Breaking News

आताची महिला सुपरवुमन -चित्रा वाघ

नवीन पनवेलमध्ये हळदीकुंकू, कर्तृत्ववान महिलांचा सन्मान

पनवेल ः रामप्रहर वृत्त

महिलांचा सत्कार आणि सन्मान करायला कोणत्याही विशिष्ट दिवसाची आवश्यकता नाही. महिलांना रोजच आदर मिळायला हवा. स्त्रीशक्ती जगात सर्वश्रेष्ठ असून आताची महिला सुपरवुमन आहे, असे उद्गार भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी काढले. त्या नवीन पनवेलमध्ये आयोजित सोहळ्यात बोलत होत्या.  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने पनवेल महापालिकेच्या नगरसेविका राजश्री वावेकर यांनी रविवारी (दि. 13) हळदीकुंकू व कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा नवीन पनवेल येथील आंबेमाता मैदानात आयोजित केला होता. या वेळी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी कार्यक्रमाच्या आयोजक नगरसेविका राजश्री वावेकर व महेंद्र वावेकर यांचे कौतुक केले. या कार्यक्रमास भाजप उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व नगरसेवक विक्रांत पाटील, उपमहापौर सीताताई पाटील, सभागृह नेते परेश ठाकूर, भाजप पनवेल शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्ष वर्षा नाईक, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, अ‍ॅड. वृषाली वाघमारे, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, तेजस कांडपिळे, नगरसेविका चारूशीला घरत, दर्शना भोईर, विद्या गायकवाड, मोनिका महानवर, पुष्पा कुत्तरवडे, हेमलता म्हात्रे, कुसूम म्हात्रे, संतोषी तुपे, रूचिता लोंढे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अमरीश मोकल आदी उपस्थित होते. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सत्ताधार्‍यांचा महाघोटाळा बाहेर काढल्यामुळे सरकारमध्ये असलेल्या लोकांचे धाबे दणाणले आलेत. जे सत्य आहे ते महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणण्याचे पवित्र काम आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून होत आहे. भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आणि नेते असल्या नोटीसला अजिबात घाबरत नाहीत. जे सत्य आहे ते लोकांसमोर आणण्याचे आमचे काम आहे आणि आम्ही ते करतो, असे सांगून चित्रा वाघ पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रातील तमाम जनतेचे आशीर्वाद देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत आहेत. येणार्‍या काही दिवसांत तुम्ही बघाल की, सरकारची जी काही काळी कृत्ये असतील ती पुढे आणण्याचे काम चालू असलेल्या अधिवेशनात सर्वांना दिसून येतील. राज्यात रोज महिलांवर अत्याचार, बलात्कार होतायेत, पण सरकार हातावर हात ठेवून गप्प आहे. विकृतांना ठेचून काढले पाहिजे. महिलांनी एकमेकींना संकटात साथ द्यावी, तरच खर्‍या अर्थाने जागतिक महिला दिन साजरा होईल, असे चित्रा वाघ यांनी नमूद केले. माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामागे पनवेलकरांनी ताकद लावली आहे, कारण या नेत्यांनी पनवेलचा चेहरामोहरा बदलून टाकला आहे, असे चित्रा वाघ यांनी आवर्जून सांगितले. या सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी आयोजित राज्यस्तरीय खुल्या समूह नृत्य स्पर्धेत पुणे येथील एंजल ग्रुपने प्रथम, नालासोपारा येथील इलेंजल्स क्रूने द्वितीय, तर पुण्यातील जीएनडी गु्रपने तृतीय क्रमांक पटकावला. स्पर्धेचे परीक्षण अंकिता पाटील, करण राबडे, जयेश पाटील यांनी केले तसेच या वेळी झालेल्या पैठणीचा खेळ व लकी ड्रॉमधील विजेत्यांनाही बक्षिसे देण्यात आली. याशिवाय पनवेल महापालिकेच्या स्वच्छतादुतांचा सत्कार करण्यात आला. या वेळी राज सांस्कृतिक व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष महेंद्र वावेकर, माजी नगरसेविका सुहासिनी शिवणेकर,  महिला मोर्चाच्या कविता गायकवाड, श्वेता शेट्टी, गीतांजली ठाकूर यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, कार्यकर्ते, नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply