नादब्रह्म साधना मंडळाचा उपक्रम
पनवेल ः रामप्रहर वृत्त
थोर दानशूर व्यक्तिमत्व, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त नादब्रह्म साधना मंडळाच्या वतीने 75 अभंगांचे भव्य व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येत आहे. या उपक्रमाचा शुभारंभ सद्गुरू वामनबाबा महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या तळोजे मजकूर, योगीनगर (धोंडळी) येथील दत्त मंदिरात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाला.
या कार्यक्रमास भजनसम्राट हभप निवृत्तीबुवा चौधरी, नादब्रह्म साधना मंडळाचे अध्यक्ष वसंतबुवा पाटील, शास्त्रीय गायक उमेश चौधरी, नगरसेवक नितेश पाटील, माजी सरपंच संतोष पाटील, विनोद पाटील, अशोक पाटील, राम पाटील, विलास खानावकर, कैवारी पाटील यांच्यासह मंडळाचा शिष्य परिवार उपस्थित होता.
या विशेष उपक्रमांतर्गत एकूण 75 अभंगांचे ध्वनीमुद्रण व व्हिडीओ चित्रिकरण करण्यात येत आहे. रेकॉर्डिंगवेळी निवृत्तीबुवा चौधरी यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, लोकनेते रामशेठ ठाकूरसाहेबांच्या अमृत महोत्सवानिमित्त हा आध्यात्मिक आणि सांस्कृतिक ठेवा समाजाला अर्पण केला जात आहे. हे अभंग केवळ एका वर्षापुरते मर्यादित नसून पुढील अनेक पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
या अभंगांची रचना व सादरीकरण विविध अनवट आणि पारंपरिक रागांवर आधारित चालींमध्ये करण्यात आले आहे. त्यामुळे नवोदित विद्यार्थी, शिष्यवर्ग आणि संगीत अभ्यासकांना रागांची शास्त्रशुद्ध व सुसूत्र ओळख होण्यास मोठी मदत होणार आहे. भारतीय शास्त्रीय संगीताच्या परंपरेतील रागसंवर्धन आणि सातत्यपूर्ण जतन हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.
या उपक्रमामुळे भक्ती, संगीत आणि संस्कार यांचा सुंदर संगम समाजास अनुभवता येणार आहे. अभंगांच्या माध्यमातून आध्यात्मिक मूल्यांची जपणूक होऊन नव्या पिढीसमोर एक आदर्श उभा राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली. लवकरच हे सर्व अभंग सर्व रसिक श्रोत्यांसाठी खुले करण्यात येणार असून त्यांचे अधिकृत प्रकाशनही लवकरच करण्यात येणार आहे. या उपक्रमामुळे अमृत महोत्सव वर्षाला आणखी एक सांस्कृतिक व आध्यात्मिक अधोरेखा लाभली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper