आमदार प्रशांत ठाकूर आणि सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्या उपस्थितीत रहिवाशांची बैठक
पनवेल : रामप्रहर वृत्त
खारघर आणि तळोजा क्षेत्रातील सिडकोनिर्मित गृहनिर्माण संकुल असलेल्या आसावरी, बागेश्री, केदार, मारवा, धनश्री व इतर गृहसंकुलांतील पदाधिकारी व रहिवाशांनी त्यांच्या विविध समस्यांच्या निवारणासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी (दि. 17) सिडकोच्या कार्यालयात सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीच्या अनुषंगाने या गृहनिर्माण सोसायट्यांचे रजिस्ट्रेशन, सुरक्षा, पाणी, स्वच्छता, वीज या समस्या सोडविण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. या बैठकीला नितीन भोईर, खांडू खटरमल, संदीप वेथेकर, नवनाथ भोजने व इतर सोसायट्यांचे पदाधिकारी उपस्थित होते.
या वेळी या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी सिडकोतर्फे एका वरिष्ठ अधिकार्याची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करून त्या अंतर्गत अभियांत्रिकी इस्टेट, पाणी व अन्य अधिकारी यांची कमिटी करून त्यांनी पंधरा दिवसाच्या आत या सर्व सोसायट्यांमध्ये जाऊन प्रत्यक्षात निरीक्षण करून सकारात्मक तोडगा काढण्यासंदर्भात तातडीने कार्यवाही करण्याची सूचना आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली. ती सूचना तातडीने मान्य करून सहव्यवस्थापकीय संचालक शांतनू गोयल यांनी कार्यवाही करण्याचे मान्य केले व संकुलातील रहिवाशांचे समस्यांचे निवारण करण्यात येईल असे आश्वासित केले. रजिस्ट्रेशनच्या बाबतीत सोसायटीने कागदपत्रांची पूर्तता केल्यास त्यावर तातडीने कार्यवाही करण्याचेही त्यांनी मान्य केले.
या फलदायी बैठकीमुळे खारघर व तळोजा परिसरातील सिडकोनिर्मित गृहसंकुलांतील रहिवाशांना मोठा दिलासा मिळाला असून त्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्यांच्या निवारणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper