पनवेल : रामप्रहर वृत्त
रोजगाराच्या संधी आहेत, परंतु त्यासाठी युवकांनी पुढे आले पाहिजे आणि आयुष्य यशस्वी होण्यासाठी मेहनत घेण्याची तयारी ठेवली पाहिजे, अशा सोप्या व सरळ भाषेत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी युवा पिढीला मार्गदर्शन करीत कष्टाला पर्याय नाही, असे अधोरेखित केले.
प्रकल्पग्रस्तांचे आधारवड लोकनेते दिवंगत दि.बा. पाटील यांच्या 99व्या जयंतीनिमित्त लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई विमानतळात व्यवसाय, नोकरी आणि रोजगारविषयी आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने मार्गदर्शन शिबिर उलवे नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते.
या शिबिरात प्रशिक्षणार्थींना प्रसिद्ध वक्ते रवी कुलकर्णी यांनी विमानतळ आणि रोजगार या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. तत्पूर्वी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व लोकनेते दि.बा. पाटील यांच्या अर्धाकृती पुतळ्यास पुष्पमाला अर्पण करत आभिवादन करण्यात आले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, आयुष्य कष्टातून घडत असते आणि कष्टाची तयारी असलीच पाहिजे. या विमानतळाच्या उभारणीच्या अनुषंगाने मी खासदार असतानापासून स्थानिकांना नोकर्या मिळाव्यात यासाठी सिडकोकडे सातत्याने पाठपुरावा करत आलो आहे. स्थानिकांना प्रथम प्राधान्य हा आग्रह मी कायम धरला आहे. त्यानंतर या ठिकाणी परंपरांगत राहत असलेल्या नागरिकांनाही यामध्ये संधी मिळाली पाहिजे. विमानतळाच्या अनुषंगाने रोजगार व स्वयंरोजगाराच्या लाखोंच्या संख्येने संधी उपलब्ध होणार आहेत. विमानतळाला ‘दिबा’साहेबांचे नाव मिळणारच यात शंका नाही. नाव मिळण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी आणि सर्व सहकारी सातत्याने पाठपुरावा करत आहेत, असे सांगून अशा प्रकारची मार्गदर्शन शिबिरे गावोगावी व्हावीत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना लोकनेते दि.बा. पाटीलसाहेबांच्या संघर्षातून साडेबारा टक्के भूखंडाचा निर्णय झाला. स्वतःचे रक्त सांडले व पाच जण हुतात्मे झाले, असे सांगून त्यांनी ‘दिबा’साहेब व पाच हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केले. ‘दिबा’साहेबांनी जेएनपीटी सिडको सरकारी अत्याचाराविरोधात संघर्ष केला आणि त्या संघर्षातून पनवेल, उरणचा विकास झाला. या भूमीला इतिहास आहे. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळालाच पाहिजे. ‘दिबा’साहेबांनी संघर्षाचा वारसा आपल्याला दिला आहे. ‘दिबां’चे नेतृत्व सदैव प्रेरणा देणारे आहे. चुकीच्या प्रथा बंद करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. त्या अनुषंगाने या प्रथांमध्ये आवश्यक बदल घडवणे गरजेचे आहे, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले.
विमानतळाच्या अनुषंगाने विविध प्रकारच्या नोकर्या उपलब्ध होणार आहेत, पण त्या संदर्भातील प्रशिक्षणही महत्त्वाचे आहे आणि मिळवलेली नोकरी कायम टिकवली पाहिजे यासाठी प्रशिक्षणार्थींनी लक्ष केंद्रित केले पाहिजे. विमानतळाच्या दृष्टिकोनातून मोठे परिवर्तन होणार असेही त्यांनी सांगत या शिबिराच्या आयोजनाबद्दल आमदार महेश बालदी यांचे कौतुक केले.
आमदार महेश बालदी यांनी प्रास्ताविकात म्हटले की, विमानतळाचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आणि उद्घाटनही त्यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. विमानतळ 17 एप्रिलला सुरू होणार हे सर्वांना ज्ञात आहे. या विमानतळामुळे देशाचा जीडीपी एक टक्क्याने वाढणार आहे; त्याचबरोबर रोजगार व स्वयंरोजगाराच्या लाखो संधी आहेत. यासाठी फक्त बायोडाटा देऊन चालत नाही, तर त्याचा पाठपुरावाही करावा लागतो आणि त्या अनुषंगाने शैक्षणिक पात्रतेनुसार रोजगार मिळणार आहे. विमानतळ प्राधिकरण आणि आम्ही चर्चा केली आहे. त्यानुसार नोकरभरतीत अदानी कंपनीकडे 15 ते 20 टक्के, एअर लाइन्सकडे 25 ते 30 टक्के, बॅगेज हॅन्डर व इतर 25 टक्के, दुरुस्ती, कॅटरिंग, मॅकेनिकल 20 ते 25 टक्के, तर 20 टक्के पार्किंग, हॉटेल, हाऊसकिपिंग अशा नोकर्या उपलब्ध असणार आहेत. यामध्ये पदवीधर उमेदवारांना नोकरीची मोठी संधी आहे. 27 गाव कमिटीची अदानी ग्रुपशी चर्चा झाली आहे. स्थानिकांना प्राधान्य हा आमचा कायम आग्रह आहे. ‘दिबा’साहेबांच्या नावाने होणार्या या विमानतळात स्थानिकांना नोकर्या हीच खरी त्यांना श्रद्धांजली असणार आहे, असेही त्यांनाही सांगितले. निवडणुकीत विरोधकांकडून जातीपातीचे राजकारण करण्यात आले, मात्र विरोधकांच्या पैशाच्या रेट्याने आपला कार्यकर्ता हलला नाही. विखारी प्रचार झाला, पण ईश्वरी शक्ती आणि समर्थांचा आशीर्वाद होता, असेही त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला ‘दिबा’साहेबांचे पुत्र अतुल पाटील, भाजपचे जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, ज्येष्ठ नेते वाय.टी. देशमुख, पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, खालापूर तालुका अध्यक्ष प्रवीण मोरे, जिल्हा चिटणीस रूपेश धुमाळ, चंद्रकांत घरत, मेघनाथ तांडेल, कामगार नेते जितेंद्र घरत, सुरेश पाटील, सुधीर घरत, प्रेम पाटील, विजय घरत, हेमंत ठाकूर, अंकुश ठाकूर, उत्तम कोळी, अनंता ठाकूर, वसंत पाटील, अमर म्हात्रे, वामन म्हात्रे, योगिता भगत, शैलेश भगत, निलेश खारकर यांच्यासह प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …