Breaking News

गदर एक प्रेमकथा @ वर्षे २५; देशभक्तीचा ज्वलंत नारा….

सिनेमावाले कायमच एका गोष्टीवर खुश असतात ते म्हणजे, पिक्चरला हाऊसफुल्ल गर्दी झाली आहे आणि ती अनेक दिवस, आठवडे, महिने कायम आहे…
शुक्रवार १५ जून २००१ हा दिवस असाच. त्या दिवशी आमिर खान प्रॉडक्शनचा आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित ‘लगान वन अपॉन ए टाईम इन इंडिया‌’ आणि झी टॉकीज निर्मित आणि अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर एक प्रेमकथा’ हे विशिष्ट कालखंडावरील ऐतिहासिक चित्रपट पडद्यावर आले आणि दोन्ही चित्रपट सुपर डुपर हिट ठरले. लगान हा क्लासिक चित्रपट म्हणून ओळखला जातो आणि गदर मास अपील असलेला चित्रपट म्हणून गाजला. मुंबईत गदरचे मुख्य चित्रपटगृह मराठा मंदिर हे होते. मध्य आणि उत्तर भारतात अनेक ठिकाणी तर गदरचे राऊंड शो हाऊसफुल्ल गर्दीत टाळ्या शिट्यानी गाजले.
हिंदीतील देशभक्तीवरील चित्रपटांची आपली एक परंपरा आहे. मनोजकुमार निर्मित, दिग्दर्शित आणि अभिनित ‘उपकार’ (१९६५) त्यात विशेष गाजलेला. या चित्रपटातील मेरे देश की धरती सोना उगले गाण्याने देशाच्या कानाकोपऱ्यात अफाट लोकप्रियता मिळवली. तो लाऊड स्पीकरचा काळ होता आणि प्रत्येक राष्ट्रीय सणाची सुरुवात हेच गाणे लावून होत असे. मनोजकुमारने देशभक्तीवरील चित्रपटांचा हुकमी निर्माता, दिग्दर्शक आणि कलाकार अशी आपली प्रतिमा निर्माण केली आणि मग पूरब और पश्चिम, शोर, रोटी कपडा और मकान, क्रांती असे प्रत्येक चित्रपट सुपर डुपर हिटचे यश प्राप्त केले.
चित्रपटाच्या जगात हवंहवंसं वाटणारे यश मनोजकुमारच्या चित्रपटांना नक्कीच मिळाले. असं असले तरी मनोजकुमारच्या चित्रपटात फिल्मी अथवा बेगडी देशप्रेम पाह्यला मिळते अशीही टीका करणारा एक वर्ग होता आणि आजही आहे. हमखास ओलेती नायिका हेच का देशप्रेम असा टीकेचा सूर असे. रोटी कपडा और मकान या चित्रपटातील झीनत अमानचे अतिशय मुसळधार पावसातील हाय हाय यह मजबूरी गाणं आणि त्यातील झीनत अमानची उन्मादक नृत्य शैली, क्रांती चित्रपटातील हेमा मालिनीचे ओलेते रूप या गोष्टींची बरीच चर्चा रंगली. मनोजकुमार आपल्या चित्रपटात कधी एकादा नायिकेवर जबरदस्ती करण्याचे दृश्यही वादाचे ठरे. रोटी कपडा और मकान या चित्रपटात मौशमी चटर्जीवर अभिनेता सी.एस. दुबे असा प्रयत्न करतो असे दृश्य आहे. असं असले तरी मनोरंजनाच्या वेष्टनात मनोजकुमार देशभक्तीचा डोस देतो हे दुर्लक्षित करता येणार नाही असे मानणाराही एक समर्थक वर्ग आहे. त्याच्या चित्रपटाचा आपला एक हुकमी प्रेक्षकवर्ग निर्माण झाला हे यश उल्लेखनीय.
मेहुलकुमारही तिरंगा, क्रांतीवीर, मृत्यूदाता, कोहराम अशा चित्रपटांनी देशभक्तीवरील चित्रपटांचा दिग्दर्शक म्हणून ओळखले गेले. नाना पाटेकरने मेहुलकुमारच्या तीन चित्रपटांत भूमिका साकारली हे विशेष उल्लेखनीय. देशभक्तीवरील चित्रपटांची आपली एक वेगळी वाटचाल सुरू आहे. त्यातील काही नावे सांगायची, तर जे.पी. दत्ता दिग्दर्शित बॉर्डर, आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित स्वदेस, राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित रंग दे बसंती, आदित्य धर दिग्दर्शित उरी द सर्जिकल स्ट्राईक, अनुराग सिंग दिग्दर्शित केसरी असे काही चित्रपट सांगता येतील.
गदर एक प्रेमकथा या सगळ्या चित्रपटांपेक्षा वेगळा. १५ ऑगस्ट १९४७ रोजी आपल्या देशाची हिंदुस्थान आणि पाकिस्तान अशी फाळणी झाली, त्या पार्श्वभूमीवरील ही ज्वलंत अशी एक प्रेमकथा. उत्तर भारतातील सीमा भागातील जनतेच्या मनात या फाळणीच्या जखमा खोलवर रूजल्या आहेत.
तारासिंग (सनी देओल) आणि सकिना (अमिषा पटेल) यांचे निस्सीम प्रेम आणि त्याला सकिनाचे पिता अशरफ अली (अमरीश पुरी) यांचा असलेला कठोर विरोध याभोवती ही कथा पटकथा रंगते. यांच्या जोडीला उत्कर्ष शर्मा, ओम पुरी, विवेक शौक, अमिता खोपकर, श्वेता शिंदे, प्रतिमा काझमी, राकेश बेदी, विश्वजीत प्रधान इत्यादींच्या प्रमुख भूमिका. आनंद बक्षी यांच्या गीतांना उत्तम सिंग यांचे संगीत आणि यातील मुसाफिर जानेवाले, मै निकला गढ्ढी ले के, उजडा काले कव्वा अशी सगळीच गाणी लोकप्रिय. ‌‘झी‌’चा चित्रपट असल्याने या चित्रपटातील गाण्यांना भरपूर कव्हरेज, प्रमोशन मिळाले आणि ती गाणी लोकप्रियही झाली.
सनी देओलची जोरदार शोरदार डायलॉगबाजी हे या चित्रपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य. सनी देओल शत्रूवर तुटून पडतो ही गोष्ट प्रेक्षकांना कायमच आवडणारी, पण ते पटकथेच्या ओघात यायला हवे. ते मग हुकमी मसालेदार मनोरंजक करणारे.
दिग्दर्शक अनिल शर्मा हा तसा मारधाड ॲक्शन चित्रपटासाठी प्रसिद्ध. श्रद्धांजली (१९८१), हुकुमत (१९८७), ऐलान ए जंग (१९८९), फरिश्ते (१९९१), तहलका (१९९२) असे अनेक चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केले. या चित्रपटातील हुकुमत या चित्रपटाचा मुहूर्त मला आजही आठवतोय. वांद्रे बॅण्ड स्टँड येथील हॉटेल सी रॉकमध्ये तो भर दुपारी हॉटेलमधील हॉलमध्ये झाला. सदाशिव अमरापूरकर यांच्यावर मुहूर्ताचे दृश्य चित्रित करण्यात आले होते. या चित्रपटात धर्मेंद्र, जयाप्रदा, सदाशिव अमरापूरकर, स्वप्ना इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. फरिश्ते चित्रपटाच्या मुहूर्ताची अतिशय जंगी अशी पार्टी जुहूच्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये रंगली होती. अनिल शर्मा त्यावेळी आम्हा सिनेपत्रकारांना आवर्जून भेटले. धर्मेंद्र कुटुंबियांचा अतिशय विश्वासू दिग्दर्शक म्हणून अनिल शर्माची ओळख. धर्मेंद्र निर्मित ‘अपने'(२००७) या चित्रपटाचे दिग्दर्शन अनिल शर्माकडे होते आणि त्यात धर्मेंद्र, सनी देओल, बॉबी देओल आणि कतरिना कैफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
