Breaking News

‘काला सोना’ 50 वर्ष

सत्तरच्या दशकातील पारंपरिक लोकप्रिय मसालेदार मनोरंजक चित्रपटात काही हुकमी गोष्टी पहायला मिळत. स्टॉल, अप्पर स्टॉल व बाल्कनी अशा सर्वांनाच ते मनोरंजक चित्रपट आवडत. पैसा वसूल झाला पाहिजे इतकीच अपेक्षा. जो पिक्चर टाईमपास करे तो लोकप्रिय होई.
कधी अशा मनोरंजक चित्रपटात सगळ्याच गोष्टी एकाच पिक्चरमध्ये भरलेल्या, जोडलेल्या. एकाच तिकीटावर त्या पाह्यला मिळतात याचं केवढे कौतुक.
अचानक वादळ निर्माण झाल्याने लहानपणी जत्रेत हरवलेले दोन वा तीन भाऊ. बरं ते हरवणे खलनायकाच्या कृष्णकृत्याने घडले बिघडले असेल आणि त्यात त्या खलनायकाने या दोन वा तीन भावाच्या माता पित्याचा खून केला असेल तर हेच भाऊ मोठेपणी एकत्र आल्यावर आपल्या मा बाप के खून का बदला घेतात. एकाच्या हातावर जन्म खूण अथवा लहानपणी एकत्र गायलेले गाणे. मोठेपणी हे सगळं उपय पडतं. हा खलनायक काळाबाजार करणारा, कधी लंपट, तर कधी किमती हिरे अथवा एखाद्या जुन्या काळातील मूर्ती चोरी करू पाहणाऱा असेल वा चरस गांजा यांच्या गैरव्यवहारात अडकलेला असतो. एकात एक गुंतलेला मसाला म्हणजे मसालेदार मनोरंजन चित्रपट. अधेमधे विविध प्रकारची किमान सात गाणी. पब्लिकला हे भारीच आवडायचे. पैसा वसूल मनोरंजन म्हणत. यातच पाश्चात्य देशातील चित्रपटांवर बेतलेला मसाला हिंदी चित्रपटात पेरला जाई. शम्मी कपूरने ईरमाला डूस या चित्रपटावर मनोरंजन (1974) बनवला. त्याचे हिंदीकरण इंग्रजी वळणाचे असल्याचे चित्रपट रसिकांना आवडले नाही. सजीवकुमारचा हवालदार मजेशीर होता. झीनत अमान एकदम मोकळी वावरली. तीच तिची खासियत होती. सगळाच प्रकार बेधडक. खरं तर
मूळ विदेशी चित्रपटातील थीम तेवढी घेऊन त्यावर हिंदीचा मसाला लावावा. सलिम जावेद जोडीने तेच केले आणि ‘मजबूर’ ( 1974) लिहिला. दिग्दर्शक रवि टंडन यांनी तो पडद्यावर खुलवला. पिक्चर सुपर हिट.
असाच एक मसालेदार चित्रपट, हरीश शहा व विनोद शहा निर्मित व रविकांत नगाईच दिग्दर्शित ‘काला सोना’ (मुंबई प्रदर्शित 19 सप्टेंबर 1975. पन्नास वर्षे पूर्ण). यातला नायक पाश्चात्य रंगढगाचा आणि चित्रपटांत मसाला हिंदी चित्रपटाच्या पब्लिकला आवडणारा. भन्नाट मिलावट. पहाडी भागातील पॉपी सिंग (प्रेम चोप्रा) याचे असलेले अफू, चरस, गांजा याचे अड्डे हिकमती डॅशिग नायक (फिरोज खान) आपल्या साथीदारांसह उद्ध्वस्त करतो हे या चित्रपटाचे मध्यवर्ती कथासूत्र. पटकथा रमेश पत यांची. ही गोष्ट घडताना प्रेम प्रकरण, पाठलाग, मारधाड वगैरे वगैरे आहेच. पॉपी सिंगचा प्रेम चोप्राचा एकूण लूक एकदम कडक नि प्रभावी. प्रेम चोप्राची खलनायक म्हणून कारकीर्द मोठी व वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यात हा लूक बहुचर्चित. प्रेम चोप्राची आवाजाची वा बोलण्याची शैली नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण. त्याचा स्वतःचा चाहतावर्ग निर्माण झाला हे उल्लेखनीय.
दिग्दर्शक रविकांत नगाईच हे विदेशी चित्रपट जेम्स बाँडचा मसाला हिंदी चित्रपटात पेरणी करावी यासाठी ओळखले जाणारे. कॉपी करावी तर अशी भारी असं त्यांना वाटलं असावं आणि त्यात ते अनेकदा यशस्वी झाले हे महत्त्वाचे.
सत्तरच्या दशकातील फर्ज, हिम्मत, द ट्रेन, सुरक्षा, वारदात, मेरे जीवन साथी वगैरे चित्रपट त्यांचेच. जितेंद्रला त्यांनी फिट्ट पॅन्टमध्ये त्यांनीच वाचवलं आणि मिथुन चक्रवर्तीला त्यांनीच स्टार केलं. तो गरीब निर्मात्यांचा अमिताभ बच्चन म्हणून ओळखला जाऊ लागला.एक दिग्दर्शक काय काय घडवतो.
‘शोले’च्या यशाच्या वादळात ‘काला सोना’ पडद्यावर आला. शोले आजही सुपर हिट आहे. त्याची चर्चा आजही होतेय. अर्थात तगडी स्पर्धा होती. तरी काही जमेच्या बाजू आहेत. दिग्दर्शक रविकांत नगाईच हा मूळचा यशस्वी छायाचित्रणकार अर्थात कॅमेरामन. त्यामुळे आपण आपल्या चित्रपटाचा मसाला पडद्यावर कसा खुलवणार व रंगवणार आहोत हे स्पष्ट होते आणि तेच पडदाभर खुलल़े. विशेषतः पहाडी भागातील एक वेगळेच सौंदर्य, उत्तर भारतातील हे चित्रीकरण आणि इनडोअर चित्रीकरण मुंबईतील स्टुडिओत. चित्रपटात गाणी आणि मारधाड हे दोन्ही. आऊट डोअर्स लोकेशन या चित्रपटाचे आकर्षण आहे. गीत, संगीत आणि नृत्य एकदम धमाकेदार. सुन सुन कसम से (पार्श्वगायक आशा भोसले व डॅनी डेन्झोपा.पडद्यावर हे गाणं डॅनी डेन्झोप्पा व फरिदा जलाल यांच्यावर आहे. डॅनी गायचाही), ताक थिन नाचो नशे मे (आशा भोसले व किशोरकुमार. पडद्यावर हे गाणं फिरोज खान व परवीन बाबी यांच्यावर आहे.), कोई आया आने भी दे ( आशा भोसले.पडद्यावर हे गाणं हेलनने साकारलेय)
हा चित्रपट राजेश खन्नाला घेऊन निर्माण करण्याची निर्मात्यांची योजना होती. त्यांच्याच ‘मेरे जीवन साथी’मध्ये तोच होता. राजेश खन्ना विलक्षण लोकप्रिय व बिझी असल्याचे ते दिवस. म्हणूनच त्याने आपला मित्र दिग्दर्शक नरेंद्र बेदी यांचा खोटे सिक्के (1974) नाकारला. त्यातही फिरोज खान आला. गंमत म्हणजे फिरोज खानला आपल्या धर्मात्मा (1975) या चित्रपटासाठीही राजेश खन्नाच हवा होता. राजेश खन्नाचा नकार फिरोज खानला फारच फळला. चित्रपटाच्या जगात असं होतंच असते. फिरोज खान हिंदी चित्रपटसृष्टीतील क्लिट ईस्टवूड म्हणून ओळखला जाऊ लागला. क्लिट ईस्टवूड हा हॉलीवूड स्टार. फिरोज खानचं सिक्स पॅक व्यक्तीमत्व, सेक्सी लूक, उत्तम ड्रेस सेन्स, अंगात वजनदार जॅकेट, फिट्ट जिन्स, डोक्यावर आकर्षक हॅट अर्थात टोपी. सगळंच भारी. फिरोज खान स्टायलिश अभिनेता. आशा पारेखनी आपला आवडता स्टायलिश अभिनेता म्हणून एका मुलाखतीत फिरोज खानचं नाव घेतलं. ही गोष्ट छोटी वाटते पण महत्त्वाची. एक आघाडीची अभिनेत्री छान कौतुक करतेय आणखी काय हवं? ‘काला सोना’च्या आउट डोअर्स लोकेशनवर फिरोज खान व डॅनी डेन्झोप्पा शिकारीला जात.त्यातूनच त्याना एनर्जी मिळाली असेल.तसे आवश्यक असते. हे दोघेही वेगळीच लाईफस्टाईल असणारं. अस्सल मर्द म्हणून ओळखले जाणारे.
‘काला सोना’ची नायिका म्हणून सायरा बानू पहिली पसंती. एक आकर्षक सौंदर्यासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री. काही कारणास्तव तिची निवड झाली नाही आणि परवीन बाबी आली. याच चित्रपटाच्या निर्मितीच्या काळात डनी डेन्झोप्पा व परवीन बाबी यांच्यात गुटर गुटूर सुरू होते. त्या काळात ते लिव्ह इन रिलेशनशिप राहत होते. पन्नास वर्षांपूर्वी ही कल्पनाच प्रचंड धाडसी होती. कुचाळक्या करणारी मासिके या गोष्टीला भरपूर कव्हरेज देत होती.
काला सोना चित्रपटात फिरोज खान, परवीन बाबी, डॅनी डेन्झोप्पा, फरिदा जलाल, हेलन, प्रेम चोप्रा, नरेंद्रनाथ, बिपीन गुप्ता, दुर्गा खोटे, केश्तो मुखर्जी, मा. भगवान, सीमा कपूर, आगा, राजू श्रेष्ठ,के. एन. सिंग,जयराज, इम्तियाज वगैरेंच्या भूमिका आहेत. चित्रपटाची पोस्टर्स पाहिल्यानंतर या चित्रपटात सर्व प्रकारचा मसाला एन्जॉय करायला मिळणार याची खात्री पटे.
काला सोना व फिरोज खानचा भाऊ संजय खान निर्मित, दिग्दर्शित व अभिनित चांदी सोना (1977) असे चित्रपटाच्या नावात साम्य हा एक योगायोग. दोन्हीत परवीन बाबी, डॅनी डेन्झोपा आणि रणजित हेदेखील एक विशेष. या चित्रपटात समुद्रात तळाशी असलेल्या सोना चांदीच्या खजिन्याचा शोध, तोही हिंदी चित्रपटाच्या मसालेदार मनोरंजन शैलीत. संजय खान कसदार दिग्दर्शक म्हणून ओळखला जात नव्हता, मात्र सातत्याने चित्रपट निर्मिती व दिग्दर्शन करे.
आजच्या ओटीटीच्या काळात काला सोना काय आणि चांदी सोना काय अशा मसालेदार मनोरंजन चित्रपटाचे आकर्षण ते काय? यापेक्षा भारी आणि धाडसी कन्टेन्ट ओटीटीवर पहायला मिळतोय. आजच्या काळात देश विदेशातील मनोरंजन अशी वाटणी राहिलेली नाही, पण तरीही एका चित्रपटाला अर्थात काला सोना चित्रपटांला पन्नास वर्षे पूर्ण झाली यानिमित्ताने फोकस हवाच.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

नवीन पनवेलमधील आगग्रस्त कुटुंबांना आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडून आर्थिक मदत

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्याकडून घटनास्थळी पाहणी पनवेल ः रामप्रहर वृत्तनवीन पनवेल सेक्टर 1/एस …

Leave a Reply