राज्य पातळीवर ‘दीपावली’, तर रायगड जिल्हास्तरावर ‘इंद्रधनू’ प्रथम
यंदापासून डिजिटल अंकालाही बक्षीस
मुंबई ः रामप्रहर वृत्त
सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात गेल्या 30 वर्षांहून अधिक काळापासून उल्लेखनीय कार्य करणारे श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सर्वाधिक रक्कमेचे पारितोषिक असलेल्या राज्यस्तरीय व रायगड जिल्हास्तरीय दिवाळी अंक स्पर्धा 2025च्या अर्थात रौप्य महोत्सवी वर्षाचा निकाल मंगळवारी (दि. 4) मुंबई येथे जाहीर करण्यात आला.
राज्यभरातील दिवाळी अंकांना प्रोत्साहन देणाऱ्या या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत साहित्य, पत्रकारिता, सामाजिक आशय, कलात्मकता आणि सर्जनशीलतेचा उत्कृष्ट आविष्कार करणाऱ्या अंकांचा आणि साहित्यिकांचा गौरव करण्यात आला आहे. स्पर्धेचा निकाल श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषेदच्या माध्यमातून जाहीर केला. यंदाच्या वर्षापासून डिजिटल दिवाळी अंकाचा पारितोषिकांमध्ये समावेश करून प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांकाला 10, तर तृतीय क्रमांकाच्या डिजिटल अंकाला पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, उपाध्यक्ष शैलेंद्र शिर्के यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते.
राज्यस्तरीय स्पर्धेत ‘दीपावली’ या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांक पटकावत एक लाख रुपयांचे प्रथम पारितोषिक मिळविले आहे. या अंकाचे संपादक अशोक कोठावळे आहेत. विवेक कोरडे संपादित ‘मुक्त संवाद’ अंकाने द्वितीय (50 हजार रुपये), तर सई पवार संपादित ‘वसा’ आणि शर्मिष्ठा भोसले संपादित ‘अक्षरलिपी’ या अंकांना तृतीय क्रमांक (प्रत्येकी 30 हजार रुपये) विभागून देण्यात आला आहे.
राज्यस्तरीय स्पर्धेत विविध साहित्यिक आणि कलात्मक विभागांमध्येही उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंकांचा आणि लेखकांचा गौरव करण्यात आला आहे. ‘बाईमाणूस’ या अंकाला लक्षवेधी उत्कृष्ट अंकाचा पुरस्कार (15 हजार रुपये) मिळाला असून त्याचे संपादक प्रशांत पवार आहेत. ‘धनंजय’ अंकातील ‘आवाज’ या कथेसाठी लेखिका मनस्विनी लता रवींद्र यांना उत्कृष्ट कथा पुरस्कार (सात हजार रुपये), तर ‘ललित’ अंकातील ‘टॉलस्टॉयची सायकल’ या लेखासाठी लेखक डॉ. नंदू मुलमुळे यांना उत्कृष्ट लेखाचा पुरस्कार (पाच हजार रुपये) जाहीर झाला आहे. ‘युगांतर’ अंकातील ‘त्याने तिरंगा पाहिला’ या कवितेसाठी कवी सतीश लोले यांना उत्कृष्ट कविता पुरस्काराने (पाच हजार रुपये) गौरविण्यात येणार आहे.
‘नवभारत’ या अंकाला उत्कृष्ट विशेषांक पुरस्कार (15 हजार रुपये) जाहीर झाला असून त्याचे संपादक निरंजन हातेकर आहेत. बालसाहित्य क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी जयंत मोडक संपादित ‘मुलांचे मासिक’ या अंकाला उत्कृष्ट बाल दिवाळी अंकाचा पुरस्कार (सात हजार 500 रुपये) देण्यात येणार आहे. याशिवाय ‘अक्षर’ अंकातील ‘युद्धकांड’ या परिसंवादासाठी मीना कर्णिक आणि हेमंत कर्णिक यांना लक्षवेधी परिसंवाद पुरस्कार (पाच हजार रुपये), तर ‘शब्दांगण’ अंकातील आसाराम लोमटे यांच्या मुलाखतीसाठी मुलाखतकार मनिषा उगले यांना लक्षवेधी मुलाखत पुरस्कार (पाच हजार रुपये) जाहीर करण्यात आला आहे. ‘साप्ताहिक विवेक’ या अंकाच्या मुखपृष्ठासाठी चित्रकार विनायक खरात यांना सर्वोत्कृष्ट मुखपृष्ठ पुरस्कार (पाच हजार रुपये), तर सर्वोत्कृष्ट व्यंगचित्र पुरस्कार ज्ञानेश बेलेकर यांना (पाच हजार रुपये) देण्यात येणार आहे.
रायगड जिल्ह्यातील दिवाळी अंकांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय स्पर्धेतही विविध अंकांनी आपला ठसा उमटविला. यात ‘इंद्रधनू’ या दिवाळी अंकाने प्रथम क्रमांक पटकावत 40 हजार रुपयांचे पारितोषिक मिळविले आहे. या अंकाचे संपादक विजय पवार आहेत. दीपक म्हात्रे संपादित ‘आगरी दर्पण’ अंकाने द्वितीय क्रमांक (20 हजार रुपये) प्राप्त केला आहे, तर विनोद साळवी संपादित ‘शब्दसंवाद’ या अंकाने तृतीय क्रमांक (10 हजार रुपये) मिळविला आहे. अनिल भोळे संपादित ‘रसायनी टाइम्स’ आणि गणेश कोळी संपादित ‘पनवेल टाइम्स’ या अंकांना उत्तेजनार्थ पुरस्कार (प्रत्येकी पाच हजार) देण्यात येणार आहे.
रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत विविध साहित्य प्रकारांमध्ये उत्कृष्ट लेखन करणाऱ्या साहित्यिकांचाही पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार आहे. ‘आगरी दर्पण’ अंकातील ‘गॉटर’ या कथेसाठी लेखक किरण शेले यांना उत्कृष्ट कथा पुरस्कार (तीन हजार रुपये) जाहीर करण्यात आला आहे. ‘श्री समर्थ विचार’ अंकातील ‘ग्रामीण आरोग्य व्यवस्थेची दुर्दशा’ या लेखासाठी लेखक अरविंद पाशिलकर यांना उत्कृष्ट लेख पुरस्कार (तीन हजार रुपये), तर ‘म्हसळा टाइम्स’ अंकातील ‘चाळ’ या कवितेसाठी कवी दिलीपराव झुंजारराव यांना उत्कृष्ट कविता पुरस्कार (तीन हजार रुपये) देण्यात येणार आहे.
राज्यभरातून प्राप्त झालेल्या विविध दिवाळी अंकांचे परीक्षण साहित्यिक गुणवत्ता, आशय, विषयाची निवड, मांडणी, पत्रकारितेचा दर्जा, सामाजिक भान, कलात्मकता, सर्जनशीलता आणि वाचनीयता या विविध निकषांच्या आधारे करण्यात आले. त्यातून विविध विभागांतील विजेत्यांची निवड करण्यात आली. राज्यभरातून उदंड प्रतिसाद लाभलेल्या या स्पर्धेसाठी विणा सानेकर, रेखा देशपांडे आणि सुप्रसिद्ध सुलेखनकार सुनील धोपावकर यांनी परीक्षक, तर समन्वयक म्हणून दीपक म्हात्रे व शैलेंद्र शिर्के यांनी जबाबदारी बजावली.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हटले की, मराठी संस्कृतीमध्ये दिवाळी अंकांना मोठी आणि समृद्ध परंपरा आहे. साहित्य, पत्रकारिता, कला, सामाजिक प्रश्न, संस्कृती, इतिहास, व्यक्तिचित्रण, कथा, कविता, वैचारिक लेखन आणि विविध विषयांना दिवाळी अंकांच्या माध्यमातून व्यापक व्यासपीठ मिळते. बदलत्या काळातही ही परंपरा अधिक समृद्ध व्हावी आणि नव्या पिढीतील लेखक, पत्रकार, साहित्यिक व कलावंतांना प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षांपासून श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने दिवाळी अंक स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असल्याने स्पर्धेला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेल्या दिवाळी अंकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवून मराठी साहित्य आणि पत्रकारितेची समृद्ध परंपरा जपण्याचे काम केले. दिवाळी अंकांच्या माध्यमातून दर्जेदार साहित्याला चालना मिळावी, समाजातील विविध प्रश्नांवर वैचारिक चर्चा व्हावी, नवोदित लेखकांना संधी मिळावी आणि मराठी भाषा-साहित्याची परंपरा अधिक व्यापक व्हावी यासाठी या स्पर्धेचे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे, असे सांगून राज्यस्तरीय तसेच रायगड जिल्हास्तरीय विजेत्यांचे अभिनंदन करून भविष्यातही अधिकाधिक दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित व्हावेत, अशी अपेक्षा आमदार प्रशांत ठाकूर यांनी यावेळी व्यक्त केली तसेच लवकरच पारितोषिक वितरण सोहळा मुंबईत होणार असल्याचे सांगितले.
सातत्याने 25 वर्षे दिवाळी अंक स्पर्धेचा उपक्रम राबविला जात आहे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे. या उपक्रमासाठी श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे मी मनःपूर्वक आभार व्यक्त करतो. दिवाळी अंकांसाठी एवढ्या मोठ्या रकमेची पारितोषिके देणारी अशी स्पर्धा देशात अन्यत्र कुठेही होत नाही.
-संदीप चव्हाण, अध्यक्ष, मुंबई मराठी पत्रकार संघ
RamPrahar – The Panvel Daily Paper