मुंबई : प्रतिनिधी
पनवेल तालुक्यातील दापिवली येथे असलेल्या भारत पेट्रोलियम कंपनी लि. (बीपीसीएल)च्या बॉटलिंग प्लांटमध्ये स्थानिक भूमिपुत्रांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मंत्रालयात कामगारमंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांची मंगळवारी (दि.२१) महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्रांना न्याय देण्याच्या दृष्टीने तिसऱ्या माथाडी कामगार टोळीच्या निर्मितीबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.
सध्या दापिवली येथील प्लांटमध्ये दोन माथाडी कामगार टोळ्या कार्यरत असून त्यामध्ये केवळ सुमारे ३० टक्के स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळत आहे. उर्वरित स्थानिकांना संधी मिळावी यासाठी तिसऱ्या टोळीची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून सातत्याने करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी मंत्रालयात झालेल्या बैठकीत स्थानिकांच्या हक्कांचा मुद्दा ठामपणे मांडला. भूमिपुत्रांना न्याय मिळवून देण्यासाठी आवश्यक असलेल्या तांत्रिक आणि कायदेशीर बाबींवर यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.
या बैठकीस भारत पेट्रोलियम कंपनीचे व्यवस्थापक फिरोझ, जिल्हा परिषद सदस्य अनन्या गाताडे, खालापूर पंचायत समितीचे सभापती कृष्णा पारंगे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, माजी पंचायत समिती सदस्य जगदीश पवार, अविनाश गाताडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या निर्णयामुळे स्थानिक युवकांना माथाडी मंडळाच्या माध्यमातून रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार असून प्रकल्पग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. स्थानिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
Check Also
भजनी मंडळांना मंत्री आशिष शेलार यांच्या हस्ते साहित्याचे वितरण
पनवेल : रामप्रहर वृत्तभजन परंपरेचे जतन, संवर्धन व्हावे आणि हा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहचावा या …
RamPrahar – The Panvel Daily Paper