पनवेल : रामप्रहर वृत्त
महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेला आदर्श आपण जोपासला पाहिजे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी प्रत्येकाने अंगीकारण केल्यास जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे प्रतिपादन रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल्स सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीच्या कार्यक्रमावेळी केले.
‘रयत’च्या महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयामध्ये बुधवारी (दि.24) पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138वी जयंती उत्साहात साजरी झाली. जयंतीनिमित्त 22 सप्टेंबर पासून महाविद्यालयामध्ये कर्मवीर सप्ताहाचे आयोजन करण्यात असून यामध्ये निबंध आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. जयंती कार्यक्रम रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली आणि ‘रयत’चे माजी सहसचिव डॉ. डी. डी.पाटील यांच्या उपस्थितीत झाला.
अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या सोहळ्यात लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, रयत शिक्षण संस्था ही आमची मातृ संस्था आहे. विद्यार्थांनी गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेतले पाहिजे. जाती-पाती पलीकडे जाऊन गुणवत्ता पूर्ण शिक्षण घेतले तर आरक्षणा विना आपण चांगली प्रगती साधू शकतो. महात्मा फुले, शाहू महाराज, महात्मा गांधी, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी घालून दिलेला आदर्श आपण जोपासला पाहिजे. साधी राहणी व उच्च विचारसरणी प्रत्येकाने अंगी कारल्यास जीवनामध्ये यशस्वी होऊ शकतो, असे आवाहन केले.
प्रमुख पाहुणे डॉ. डी. डी.पाटील यांनी, स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव निर्माण होण्यासाठी कौशल्यपूर्ण शिक्षणाची जोड असणे आवश्यक आहे. स्वावलंबी शिक्षण हे कर्मवीरांचे व्रत विद्यार्थ्यानी अंगीकारणे आवश्यक आहे. महाराष्ट्राच्या जडणघडणीमध्ये कर्मवीरांचे योगदान खूप मोठे असून कर्मवीरांनी शिक्षण क्षेत्रांमध्ये अमूल्य क्रांती केली. आजच्या तरुण पिढीला कौशल्य पूर्ण विकास साधावयाचा असल्यास अमेरिका, दक्षिण कोरिया यासारख्या विकसित देशांचा आदर्श समोर ठेवावा. समतेवर आधारित समाज रचनेची परंपरा कर्मवीरांनी पुढे नेली. कर्मवीर आण्णा चौकटी बाहेरील प्रज्ञावंत होते. महाराष्ट्राच्या प्रगतीचे मूळ रयत शिक्षण संस्थेच्या शैक्षणीक कार्यात आहे, असे सांगितले.
या कार्यक्रमामध्ये उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य वाय टी देशमुख, महेंद्र घरत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेश ठाकूर, एस.के.कंगोरे, प्राचार्य डॉ. आमोद ठक्कर, उपप्राचार्य डॉ. आर.ए. पाटील, प्राध्यापक प्रवीण गायकर, डॉ. प्रफुल्ल वशेणिकर, डॉ. यशवंत उलवेकर, डॉ. लक्ष्मण गवळी, प्राध्यापक सुनिता काटकर, प्राध्यापक ललिता अवचिते यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक, विद्यार्थी आणि त्यांचे पालक उपस्थित होते.
Check Also
खारघरमध्ये गुरू तेग बहादुर यांच्या शहिदी समागमाला प्रारंभ; विविध कार्यक्रम
पनवेल : रामप्रहर वृत्तहिंदुस्थानी संस्कृती आणि मानवी मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणारे ‘हिंद दी …
RamPrahar – The Panvel Daily Paper