पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल पंचायत समितीमधून शेतकरी कामगार पक्षाची सत्ता जाऊन प्रथमच भारतीय जनता पक्षाचा सभापती विराजमान झाल्यानंतर ग्रामीण व आदिवासी भागातील विकासकामांना वेग आल्याचे चित्र दिसू लागले आहे. याच पार्श्वभूमीवर वावंजे जिल्हा परिषद मतदारसंघातील मोरबे, खैरवाडी, शिरवली आणि खानाव ग्रामपंचायत हद्दीतील एकूण १३ आदिवासीवाड्यांना पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांनी अधिकाऱ्यांसमवेत शनिवारी (दि.११) भेट देत थेट पाहणी केली.
या दौऱ्यात पंचायत समितीच्या सभापती रंजना वास्कर, उपसभापती भूपेंद्र पाटील, जिल्हा परिषद सदस्य कमला देशेकर, पंचायत समिती सदस्य अंकुश खेरे, कुंडेवहाळ ग्रामपंचायतीचे सरपंच सदाशिव वास्कर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.
खैरवाडी, तामसई, फणसवाडी, करंबेळी, भल्याचीवाडी, येरमाळ, कोंडप, वांगणी, पाले ठाकूरवाडी, शिवाचीवाडी, महाळुंगी गावदेवीनगर आदी वाड्यांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन शाळा, अंगणवाडी, वीज, आरोग्य उपकेंद्र आणि पाणीटंचाई यांसारख्या मूलभूत समस्यांची सविस्तर पाहणी करण्यात आली.
यावेळी बोलताना सभापती रंजना भास्कर यांनी सांगितले की, भाजप सत्तेत आल्यानंतर ग्रामीण आणि आदिवासी भागातील विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. स्थानिकांच्या समस्या प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन समजून घेत त्या तातडीने सोडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.
पाणीटंचाईच्या समस्येबाबत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांच्या मार्गदर्शनाखाली ज्या ठिकाणी गरज आहे, त्या ठिकाणी बोअरवेल (बोरिंग) करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
एकूणच पंचायत समितीमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर केवळ कागदी आश्वासनांपुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष वाड्यांमध्ये जाऊन समस्या जाणून घेण्यावर भर दिला जात असून यामुळे आदिवासी व ग्रामीण भागातील विकास प्रक्रियेला गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
Check Also
लोकनेते दि. बा. पाटील यांना रक्तदानातून आदरांजली
पनवेलमध्ये शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल उरण आगरी समाज मंडळाच्या वतीने शेतकरी, कामगार …
RamPrahar – The Panvel Daily Paper