Breaking News

हवस @५२ वर्षे

तेरी गलियो मे ना रखेगे कदम आज के बाद…

         चित्रपट अभिनय प्रशिक्षण केंद्रात एकाच वेळेस अभिनयाचे धडे गिरवणारे चौघे जण साधारण एकाच वेळेस चित्रपटसृष्टीत पाऊल टाकतात, आपापल्या परीने, मिळालेल्या संधीनुसार, आपल्या क्षमतेनुसार मार्ग काढतात, पुढे सरकत सरकत राहतात, पण त्यातला एक चांगली संधी मिळूनही हळूहळू मागे पडत जातो, त्याचे ते स्पर्धेतून बाजूला होत जाणं जाणवत राहते आणि मग तो कलाकार दुय्यम भूमिका स्वीकारून तग धरून राहण्याची धडपड करतो आणि मग तोच त्याचा मार्ग राहतो, त्याला खरंच ओळख मिळते का?
त्याचे नाव अनिल धवन. काहीजण त्याचा उल्लेख 'ढ' वन असाही करत, ही खरं तर त्याची केलेली थट्टाच. पण त्याने लक्षवेधक कामगिरी केली नसेल तर? काही मान्यवर दिग्दर्शकांच्या चित्रपटातून त्याने भूमिका साकारली, आघाडीच्या काही अभिनेत्रींचा तो नायक झाला, त्याने पडद्यावर साकारलेली काही गाणी लोकप्रिय झाली, आजही ती ऐकली जातात, हे त्याचे नशीब, पण त्याची गुणवत्तादृष्ट्या वाढच खुंटली आणि तो नावापुरता अनेक वर्षे, नेमकं सांगायचं तर तब्बल पंचावन्न वर्षे तो काम करतोय, पण त्याला कसलाच ठसा उमटवता आला नाही.

आजच्या ग्लोबल युगातील जेन झी पिढीला अनिल धवन कोण हे सांगायचं तर दिग्दर्शक डेव्हिड धवनचा भाऊ ( अर्थात वरुण धवनचा काका). सिध्दार्थ धवनचा पिता अशी ओळख सांगता येईल. अथवा आणखी ओळख करून द्यायची तर, श्रीराम राघवन दिग्दर्शित ‘अंधाधुन “(१९१८) या चित्रपटात ज्याची हत्या होते तो स्टार प्रमोद सिन्हा म्हणजे अनिल धवन. हे धवन कुटुंबीय मुळचे उत्तर प्रदेशातील कानपूर येथील रहिवाशी. वयात येताच अनिल धवनने पुणे येथील दूरदर्शन आणि चित्रपट प्रशिक्षण केंद्र येथे अभिनय शिकण्यासाठी प्रवेश घेतला. साठच्या दशकाच्या उत्तरार्धातील ही गोष्ट. तेव्हा अनेक जण या अभिनय प्रशिक्षण केंद्रात अभिनयाचे गमभन शिकत होते. त्यातील डॅनी डेन्झोपा, शत्रुघ्न सिन्हा, जया भादुरी हे त्याचे सहकारी. सगळ्यानी साधारण एकाच वेळेस मुंबईतील चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले. एकेकाला संधी मिळत गेली. पण अनिल धवनला ती मिळत नव्हती. त्याच सुमारास दिग्दर्शक बी. आर. इशारा हे ‘ चेतना ‘( १९७०) या चित्रपटाच्या निर्मितीला लागले. त्यांनी शत्रुघ्न सिन्हा आणि रेहाना सुल्तान यांची निवड केली. पण नायकासाठी योग्य चेहरा मिळत नव्हता. चित्रपटाचे कथानक अतिशय धाडसी होते. एक वेश्या आणि तिच्याकडे गेलेला नायक आणि त्यातून घडलेलं नाट्य अशी गोष्ट आहे.
शत्रुघ्न सिन्हाने बी. आर. इशारा यांना अनिल धवनचे नाव सुचवले. अनिल धवन त्याना या भूमिकेसाठी योग्य वाटला. बी. आर. इशारा यांनी जुहू येथील एका बंगल्यात सलग चित्रीकरण सत्र आयोजित केले. उर्वरित चित्रीकरण बाह्यस्थळी केले. चित्रपट पूर्ण झाला आणि अनेक ठिकाणी रस्त्यावर त्याचे धाडसी पोस्टर लागले. फाकलेल्या पायाच्या पलिकडे अनिल धवन उभा असे ते पोस्टर वादग्रस्त ठरले. त्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. याच वातावरणात चित्रपट प्रदर्शित झाला आणि पहिल्याच खेळापासून हिटही झाला. अनिल धवनची सुरुवात अशी चांगली. पहिलाच पिक्चर हिट याचा अर्थ गाडी मार्गाला लागली. बी. आर. इशारा दिग्दर्शित ‘ मन तेरा तन मेरा “(१९७०. नायिका रेहाना सुल्तान), रविकांत नगाईच दिग्दर्शित ‘प्यार की कहानी’ (१९७१. नायिका तनुजा.) या चित्रपटात चक्क अमिताभ बच्चन सहनायक आहे. बिचारा. त्याचा सुरुवातीचा पडता काळ होता.), मग १९७१ साली फिरोज चिनॉय दिग्दर्शित ‘दो राहा’ (नायिका राधा सलुजा), विश्राम बेडेकर दिग्दर्शित ‘जय जवान जय मकान’ (नायिका जया भादुरी), सी. पी. दीक्षित दिग्दर्शित ‘हार जीत’ (नायिका रेहाना सुल्तान) वगैरे वगैरे.
यात एक चित्रपट महत्त्वाचा, सावनकुमार निर्मित आणि दिग्दर्शित ‘हवस'( मुंबईत प्रदर्शित २ ऑगस्ट १९७४) च्या प्रदर्शनास एकावन्न वर्षे पूर्ण होत आहेत. या चित्रपटाबाबत अनिल धवनवर नशिब फिदा होते असे म्हणता येईल. त्याला चक्क नीतू सिंग नायिका लाभली. तिने बालकलाकार म्हणून कात टाकून नायिका म्हणून सुरुवात करताना आपलं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठी जे काही चित्रपट स्वीकारले त्यात ‘हवस’ होता. नावावरून त्या काळातील हा सवंग चित्रपट. आंबटशौकीन प्रेक्षकांसाठीची करमणूक. या चित्रपटात विनोद मेहरा, प्रदीपकुमार , राज किशोर बिंदू, पाहुणी कलाकार रेखा इत्यादींच्याही भूमिका. मुंबईत ताडदेवच्या गंगा आणि उपनगरातील काही सिंगल स्क्रीन थिएटर्समध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला तोच अवघ्या दोन आठवड्यात उतरला. मात्र याच चित्रपटातील सावनकुमार लिखित आणि उषा खन्नाचे संगीत असलेले मोहम्मद रफी यांनी गायलेले तेरी गलियो मे ना रखेगे कदम आज के बाद हे गाणे असं काही लोकप्रिय ठरले की आजही म्हणजेच एकावन्न वर्षांनंतरही ते गाणे लोकप्रिय आहे. आणि पडद्यावर ते अनिल धवनने साकारलेय. तेदेखील कसलीही भावमुद्रा न दाखवता अगदी कोरड्या चेहरा घेऊन हे गाणे त्याने साकारले तेव्हा सेटवर दिग्दर्शक अथवा नृत्य दिग्दर्शक नव्हता का असा प्रश्न पडतो. मोहम्मद रफी यांच्या चाहते हे गाणे ऐकायला थिएटरमध्ये जात आणि गाणे संपले की पुढचा चित्रपट पडद्यावर ठेवून बाहेर पडत. हिंदी चित्रपटाचे संगीत शौकीन इराणी हॉटेलमधील ज्यूक बॉक्समध्ये चार आण्याचे नाणं टाकून हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकत.
अनिल धवनला उत्तम दिग्दर्शक, आघाडीच्या अभिनेत्री आणि लोकप्रिय गाणी हे आणखी लाभलं. तरीही अनिल धवनची पाटी कोरीच. बासू चटर्जी दिग्दर्शित ‘पिया का घर’
(१९७२) मध्ये जया भादुरी नायिका. या चित्रपटातील यह जीवन है इस जीवन का हे गाणे आयुष्याचे तत्त्वज्ञान सांगते. शांतपणे ऐकावं. (हा चित्रपट राजा ठाकूर दिग्दर्शित ‘मुंबईचा जावई’ या चित्रपटाची रिमेक आहे.), अजय विश्वास दिग्दर्शित ‘अन्नदाता'(१९७२) मध्ये जया भादुरी नायिका. या चित्रपटातील गुजर जाए दिन हे अनिल धवनचे सायकलवरील गाणे लोकप्रिय ठरले. दिग्दर्शित ‘समझौता’ (१९७४) मध्ये योगिता बाली नायिका आणि या चित्रपटातील समझौता गमो से करलो हे गाणे आशययुक्त आहे. दिग्दर्शित ‘हनिमून’ (१९७२) मध्ये लीना चंदावरकर नायिका. या चित्रपटातील मेरे प्यासे मन की बहार आणि दिन है बहार के फूल खिलने प्यार के ही दोन्ही गाणी श्रवणीय.
दिग्दर्शक, नायिका आणि गाणी यात अनिल धवन सरस होता. तरीही काहीच साध्य झाले नाही. काही चित्रपट यशस्वी ठरले तर काही फ्लॉप. त्याच्या काही चित्रपटांची नावे सांगायची तर, असित सेन दिग्दर्शित अनोखा दान (नायिका अर्चना), राजन बोस दिग्दर्शित यौवन ( नायिका योगिता बाली), जम्बो दिग्दर्शित गुलाम बेगम बादशाह (नायिका मौशमी चटर्जी) वगैरे वगैरे. एक हंस का जोडा (नायिका झाहीरा १९७५) च्या फ्लॉपसह अनिल धवन फारच पिछाडीवर पडला.
अनिल धवन तात्कालिक समिक्षक आणि प्रेक्षकांना प्रभावित करु शकला नाही. कलेच्या क्षेत्रात प्रेक्षक पसंती जास्त महत्वाची. चित्रपटसृष्टीत बराच काळ तरी ‘हिरो बैठ गया’ अशी एक बोलण्याची पध्दत होती. म्हणजे या कलाकाराचे चित्रपट फारसे पसंत केले जात नाहीत. तो गल्ला पेटीवर ‘चालणारा’ हिरो नाही. एकदा का हा शिक्का बसला की चित्रपटाचा ओघ कमी कमी होत जातो.
अनिल धवनच्या नायकपदाच्या काळातील समकालीन नायकांचे प्रगती पुस्तक पाहायचं तर, अनिल धवनपेक्षा नवीन निश्चल बरा होता (आपल्या स्टारपणाचा अनावश्यक तोरा त्याला नडला), विजय अरोराही बरा होता (यादो की बारातमध्ये झीनत अमान, फागूनमध्ये जया भादुरी, ३६ घंटे चित्रपटात परवीन बाबी अशा आघाडीच्या अभिनेत्रींचा तो नायक झाला इतकेच), याउलट राकेश पांडे (दिलीपकुमारची कितवी नक्कल बरे?), महेंद्र सन्धु (हा धर्मेंद्रची जागा घेणार आहे म्हणे. काहीतरीच हो.) यांच्यापेक्षा अनिल धवन बरा होता. सत्तरच्या दशकाच्या सुरुवातीला पुणे येथील दूरदर्शन आणि चित्रपट प्रशिक्षण केंद्रात अभिनयाचे धडे घेणारे बरेच चेहरे आणि जोडीला आणखी काहीजण (कबीर बेदी, विक्रम वगैरे) आले. याची गर्दी खूप होती. महत्त्व होते ते क्षमता, संधी आणि चित्रपटांचे यशापयश.
या स्पर्धेत आपण मागे पडत चाललोय हे अनिल धवनने स्वीकारले आणि सहनायक, अगदी दुय्यम भूमिका, किरकोळ भूमिका यातून आपली वाटचाल सुरू ठेवली. याला व्यावसायिक शहाणपण म्हणतात. आपल्या मर्यादा लक्षात घेऊन जमेल तसे टिकून राहण्यासाठी हा मार्ग सोयीचा होता. आपल्यासोबतच कारकीर्द सुरू झालेले शत्रुघ्न सिन्हा, जया भादुरी, डॅनी डेन्झोपा यांचे पुढे जाणं स्वीकारणं अवघड असले तरी आवश्यक होते. अनिल धवनने घटना, दरवाजा, मौत का साया, राखी और हथकडी, अविनाश, इन्सान बना सैतान, खुनी शिकन्जा अशा अनेक चित्रपटांतून दोन चार दृश्ये केली. अनिल धवनवर अपयशी कलाकार असा शिक्का बसला तरी त्याकडे दुर्लक्ष करत त्याने दूरदर्शन मालिकांमध्ये स्वतःला गुंतवून घेतले. आशा पारेख निर्मित कोरा कागज ही उल्लेखनीय मालिका. त्याशिवाय प्यार का दर्द है मिठा मिठा प्यारा प्यारा, भाग्यलक्ष्मी, सिर्फ तुम वगैरे वगैरे. काही वेबसिरीजमध्येही त्याने काम केले. म्हटलं तर तो थांबला नाही.
आपला दिग्दर्शक भाऊ डेव्हिड धवनच्या हीरो नंबर वन अशा काही चित्रपटांत काम केले पण विनोदाचे टायमिंग जमत वा जुळत नसल्याने ही संधीही फार फळली नाही. हवस चित्रपटाच्या प्रदर्शनास बावन्न वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त अनिल धवनवर हा फोकस. कधी कधी अपयशी कलाकाराचीही दखल घ्यायला हवी. त्यांचा आपला एक संघर्ष असतो, त्यांची आपली एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट असते.
-दिलीप ठाकूर, चित्रपट समीक्षक

Check Also

पनवेल मनपा क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नगररचना संचालकांशी सकारात्मक चर्चा

पुणे ः रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील विविध भागांचा विकास आराखडा, शहराचे नियोजन, बांधकाम परवानग्या व …

Leave a Reply