पनवेल ः रामप्रहर वृत्त
खोपोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने भरीव यश संपादन केले आहे. भाजपने आठपैकी चार जागांवर विजय मिळवत महायुतीच्या 14 विजयी उमेदवारांसह नगराध्यक्षपदासाठी आवश्यक असलेल्या मताधिक्यात मोलाची भर घातली आहे. या विजयी उमेदवारांनी सोमवारी (दि. 22) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतले.
खोपोली पालिकेत महायुतीने राष्ट्रवादी काँग्रेस परिवर्तन शहर आघाडीचा पराभव केला. भाजपचे रायगड जिल्हा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर आणि स्थानिक आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक महायुतीनेे लढवत दमदार विजय मिळविला. विशेष म्हणजे भाजपमधून प्रथमच महिला मुस्लिम नगरसेविका म्हणून सानिया शेख यांनी विजय संपादन केला. त्याचबरोबर प्रतीक्षा रेटरेकर, किशोर पाटील, विक्रम साबळे हेही विजयी झाले. या यशाबद्दल आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांनी सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, भाजपचे खोपोली निवडणूक निरीक्षक अॅड. प्रकाश बिनेदार, अल्पसंख्याक प्रभारी सय्यद अकबर तसेच यशवंत साबळे यांनी विजयी उमेदवारांसह माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेही आशीर्वाद घेतले. या वेळी भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी उपमहापौर सीता पाटील, अविनाश तावडे, खोपोली भाजप शहराध्यक्ष अजय इंगुळकर, महिला अध्यक्ष अश्विनी अत्रे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Check Also
पनवेलच्या ग्रामीण भागात सभापती, उपसभापतींचा अधिकाऱ्यांसमवेत दौरा
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा …
RamPrahar – The Panvel Daily Paper