प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी स्व. दि. बां.ची चळवळ सक्रिय करू या!

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे बैठकीत आवाहन

पनवेल : प्रतिनिधी

प्रकल्पग्रस्तांच्या न्यायिक हक्कासाठी दि. बा. पाटील साहेबांच्या आशीर्वादाने चळवळ सक्रिय करू या, असे आवाहन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पनवेल येथे आयोजित केलेल्या बैठकीत केले.

जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती च्यावतीने गुरुवारी (दि. 13) पनवेल येथील आगरी समाज हॉलमध्ये सिडको, जेएनपीटी, एमटीएचएल, नैना आणि रेल्वे बाधित प्रकल्पग्रस्त व नेते मंडळींची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील यांच्या निधनानंतर शांत झालेली चळवळ पुन्हा उभारण्यासाठी कामगार नेते महेंद्र घरत व समितीचे निमंत्रक अतुल पाटील यांनी हाक दिली. त्या अनुषंगाने बैठक पार पडली.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी बोलताना सांगितले की, प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समितीचे निमंत्रक अतुल पाटील व महेंद्र घरत यांनी संघटनेच्या बाबतीत माझ्याकडे विचार मांडले. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी राजकीय चपला बाजूला ठेवून मनापासून एकत्रित आले आहेत, त्यांचे आभार मानतो. पनवेल, उरण परिरसरात अनेक प्रकल्प आले आहेत. व येत आहेत मात्र सिडकोची जास्त चर्चा केली जाते. सिडकोसोबत इतर प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांबद्दलही ठाम भूमिका घेऊन सर्व प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळाला पाहिजे, अशी ठोस भूमिका त्यांनी बोलताना मांडली. परिसरात अनेक प्रकल्प आले आहेत, त्या अनुषंगाने विषय व प्रश्नही जास्त आहेत, त्यांची सोडवणुकीसाठी मुख्य संघटनेसोबत सहसंघटना असाव्यात, अशी सूचना करतानाच 105 जणांची मुख्य कमिटी आणि त्यामध्ये 25 जणांची कार्यकारिणी असावी, असे त्यांनी नमूद केले. संघटनेला नव्याने उजाळा देत असताना यामध्ये सर्व पक्ष तसेच संस्था संघटनांचा समावेश असावा, असे मत त्यांनी व्यक्त केले. दि. बा. पाटील साहेबांच्या आशीर्वादाने आपल्याला आपल्याला पुढे जायचे आहे, त्यामुळे 24 जूनला त्यांच्या पुण्यतिथी दिनी या कमिटीची घोषणा व्हावी, अशी इच्छा त्यांनी व्यक्त करून त्यापूर्वी कमिटी गठीत करा, आणि संघटनेत सातत्य राहण्यासाठी नियमितपणे बैठक घेण्याची सूचना त्यांनी केली. गावठाण विस्तार, साडेबारा टक्के, गरजेपोटी घरे, अशी अनेक प्रश्न आहेत ती या संघटनेच्या माध्यमातून सोडविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सिडकोचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनी बोलताना, प्रकल्पग्रस्तांचे दिवंगत नेते दि. बा. पाटील साहेब यांच्या चळवळीचा वारसा पुढे चालू रहावा, यासाठी आयोजित केलेल्या या बैठकीबद्दल आभार मानले. दि बा पाटील साहेबांनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रत्येक हक्कासाठी लढायला शिकविले आहे. पनवेल उरण परिसरात अनेक प्रकल्प येत आहे, प्रकल्पांच्या अनुषंगाने प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार नाही यासाठी सर्व पक्ष आपापल्या परीने काम करीत आहेत.प्रकल्पासाठी जमीन देतो तो शेतकरी देशाच्या प्रगतीसाठी त्याग करतो. त्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी लोकप्रतिनिधी म्हणून आपल्या सर्वांची आहे, त्या अनुषंगाने सर्व पक्षातील नेत्यांना व प्रकल्पग्रस्तांना एकत्र आणण्याची गरज होती ती या बैठकीतून होत आहे, असे सांगतानाच दि.बां. च्या नेतृत्वाखाली राज्याला केंद्राला अनेक निर्णय घ्यावे लागले असून मी सिडकोचे अध्यक्ष असलो तरी प्रकल्पग्रस्तांच्या गरजेपोटी बांधलेल्या घरावर कारवाई नको ही माझी ठाम भूमिका आहे. प्रकल्पग्रस्तांनी गरजेपोटी बांधलेली घरे नियमित करण्यासाठी माजी खासदार, लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 2010 साली तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना निर्णय घ्यायला लावला होता. प्रकल्पग्रस्तांच्या हक्कासाठी कायम लढत राहणार असून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आग्रह धरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. हुतात्म्यांचे रक्त वाया जात नाही जाऊन द्यायचे नसते आणि चर्चेची दारे बंद ठेवायची नाही, हे दि. बा. साहेबांचे दोन मूलमंत्र होते. त्यांच्या आशीर्वादाने प्रकल्पग्रस्तांसाठी लढत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेचे जिल्हा सल्लागार बबनदादा पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, दि. बा. पाटील साहेबांच्या नंतरही चळवळ कायम राहिली पाहिजे. त्यासाठी परिसरातील प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न मांडण्यासाठी समितीची स्थापना केली. सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रकल्पग्रस्तांची जाण असलेले लोकप्रतिनिधी आहेत, ते अध्यक्ष झाल्यामुळे आम्हाला बळ मिळाले. प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात आम्ही त्यांच्याशी बैठक घेतली, त्यांनी प्रकल्पांच्या हक्कासाठी सकारात्मक प्रतिसाद देऊन हे प्रश्न निकाली काढण्यासाठी  मोलाचे सहकार्य केले.

यावेळी कामगारनेते महेंद्र घरत व जेएनपीटी व सिडको प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे निमंत्रक यांनी बैठकीसंदर्भात माहिती दिली.  महेंद घरत यांनी आपल्या प्रास्ताविकातून सांगितले की, साडेबारा टक्के, गरजेपोटी घरे, व इतर सर्व विषयांची चर्चा करण्यासाठी दिबांच्या आशीर्वादाने कमिटी नेमावी, विखुरलेले प्रकल्पग्रस्त एकत्र यावेत, ही आमची इच्छा होती. त्यानुसार कमिटी निर्माण होऊन प्रश्न निकाली लागतील, असा विश्वास व्यक्त करून सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर प्रकल्पग्रस्तांच्या बाजूने सहकार्य करीत असल्याची माहिती त्यांनी दिली.बैठकीला आमदार बाळाराम पाटील, भाजपचे जिल्हा प्रवक्ते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती राजेंद्र पाटील, निलेश पाटील, भूषण पाटील, अविनाश पाटील, जे. डी. तांडेल, सुरेश पाटील, सुदाम पाटील, सुधाकर पाटील, नंदराज मुंगाजी यांच्यासह प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply