Breaking News

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते पॅथॉलॉजी लॅबचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक दर्जेदार व सुलभ आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मोल एक्सपर्ट पॅथॉलॉजी लॅब ही नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र २, कोळीवाडा सुरू करण्यात आली आहे. या लॅबचे उद्घाटन शनिवारी (दि. १५) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झाले.
या कार्यक्रमास महापौर नितीन पाटील, सभागृह नेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ममता म्हात्रे, प्रभाग समिती ‌‘ड‌’चे सभापती अजय बहिरा, नगरसेवक डॉ.अरुणकुमार भगत, सुमित झुंजारराव, नगरसेविका दर्शना भोईर, प्रिती जॉर्ज, अस्मिता घरत आदी उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले, महापालिकेच्या या लॅबमुळे रुग्णांच्या आजाराचे निदान लवकर होणार आहे. महापालिका दर्जेदार आरोग्य सुविधा देण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावे उचलत आहे. पालिकेच्या आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सर्व डॉक्टर व आरोग्य कर्मचारी रूग्णांना योग्य उपचार देऊन नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. याबद्दल त्यांचे अभिनंदन. प्राथमिक उपचारानंतर आता पुढील टप्प्यावरील आरोग्य सुविधा देण्यासाठी कटिबद्ध होऊया, असेही त्यांनी सांगितले.
पनवेल महापालिकेच्या वैद्यकीय आरोग्य विभागाच्या सहकार्याने मोल एक्सपर्ट इन्फेक्शस डिसीज अँड मॉलिक्युलर लॅबोरेटरी यांच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रयोगशाळेमध्ये रक्त तपासणी अंतर्गत आरबीएस, टी३, टी४, टीएसएच, एलएफटी, आरएफटी, मलेरिया, डेंग्यू, हिमोग्लोबिन अशा विविध १३२ विविध प्रकारच्या वैद्यकीय तपासण्या अधिक सुलभपणे उपलब्ध होण्यास मदत होणार असल्याची माहिती मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ आनंद गोसावी यांनी प्रास्ताविकात दिली.
पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांच्या मार्गदर्शनाखाली नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा अधिक सक्षमपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या पॅथॉलॉजी लॅबमुळे परिसरातील नागरिकांना आवश्यक वैद्यकीय तपासण्या उपलब्ध होऊन आरोग्यसेवा अधिक प्रभावी व लोकाभिमुख होण्यास मदत होणार आहे.

Check Also

पनवेल महापालिका एकात्मिक आरोग्यवर्धिनी समितीची सभा

आमदार प्रशांत ठाकूर यांनी घेतला आरोग्य सेवांचा आढावा पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य …

Leave a Reply