Breaking News

भाजप महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील -मंत्री पंकजा मुंडे

कळंबोली ः बातमीदार
मोठा उत्साह असतो, त्या ठिकाणी नेत्याच्या येण्याने नाही तर कार्यकर्त्यांच्या मेहनतीने विजय मिळतो. त्यामुळे पनवेल महापालिकेत कार्यकर्त्यांच्या कष्टाने भाजप महायुतीचे उमेदवार चांगल्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल, पशुसंवर्धनमंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी कळंबोली येथे केले.
पनवेल महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ मंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कळंबोलीमध्ये रॅली व चौक सभा मोठ्या जल्लोषात पार पडली. त्या वेळी झालेल्या चौक सभेत त्या बोलत होत्या. या ठिकाणी मोठा उत्साह बघायला मिळाला असून महिलांची उपस्थिती मोठी पाहून आनंद झाल्याचे त्यांनी नमूद केले.
राज्यात महायुतीच्या शासनाने विकासाची गंगा ही तळागाळापर्यंत पोहचवली आहे. त्यामुळेच मी मुंबईतून अल्पावधीतच अटल सेतूने पनवेलमधील येऊ शकले. महायुतीचे सरकार सर्वसामान्यांसाठी काम करीत असून आपले देवाभाऊ लाडक्या बहिणीसाठीही चांगल्या योजना अमलात आणून काम करीत आहेत. स्व. गोपीनाथ मुंडे यांचा जीव हा भाजपच्या कमळात होता, म्हणून त्यांचे भगवानगडांमधील स्मारकही कमळात आहे. महायुतीच्या सर्व उमेदवारांना कळंबोलीसह पनवेलमधील मतदारांनी भरघोस मतांनी निवडून स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृती आपण जपूया, असे भावनिक आवाहन मंत्री पंकजा मुंडे यांनी केले.
या वेळी बोलताना मंत्री पंकजा मुंडे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचा उल्लेख करत, मला या ठिकाणी येण्यासाठी आमदार प्रशांत ठाकूर यांचे सातत्याने आग्रहाचे निमंत्रण असते, असेही अधोरेखित केले.
प्रचाराची रॅली कळंबोलीमधून फिरून अखेरीस रोडपाली येथील बस स्टॉपच्या मैदानावर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीला मतदारांनी भरभरून प्रतिसाद दिला. या वेळी भाजप महायुतीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार करण्यात आला.
या रॅलीदरम्यान महायुतीचे प्रभाग क्र. 7मधील उमेदवार अमर अरुण पाटील, मनाली अमर ठाकूर, पाटील प्रमिला रविनाथ, राजेंद्रकुमार दीपचंद शर्मा, प्रभाग 8चे उमेदवार बबन नामदेव मुकादम, बायजा बबन बारगजे, सायली तुकाराम सरक, रामदास वामन शेवाळे, प्रभाग 9चे उमेदवार महादेव जोमा मध्ये, दमयंती निलेश भोईर, अ‍ॅड. प्रतिभा सुभाष भोईर, शशिकांत शनिवार शेळके, प्रभाग 10चे उमेदवार रवींद्र अनंता भगत, मोनिका प्रकाश महानवर, सरस्वती नरेश काथारा, विजय मनोहर खानावकर या सर्वांना भरघोस मतांनी निवडून देऊन भाजप महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले.
या वेळी लोकप्रिय व कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर, विधान परिषद सदस्य विक्रांत पाटील, म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शिवदास कांबळे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
देशाचे नाव जागतिक पातळीवर उंचावणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार देशात आहे. राज्यात विकासाची गंगा आणणारे मुख्यमंत्री देवभाऊ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व अजित पवार यांच्या महायुतीचे सरकार आहे. त्यामुळे पुन्हा पनवेलमध्ये विकास साधणारे आपले उमेदवार महापालिकेत निवडून यावेत, तरच पनवेलचा सर्वांगीण विकास साध्य होणार आहे. पनवेल हे जागतिक दर्जाचे शहर होण्यासाठी आपण सर्वांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून आणून केंद्र, राज्यातील सत्तेप्रमाणे पनवेलमध्येही महायुतीची सत्ता आणावी, असे आवाहन मंत्री मुंडे यांनी केले.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना थेट जनतेपर्यंत पोहोचल्या असल्याचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले. केवळ योजना राबवण्यातच नव्हे, तर महापालिकेच्या माध्यमातून वेगवेगळ्या स्वरूपाच्या अनेक विकासात्मक उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात आली आहे. लाडकी बहीण योजनेसोबतच महिलांना स्वावलंबी करण्यासाठी प्रशिक्षण उपक्रम, सर्वाइकल कॅन्सर लसीकरण, आरोग्य केंद्रांची उभारणी यासारख्या योजनांमुळे महिलांच्या आरोग्य व सक्षमीकरणाला चालना मिळाली आहे. पनवेल महापालिका ही सर्वाधिक आरोग्य केंद्रे असलेली महापालिका ठरल्याचे त्यांनी नमूद केले.
येणार्‍या काळात विकासाचा वेग आणखी वाढावा यासाठी महायुतीच्या नेत्यांचे पाठबळ व आशीर्वाद आवश्यक असल्याचे सांगत पंकजाताईंच्या उपस्थितीत महायुतीचे सर्व कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेऊन सर्व उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केला.

पंकजाताईंच्या उपस्थितीने समाजाला बळ -आमदार प्रशांत ठाकूर
मंत्री पंकजाताई मुंडे या स्व. गोपीनाथजी मुंडे यांचा केवळ राजकीयच नव्हे; तर सामाजिक वारसाही समर्थपणे पुढे नेत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले. कळंबोली, कामोठे, पनवेल परिसरात मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र तसेच राज्याच्या कानाकोपर्‍यातील समाज वास्तव्यास असून पंकजाताईंच्या उपस्थितीमुळे चैतन्य निर्माण होऊन समाजाला नवे बळ मिळाले आहे, त्याबद्दल मी त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो, असेही ते म्हणाले.

Check Also

गिरवलेचे सरपंच प्रताप हातमोडे भाजपमध्ये दाखल

पनवेल : रामप्रहर वृत्तगिरवले गावचे सरपंच प्रताप चंद्रकांत हातमोडे यांच्यासह त्यांच्या समर्थकांनी भारतीय जनता पक्षामध्ये …

Leave a Reply