अशा सुपर डुपर हिट गदर एक प्रेमकथा या चित्रपटाचा पुढचा भाग अर्थात सिक्वेल पडद्यावर आला नसता तर त्यात आश्चर्य होते. २०२३ साली ‌‘गदर २‌’ पडद्यावर आला, पण तो वादळ निर्माण करू शकला नाही. काही प्रमाणात व्यावसायिक यश प्राप्त झाले ही पहिल्या ‌‘गदर‌’ची पुण्याई. एकदा सुपर डुपर हिट ठरलेला चित्रपट हा कायमच लोकप्रिय असतोच असतो. चित्रपट अभ्यासात हेदेखील अधोरेखित व्हायला हवे. हिट चित्रपट काळासोबत पुढील पिढीला ज्ञात होत जातो.
गदर एक प्रेमकथा या चित्रपटाची आता खास आठवण काढली जाते आहे, याचं कारण आमिर खान प्रॉडक्शनचा राजकुमार संतोषी दिग्दर्शित ‘बटवारा १९४७’ हा चित्रपट. हीदेखील देशाच्या फाळणीच्या पार्श्वभूमीवरील नाट्यमय गोष्ट. असगर वजाहत लिखित ‘लाहौर नही देख्या, ओ जाम्या ओ नही’ या साहित्य कृतीवर आधारित भव्य दिव्य दिमाखदार चित्रपट आहे. या चित्रपटाच्या निर्मितीच्या खर्चात आणि मेहनतीत कसलीही कसर ठेवण्यात आलेली नाही. या चित्रपटात सनी देओल मध्यवर्ती भूमिकेत आहे आणि या चित्रपटाच्या प्रसिद्धीचा सगळाच फोकस सनी देओल आणि गदर एक प्रेमकथा हा चित्रपट असा ठेवण्यात आला आहे. एक प्रकारे चित्रपट निर्मितीत एक प्रकारची इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. १४ ऑगस्ट २०२६ रोजी आपल्या देशात तसेच जगभरातील अनेक देशांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होईल.
या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शक राजकुमार संतोषी आणि सनी देओल ही जोडी घायल, घातक, दामिनी या चित्रपटानंतर पुन्हा एकदा एकत्र येईल. या चित्रपटात प्रीती झिंटा, शबाना आझमी, करण देओल, अली फजल, अभिमन्यू सिंग, खुशी हजारे, कनिष्का कपूर इत्यादींच्या प्रमुख भूमिका आहेत. जावेद अख्तर यांनी गीते लिहिली असून ए.आर. रहेमान यांचे संगीत आहे.
बराच काळ झाला ए.आर. रहेमान यांचे त्यांच्या दर्जाचे संगीत ऐकायला मिळालेले नाही. त्याना ही एक मोठीच संधी आहे. लगान आणि गदर या चित्रपटाच्या गुणवत्तेत त्यातील गीत संगीत नृत्याचा महत्त्वाचा सहभाग आहे आणि ते चित्रपट एकपडदा चित्रपटगृह अर्थात सिंगल स्क्रीन थिएटर्सच्या युगातील होते. आज आपण मल्टीप्लेक्स युगात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अर्थात व्हीएफएक्स तंत्रज्ञान आणि एआय तंत्रज्ञानाचा वापर तसेच फोर के साऊंड सिस्टीम अशा युगात वावरतोय.
बटवारा १९४७ पाहताना गदर एक प्रेमकथाची आठवण नक्कीच येईल तसेच आपला व्यावसायिक चित्रपट तांत्रिकदृष्ट्या कसा प्रगत झाला आहे याचाही प्रत्यय येईल आणि हा चित्रपट स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने पडद्यावर येत असताना देशभरात असलेल्या देशभक्तीच्या वातावरणाचा त्याला नक्कीच लाभ होईल. ‌‘गदर एक प्रेमकथा‌’चा पंचवीस वर्षांचा प्रवास एका नवीन
टप्प्यावर येऊन पोहचला आहे.

  • दिलीप ठाकूर (चित्रपट समीक्षक)

Check Also

प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना युवाशक्तीला नवी दिशा देणारी

आमदार प्रशांत ठाकूर यांचे प्रतिपादन पनवेल : रामप्रहर वृत्तपंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली राबविण्यात …

Leave a Reply