‘दिबां’च्या नावासाठी सदैव पाठीशी!
पनवेल ः रामप्रहर वृत्त
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांचे लोकनेते दि.बा. पाटील यांचे नाव देण्यासंदर्भात मंगळवारी (दि.16) लोकनेते दि.बा. पाटील 27 गाव संघर्ष समितीने आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट करत रायगडचे माजी खासदार तथा लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीचे उपाध्यक्ष लोकनेते रामशेठ ठाकूर यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान विमानतळ प्रकल्पबाधित 27 गाव संघर्ष समिती ही सुरुवातीपासूनच लोकनेते रामशेठ ठाकूर आणि सर्वपक्षीय कृती समितीसोबत असून पुढेही ठामपणे त्यांच्या पाठीशी उभी राहणार असल्याचा निर्धार समितीच्या पदाधिकार्यांनी
व्यक्त केला.
या वेळी 27 गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष नंदराज मुंगाजी, सचिव प्रेम पाटील, उपाध्यक्ष सी.टी. पाटील, प्रवक्ते रूपेश धुमाळ, सहसचिव चेतन डाऊर, संपर्क प्रमुख किरण पवार, पद्माकर पाटील, समीर केणी यांच्यासह अन्य पदाधिकारी व सदस्य
उपस्थित होते.
या भेटीबाबत 27 गाव संघर्ष समितीचे सचिव प्रेम पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी आपल्या जमिनी देणार्या 27 गावांतील
प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विमानतळाशी संबंधित विविध प्रशिक्षण मिळावे यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे परिसरात आवश्यक जागा उपलब्ध करून दिली आहे. गेल्या चार महिन्यांपासून उलवे नोड सेक्टर 12मधील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये स्थानिक प्रकल्पग्रस्तांच्या मुलांना विमानतळाशी संबंधित प्रशिक्षण दिले जात आहे. या महत्त्वपूर्ण सहकार्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज आम्ही ही भेट घेतली.
प्रेम पाटील पुढे म्हणाले की, संपूर्ण 27 गाव संघर्ष समिती ही लोकनेते दि.बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीच्या पाठीशी सुरुवातीपासून खंबीरपणे उभी आहे आणि यापुढेही सोबत राहील.
दरम्यान, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनीही या वेळी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा. पाटील यांचेच नाव दिले जाईल, हे पुन्हा एकदा ठामपणे सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper