कामोठे ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर हे पनवेलचा बुलंद आवाज आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल महापालिकेत विकासाची गंगा आणली आहे. आमच्या रिपब्लिकन पक्षाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यामुळे विकासकामांचा प्रवाह अशाच पद्धतीने सुरू राहणार असून येणार्या 15 तारखेला भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आरपीआय महायुतीच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी कामोठे येथे प्रचार सभेवेळी केले.
पनवेल महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, आपीआय महायुतीच्या प्रभाग क्रमांक 11, 12 आणि 13 मधील उमेदवारांच्या प्रचारार्थ जाहीर सभेचे आयोजन रविवारी (दि. 11) करण्यात आले होते. त्या वेळी त्यांनी आपल्या खास शैलीत आमच्या नावाने कोणी कितीही मोडली बोटे, तरी महायुतीच जिंकणार आहे कामोठे, असा विश्वास व्यक्त केला.
या सभेला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, वाय.टी. देशमुख, कोकण म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील, आरपीआयचे रायगड जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड, जितेंद्र म्हात्रे, प्रभाग क्रमांक 11चे उमेदवार निलम मयूर मोहिते, प्रदीप भगत, हॅप्पी सिंग; प्रभाग 12चे उमेदवार प्रभाकर कांबळे, विद्या तामखडे, कुसूम म्हात्रे, दिलीप पाटील; प्रभाग 13चे उमेदवार रवींद्र जोशी, विकास घरत, हेमलता गोवारी, शिला भगत यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार गोपीचंद पडळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, पनवेल परिसरात झालेल्या सर्व विकासकामांचे श्रेय लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांचे आहे. राज्यातील कानाकोपर्यामधून नागरिक आता कामोठे वसाहतीमध्ये आले आहेत. त्यांना चांगल्या दर्जाच्या सुविधा देण्याचे काम भाजप महायुती करत आहे. अमृत योजनेमध्ये राज्यातील 400 शहरांना केंद्र सरकारने 50 हजार कोटी रुपयांच्या निधी दिला. त्यापैकी हजारो कोटी रुपयांचा निधी आमदार प्रशांत ठाकूर यांनी महापालिकेकडे आणला आहे. अनेक विकासाची कामे भाजप महायुतीने केली आहेत. त्यामुळे आपल्याला सर्व ताकदीने भाजप महायुतीसोबत राहायचे आहे आणि येणार्या 15 तारखेला कमळ निशाणीसमोरील बटन दाबून महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की, विरोधकांना उमेदवार शोधावा लागला आणि शोधलेल्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, मात्र आरोप आमच्यावर करतात. महाविकास आघाडीची आता महाभकास आघाडी झाली आहे. महायुतीचे उमेदवार हे खंबीर आहेत. प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सर्व कार्यकर्ते एकजुट झाले आहेत. प्रभाग क्रमांक 11,12 आणि 13 मधील 11 जणांची टीम आहे आणि ती एकत्रित महापालिकेते विजयी होणार आहे.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी, महायुतीच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सर्व उमेदवारांना बळ दिले आहे. निवडणुका आल्या म्हणून आम्ही जनतेसमोर जात नाही, तर विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आम्ही दक्ष असतो. म्हणून जनता आम्हाला भरभरून प्रतिसाद देते. त्यामुळे येणार्या निवडणुकीमध्ये सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येणार आहेत. कामोठेवासीय जनता केलेल्या कामाला दादा दिल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास व्यक्त केला.
आरपीआयचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र गायकवाड यांनी पनवेल महापालिकेवर झेंडा फडकवण्याठी महायुती सज्ज झाली आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांनी विकासकामांच्या माध्यमातून पनवेलचा चेहरामोहरा बदलला आहे. त्यामुळे विकसाकामांचा प्रवास अविरतपणे सुरू ठेवण्यासाठी महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करा, असे आवाहन केले.
Check Also
शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा
नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …
RamPrahar – The Panvel Daily Paper