पुष्पा, कांतारा, अॅनिमल, पठाण, पुष्पा 2, धुरंदर…. हातापायाने भरपूर उलटसुलट मारामारी झाली रे झाली की आधुनिक, अत्याधुनिक शस्त्रांचा भरपूर वापर, गैरवापर, त्यात व्हीएफएक्स आणि एआय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तीच मारधाड आणखी कडक. जोरदार, मारणारा आणि मार खाणारा यांची क्षमता एकदमच भारी. न थकणारी. पिक्चरचे भारी बजेट ठरवतानाच त्यात जमिनीवरील, हवेतील, कधी बोटीतील तर कधी कॅम्पुटरने जोरदार मारधाड. अगदी छावा ऐतिहासिक चित्रपट असला तरी त्यात केवढे तरी क्रौर्य आणि हिंसा खचाखच भरलेली.या सगळ्यात विशेष उल्लेखनीय गोष्ट हे सगळे चित्रपट लोकप्रिय ठरले, उत्पन्नाचे नवीन विक्रम केले. काहीचे मोठ्या शहरात खेळ वाढवावे लागले, मिडनाईट मॅटीनी शो सुरू झाले, त्यांनाही ऑनलाईन भारी बुकिंग हे खेळ पहाटेला संपतात, चोवीस तास मनोरंजन म्हणतात ते हेच. या सगळ्याच चित्रपटांची लांबी तब्बल तीन, साडेतीन तास आणि अशा लांबलचक चित्रपटात गोष्ट एवढी छोटीशी, पण सर्व प्रकारचा मनोरंजनाचा मसाला पिक्चरभर. प्रणय, नातेसंबंध, थोडं इमोशन, एखादा विनोद. गीत संगीत आणि नृत्य, जमल्यास एखाद्या सणाचे गीत नृत्य, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक दृश्ये, महागड्या गाड्या, थरारक पाठलाग दृश्ये, भलते सलते साहस, जोरदार शोरदार डायलॉगबाजी या सगळ्याचे पॅकेज म्हणजे हे पारंपरिक मसालेदार मनोरंजन चित्रपट आणि या चित्रपटांच्या तिकीट दरात वाढ. ‘धुरंधर’साठी मोठ्या शहरातील चकाचक मल्टीप्लेक्समध्ये चक्क बावीसशे रूपेरी तिकीट. ते सिनेमा पाहण्यासाठी की मल्टीप्लेक्सच्या गुलाबी चेअरवर आराम करण्यासाठी हे विचारायचे नाही. चित्रपटाच्या एका तिकीटासाठी दोन हजार दोनशे रुपये खर्च करण्याची ऐपत असलेला नवश्रीमंत व उच्चभ्रू चित्रपट रसिक आहे हे दिसून येते.
कार्पोरेट युगात चित्रपट हे सर्वसामान्य, स्वप्नाळू, आशावादी वर्गाचे माध्यम, आवड आणि व्यवसाय राहिलेला नाही हे वेगळे सांगायला नकोच. या डिजिटल पिढीला पडदाभर ढिश्यूम ढिश्यूम का बरे आवडत असावी? व्हिडीओ गेम, कॅम्पुटर गेम यामुळेच पिक्चरभर साहसी दृष्ये आवडत असावी असे वाटते तरी आणि या प्रचंड साहसी दृष्यासह येणारा प्रचंड रक्तस्त्राव, रक्तपात पाहण्यासाठी नजर तयार झाली आहे असे दिसतेय. चित्रपटाच्या जगात यश म्हणजेच सबकुछ आहे. त्यामुळे सुपरहिट ठरलेल्या चित्रपटातील फॉर्म्युला वापरणं हे तर ठरलेले. असाच भरपूर हिंसाचार खचाखच भरलेल्या चित्रपटात दिग्दर्शकाला काम ते किती? स्टंट दिग्दर्शक आणि त्याची बळकट शरीरयष्टी असणारी टोळीच हे सगळे घडवते.
कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अॅण्ड व्हाईट चित्रपटाच्या काळात आणि अगदी चित्रपट रंग घेऊन येऊ लागला तरी ’पिक्चरच्या अगदी शेवटी’ ढिश्यूम ढिश्यूम फायटिंग होऊन पोलिसांची एन्ट्री होऊन व्हीलनला अटक होई नि हीरो आपल्या ओठाला लागलेले रक्त पुसल्यावर पडद्यावर ’द एन्ड’ येई, अशा परंपरेला धक्का बसला आणि गब्बरसिंगची पोस्टरपासून पडद्यापर्यंतची दहशत पब्लिकला आवडली. रमेश सिप्पी दिग्दर्शित ’शोले’ने मुंबईत मिनर्व्हा थेटरात चक्क पाच वर्ष हाऊसफुल्ल मुक्काम करावा हे आश्चर्याचं होतं आणि आता संदीपा रेड्डी वांगा दिग्दर्शित ’निमल’च्या रणविजयच्या अतिशय क्रूरतेला रसिकांची तुफान लोकप्रियता मिळाली यातही तसाच धक्का होता. आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंदर’ ही असाच गाजतोय आणि त्याचा असाच हिंसक पुढचा भाग मार्चमध्ये प्रदर्शित होतोय. रूपेरी पडद्यावरील हिंसेचे समर्थन अशीच ही वेगळीच परंपरा. आज कॅमेरातंत्र आणि मंत्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रगत झाले आहे आणि संकलनही तांत्रिक प्रगतीने प्रभावी ठरत आहे. हे हिंसाचारी दृश्याना पूरक ठरलेय.
’शोले’ ( 1975)च्या वेळी मला आठवतंय तात्कालिक समीक्षकांनी त्यात ’प्रचंड हिंसा आहे’ अशी शेरेबाजी केली तरी ’पब्लिकच्या मनात काही वेगळेच होते.’ त्यांनी पिक्चर असा काही डोक्यात आणि डोक्यावर घेतला की रसिकांची पिढी बदलत राहिली तरी पन्नास वर्षांनंतरही ’शोले’ चर्चेत आहे. त्याने पेरले ते फारच वा नको तेवढे उगवतेय. फरक इतकाच कालांतराने गब्बरसिंगचे आकर्षण वाटू लागले. हा डाकूपट सूडकथाच. हिंसेने खचाखच भरलेली. आता तर मूळ शेवटासह (क्लायमॅक्स), काही तेव्हा कापलेल्या दृश्यांना भरती करीत आला आहे.
’शोले’पूर्वीही चित्रपटात कमी अधिक प्रमाणात हिंसा दिसली. फूल और पत्थर, यकिन, आमने सामने, आदमी और इन्सान, मेरा गांव मेरा देश, प्राण जाये पर वचन न जाये, धडकन, जंजीर, हीरा, धर्मा , दीवार, धर्मात्मा अशी अनेक उदाहरणे आहेत. ’शोले’ने अॅक्शनला एक प्रकारे प्रतिष्ठा दिली. चित्रपटासाठी स्वतंत्र अॅक्शन दिग्दर्शक असणे आवश्यक ठरु लागले. लूटूपुटीच्या मारामारीची जागा शस्त्रसज्ज क्शनने घेतली. दिलीपकुमारनेही ’विधाता’मध्ये अॅन्ग्री ओल्ड मॅन साकारला. देव आनंदही ’लूटमार सारखा मारधाड चित्रपट दिग्दर्शित करू लागला. हे आपल्या मूळ प्रकृती आणि प्रतिमेपासून खूपच बदलले. ती त्यांची बदलत्या काळाची गरज ठरली. त्यांच्या चाहत्यांना हे न रुचणारे, पण त्यांनी स्वीकारलेले आणि पडद्यावर साकारलेले. विजय आनंद दिग्दर्शित ‘जॉनी मेरा नाम’ (1970)मध्ये देव आनंद पिस्तूल घेऊन छान रमला. प्रेक्षकांनी रूपेरी पडद्यावरील हिंसा का आवडते याला उत्तर नाही. आणि आता तर फारच आवडतेय. आजूबाजूच्या वातावरणाचा परिणाम असावा का हा? आज लहान सहान कारणांवरून भांडणं होताहेत, माणसाचा संयम सुटतोय. तो समोरच्यावर हात उगारतोय आणि हेच एक कारण आज पडद्याभरची मारधाड आवडणारे असावे का?
’मेरी आवाज सुनो’मध्येही अतिशय दाहकता होती. नायकाला (जितेंद्र) खुर्चीला घट्ट बांधले असून त्याच्या डोळ्यासमोर त्याच्या पत्नीवर (हेमा मालिनी) खलनायक (कादर खान) अतिशय क्रूरपणे जबरदस्ती करतो. या हिंसेवर प्रचंड टीका झाल्याने सेन्सॉर हे दृश्य कापणार, इतकेच नव्हे तर या चित्रपटावरच बंदी येणार अशी ’ब्रेकिंग न्यूज’ पसरल्यावर अनेक शहरांत या चित्रपटाचे शोज वाढले. ते हाऊसफुल्ल झाले. पुन्हा तोच प्रश्न, सामूहिक गर्दीने पडद्यावरील हिंसा अतिशय आवडीने पाहण्याच्या मानसिकतेला काय म्हणायचे? नव्वदच्या दशकात ’नायक नहीं खलनायक हू मै’ असा एक फंडा आला. हा ’खलनायक’ क्रूरच. हिसक मनोवृत्तीच्या. संयम नसलेला. ‘हारकर भी जितनेवालों को बाजीगर कहते है’ हीदेखील हिंसक मनोवृत्तीच. हा ’बाजीगर’ आपल्या पित्यावरील अन्यायाचा बदला म्हणून आपल्या पहिल्या प्रेयसीला गच्चीतून ढकलतो आणि जणू काही घडलचं नाही असं मानतच तो रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रेयसीभोवतीच्या गर्दीच्या बाजूने शांतपणे निघून जातो. अशा अतिशय क्रूर बुद्धीवत्तेच्या नायकाला चक्क थेटरात टाळ्या शिट्ट्या पडल्याचे आश्चर्य वाटले. प्रेक्षक बदलत गेला का? 1993चा हा चित्रपट आहे. म्हणजेच क्रूर नायक आवडणे तसे तीन दशके जुने. ‘डर’मधील क… क… किरण हा शाहरूख खानचा धाक चक्क लोकप्रिय झाला. त्याने चित्रपटातील नायकावर (सनी देओल) मात केली. तो स्टार झाला.
पुन्हा तोच प्रश्न, प्रेक्षकांना हिंसेचे असं आणि इतकं आकर्षण का? गॅन्गस्टर नायक, अंडरवर्ल्ड यात माईंड गेम, थंडपणे शस्त्र चालवणे, खून खराबा, शहरावर आपलचं वर्चस्व असावे म्हणून कुठेही गोळीबार आणि हिंसा. यावर अनेक चित्रपट येत राहिले. ‘परिंदा’, ’सत्या’, ‘हत्यार’, ‘जुल्म की हुकुमत’, ’कंपनी’, ‘अंगारे’, ’वास्तव’, ’शूट आऊट लोखंडवाला ’ मुंबई गॅन्गवॉर’ वगैरे वगैरे. या थीमवरचे अनेक चित्रपट यशस्वी ठरले. टोळीयुद्ध नि गोळीयुद्ध पहावेसे वाटले.
चित्रपट किती चालला, त्याने किती कमावले याहीपेक्षाही मोठा प्रश्न क्रूरतेला इतके अतिशय आवडीने का पाहिले जाते?
आजचे जग विज्ञान युग आहे. तर जगणं स्पर्धात्मक आणि वेगवान आहे. नातेसंबंधापेक्षा पैसा महत्त्वाचा फंडा झाला आहे. शहरी जीवनात वेगाची नशा आहे. अशातच रूपेरी पडद्यावर, ओटीटीवर काही हिंसक वा क्रूर पाहणे ही मानसिक वा बौद्धिक गरज का बरे झाली असावी? पडद्यावरील हीरोशी आपण जोडले जावे ही आपल्याकडील प्रेक्षक संस्कृती आहे. अशी रूपेरी पडद्यावरील हिंसा त्याना आवडतेय यात काही मानसशास्त्रीय प्रश्न दडलाय का? चित्रपटावर ’फोकस’ टाकताना त्याचं अवाढव्य बजेट, जवळपास जगभरातील प्रदर्शन, मीडया हाईप, त्याची थीम, त्यातील स्टार, त्याची झटपट कमाईचा अबब म्हणावा असा मोठासा आकडा, त्यावरच्या उलटसुलट प्रतिक्रिया, गॉसिप्स, ग्लॅमर, झगमगाटी प्रीमियर, सोशल मीडियातील कव्हरेज, रिल्स यापलिकडे जात बरेच काही आहेच आहे. चित्रपटातील हिंसा वा क्रूरतेचे आकर्षण हा सामाजिक चिंतेचा विषय आहे का हो? तुम्हीही विचार करा, तुम्हाला रूपेरी पडद्यावरील ही वेळोवेळी आलेली हिंसा का आवडतेय? कदाचित तुम्हाला ती आवडली नसेलही, पण मग अनेक प्रेक्षकांना मात्र ते आवडतयं ते का असावे? मल्टीप्लेक्सच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या साऊंड सिस्टीममध्ये तर हा हिंसाचार आणखी रोमांचक आणि थरारक अनुभव देतोय. ही एक भारी सपोर्ट सिस्टीमच आहे. साठच्या दशकातील पिक्चर्समधील मारामारी पाहताना तोंडाने ढिश्यूम ढिश्यूम केले जातेय की काय असे वाटे. पब्लिकही टाळ्या शिट्यांनी हिरोला प्रोत्साहन देत असे. आज घरबसल्या ओटीटीवर जगभरातील अनेक भाषेतील चित्रपट आणि वेबसिरीज पहायला मिळताहेत, त्यात खचाखच हिंसा आणि नग्नता, अर्धनग्नता आहे. कधी ती बिभत्सही वाटते. वेबसिरीजला सेन्सॉर बोर्ड नसल्याने फारच मोकळीक मिळाली आहे. त्यात बेभान, बेफाम मारधाड ऍक्शन एन्जॉय करण्याच्या सवयीतूनच आज चित्रपटातील हिंसाचार आवडत असावा. पॅन इंडिया चित्रपटाचे ते एक मोठेच देणं म्हणायचे. -दिलीप ठाकूर- चित्रपठ समीक्षक
Check Also
रायगड जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत ओमकार वेश्वी, कर्नाळा स्पोर्टस् अकॅडमी संघ विजेते
पनवेल : रामप्रहर वृत्तगोरगरिबांचे आधारस्तंभ, दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सवी …
RamPrahar – The Panvel Daily Paper