बाजारपेठ व पुढे विद्यार्थ्यांना सेंट झेवियर्स शाळेपर्यंतचा मार्ग निश्चित केला गेला आहे. ई-रिक्षाचे दरदेखील निश्चित करण्यात आले असून विद्यार्थ्यांना केवळ पाच रुपये, तर नागरिक व पर्यटकांसाठी 35 रुपये भाडे आकारण्यात येणार आहे. सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यास डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ई-रिक्षा सुरू होणार असल्याचे प्रशासक तथा मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनी सांगितले. त्यामुळे माथेरानचे पर्यटन अधिकच बहरणार आहे.

10 वर्षांनी स्वप्न होतेय साकार
या संदर्भात प्रतिक्रिया देताना माथेरानमधील श्रमिक रिक्षा संघटनचे सचिव सुनील शिंदे यांनी सांगितले की, आम्ही श्रमिक रिक्षा संघटनेच्या माध्यमातून माथेरानमध्ये ई-रिक्षा सुरू होण्यासाठी गेली दहा वर्षे प्रयत्नशील होतो. अगदी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा दिला. ते आमचे प्रयत्न यशस्वी होत आहेत. या कामी अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार व संघटनेतील इतर सहकार्‍यांनी मोलाचे सहकार्य केले. त्याचप्रमाणे मुख्याधिकारी सुरेखा भणगे यांनीही प्रामाणिकपणे पाठपुरावा करीत आहेत. म्हणून ई-रिक्षाचे स्वप्न साकार होत आहे.

Check Also

‘हिंद दी चादर’ गुरू तेग बहादूर यांचा 350वा शहिदी समागम

दोन दिवसीय भव्य कार्यक्रमासाठी खारघर सज्ज पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी …

Leave a Reply