पनवेल : रामप्रहर वृत्त
महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील विरुपाक्ष सभागृहाजवळ असलेल्या अंतिम भूखंड क्रमांक १२२ वर उभारण्यात येणाऱ्या विद्यालयाला दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार थोर देणगीदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा सुधारित प्रस्ताव पुढील महासभेत सादर करण्यात येणार आहे. याबाबतच्या सूचना महापौर नितीन पाटील यांनी बुधवारी (दि.१) झालेल्या महासभेत प्रशासनाला दिल्या.
शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या सभेला उपमहापौर प्रमिला पाटील, आयुक्त मंगेश चितळे, अतिरिक्त आयुक्त गणेश शेट्ये, महापालिका सचिव नानासाहेब कामठे, सभागृह नेते ॲड. प्रकाश बिनेदार, विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बाल कल्याण सभापती ममता म्हात्रे, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी उपस्थित होते.
पनवेल महानरपालिकेच्या माध्यमातून पनवेल शहरातील अंतिम भूखंड क्रमांक १२२ वर उभारण्यात येणाऱ्या विद्यालयाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्याचा नवीन प्रस्ताव सुधारणेसह पुढील महासभेत सादर करण्याच्या सूचना महापौर नितीन पाटील यांनी आज झालेल्या महासभेत प्रशासनाला दिली. त्या अनुषंगाने लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे चिरंजीव व पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर यांच्याकडून या विद्यालयासाठी तब्बल १० कोटी रुपयाची देणगी जाहीर करण्यात आली. त्याबद्दलही महापौर नितीन पाटील यांनी आभार मानले. तर यावर विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव दिले जाणार असेल तर आम्हांला आनंद आहे, असे सभागृहात स्पष्ट केले.
गोरगरिबांच्या मुलांना माफक फीमध्ये दर्जेदार शिक्षण देणारी आणि नामांकित संस्था असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला भाडेपट्ट्यावर अंतिम भूखंड क्रमांक १२२ भूखंड देण्याचा प्रस्ताव महासभेच्या विषय पत्रिकेत होता.
मात्र नेहमीच अविचारी बुद्धीने चालणाऱ्या विरोधी पक्ष अर्थात शेकाप आणि शिवसेना उबाठा गटाने या प्रस्तावाला विरोध केला. त्यामुळे सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी सडेतोड भूमिका मांडत विरोधकांच्या विरोधाभास भूमिकेचा समाचार घेतला. लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कधीही शिक्षणात राजकारण आणले नाही.
याची त्यांनी सभागृहाला आठवण करून दिली. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था हि सर्वसामान्यांची जाणीव असलेली संस्था आहे. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था १९९२ पासून कार्यरत, अधिकृत आणि नोंदणीकृत संस्था आहे. नियमानुसार चालणारी हि संस्था आहे, असे सांगतानाच अनधिकृत शाळांची यादी शासनाने जाहीर केली आहे यामध्ये कुणाकुणाची नावे आहेत हे तुम्हांला माहित आहे असे म्हणत माजी आमदार बाळाराम पाटील यांचे नाव न घेत त्यांनी विरोधी पक्षाला चिमटा आणला.
ॲड. बिनेदार यांनी सभागृहाला पुढे सांगितले की, जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था पनवेलची आणि चांगल्या प्रकारे शिक्षण देत आहे, त्यामुळे या प्रस्तावाला मान्यता देण्याऐवजी विरोधकांनी विरोध दर्शविला त्यामुळे सभागृह नेते प्रकाश बिनेदार यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था असलेल्या रयत शिक्षण संस्थेमध्ये लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कमवा आणि शिका या तत्वावर शिक्षण घेतले. त्यांनी केलेले कष्ट आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा आदर्श घेऊन त्यांनी शिक्षण क्षेत्राची सुरुवात केली. संस्थेचे चेअरमन शरद पवार यांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांना रयतचे एटीएम म्हणून संबोधिले आहे. स्वर्गीय अजितदादा पवार यांनी सुद्धा यांनी सुद्धा मला बेरीज करता येणार नाही एवढी देणगी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी दिल्याचे सांगत जाहीरपणे त्यांचे कौतुक केले आहे. रयतने लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नावाने महाराष्ट्रात अनेक शाळा, महाविद्यालये उभारली आहेत.
जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या अनेक शाळा नॅकच्या ए प्लस प्लस दर्जाने मानांकीत आहेत. असे असतानाही विरोधीपक्षाकडून चांगल्या कामाला विरोध केला जात असेल तर तो कदापिही योग्य नाही. आमचे ५९ नगरसेवक आहेत आणि विरोधी पक्ष अल्पमतात आहे. आम्ही संख्याबळावर पण हा ठराव मजूर करून घेऊ शकलो असतो मात्र तसे आम्हांला करायचे नाही. विरोधकांकडून विरोध होत असेल तर तो भूखंड जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेला नको असे स्प्ष्टपणे ॲड. प्रकाश बिनेदार यांनी सभागृहात मांडले. या भूखंडावर पनवेल महापालिकेने शाळा उभारावी आणि त्या शाळेला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे नाव देण्यात यावे, असा प्रस्ताव त्यांनी मांडत या शाळेच्या नगरसेवक परेश ठाकूर यांच्याकडून १० कोटी रुपयांची देणगी दिली जाईल, असेही ॲड. प्रकाश बिनेदार यांनी सभागृहात जाहीर केले. त्यानुसार पुढील महासभेत नवीन प्रस्ताव सादर करण्याची सूचना महापौर नितीन पाटील यांनी केली. दरम्यान, यावेळी नगरसेवक ॲड. मनोज भुजबळ यांनी म्हंटले की, लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शिक्षणासाठी आजपर्यंत दीडशे कोटी रुपयेहून अधिक देणगी दिली आहे. जनार्दन शिक्षण संस्थेत डोनेशन घेतले जात नाही माफक फीमध्ये शिक्षण दिले जाते तर पिल्लेज, डीएव्ही, महात्मा स्कुल अशा बाहेरून आलेल्या संस्था अवाजवी फी आणि डोनेशन घेऊन शिक्षण देत आहेत असे उल्लेखित करून एकप्रकारे विरोधी पक्षाला बाहेरच्या आणि गडगंज फी आकारणाऱ्या संस्थाचा पुळका असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
नगरसेवक प्रथमेश सोमण यांनी हि संस्था भूमिपुत्रांची आणि पनवेलची असल्याचे नमूद केले. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्था चांगली शिक्षण संस्था असून त्यांनी विद्यार्थी घडवले आहेत असे नगरसेवक प्रकाश म्हात्रे व हरेश केणी यांनी म्हटले. तर महाविकास आघाडीतुन स्वतःचा गट निर्माण करणाऱ्या नगरसेविका लीना गरड यांच्याकडून वारंवार सभागृहाच्या कामकाजात व्यत्यय आणत सभागृहातील बेशिस्तपणा प्रत्यय सभागृहात अधोरेखित झाला होता. सवंग प्रसिद्धीसाठी आटापिटा न करता शिस्तीने सभागृहाचे काम चालावे, अशी सूचना यावेळी त्यांना महापौर यांनी केली.
Check Also
आमदार महेश बालदी यांच्या निधीतून कामठा अंतर्गत रस्त्याचे लोकार्पण
उरण : वार्ताहरआमदार महेश बालदी यांच्या विशेष प्रयत्नातून आणि आमदार स्थानिक विकास निधी (२०२५-२६) अंतर्गत …
RamPrahar – The Panvel Daily Paper