Breaking News

शेकापचे अ‍ॅड. परेश देशमुख यांचा पत्नीसह भाजपत प्रवेश

अलिबाग ः प्रतिनिधी

शेकापचे जिल्हा कार्यालयीन चिटणीस व विद्यमान चेंढरे ग्रामपंचायत सदस्य अ‍ॅड. परेश देशमुख यांनी आपली पत्नी मीनाक्षी देशमुख यांच्यासह मंगळवारी

(दि. 4) भाजपात प्रवेश केला. चेंढरे ग्रामपंचायत निवडणुकीत मीनाक्षी देशमुख यांना भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीतर्फे थेट सरपंचपदाची उमेदवारी देण्यात आली आहे, असे भाजप अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.

अलिबागजवळील टेस्टी क्राऊड येथे झालेल्या पत्रकार परिषदेला अ‍ॅड. महेश मोहिते यांच्या समवेत भाजप अलिबाग तालुकाध्यक्ष हेमंत दांडेकर, सतीश लेले, दर्शन प्रभू, शिवसेनेचे महेंद्र दळवी, विजय कावळे, अ‍ॅड. सुशील पाटील, अ‍ॅड. परेश देशमुख, मीनाक्षी देशमुख, दत्ता ढवळे आदी उपस्थित होते.

अ‍ॅड. परेश देशमुख हे शेकापचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा कार्यालयीन चिटणीस अनंतराव देशमुख यांचे पुत्र आहेत. वडिलांनंतर अ‍ॅड. परेश देशमुख शेकाप कार्यालयीन चिटणीसपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत होते. अ‍ॅड. परेश देशमुख यांनी भाजपात प्रवेश केल्याने शेकापला हा मोठा धक्का आहे. देशमुख कुटुंब पक्ष स्थापनेपासून शेकापसोबत राहिले असून त्यांची तिसरी पिढीही शेकापसोबत होती.

23 जून रोजी चेंढरे ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. चेंढरे ही अलिबाग तालुक्यातील सर्वांत मोठी ग्रामपंचायत आहे. येथे शेकापची सत्ता आहे. अ‍ॅड. परेश देशमुख हे चेंढरे ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य असून त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर अ‍ॅड. परेश देशमुख यांनी शेकापला सोडचिठ्ठी देणे हा शेकापसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

मंगळवारी सकाळी अ‍ॅड. परेश देशमुख यांनी त्यांची पत्नी समीक्षा देशमुख यांसह अलिबागमधील भाजप कार्यालयात जाऊन भाजपात जाहीर प्रवेश केला. या वेळी अलिबाग-मुरूड विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. महेश देशमुख, युवा तालुकाप्रमुख अ‍ॅड. अंकित बंगेरा, उदय काठे, आदित्य नाईक, राजेश पाटील, निलेश महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते.

Check Also

उलवे नोडमध्ये रविवारी महासंस्कृती : जागर स्त्री शक्तीचा सांस्कृतिक कार्यक्रम

भजनी मंडळांना भांडवली अनुदानाचे होणार वाटप पनवेल : रामप्रहर वृत्तमहाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि …

Leave a Reply