Breaking News

रायगड पोलीस संघ उपांत्य फेरीत

मुंबई : प्रतिनिधी

शिवनेरी सेवा मंडळाने आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या स्व. मोहन नाईक चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेच्या पुरुष गटात एअर इंडिया, महिंद्रा, देना बँक या मुंबईच्या संघांबरोबर रायगडच्या पोलीस संघाने; तर महिला गटात महात्मा गांधी, संघर्ष या उपनगरच्या संघांबरोबर मुंबईचा शिवशक्ती आणि खेड-रत्नागिरीचा अनिकेत स्पोर्ट्स यांनी उपांत्य फेरीत धडक दिली. एअर इंडिया वि. रायगड पोलीस, महिंद्रा वि. देना बँक अशा पुरुषां त; तर शिवशक्ती वि. संघर्ष, महात्मा गांधी वि. अनिकेत अशा महिलांत उपांत्य लढती होतील.

पुरुषांच्या पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात एअर इंडियाने जे. जे. हॉस्पिटलचा 32-10 असा पाडाव करीत उपांत्य फेरीत कूच केली. एअर इंडियाचा डावा मधरक्षक संकेत सावंत याने जे. जे. हॉस्पिटलच्या पहिल्याच चढाईत राकेश खैरनाकची पकड करीत एअर इंडियाचे गुणांचे खाते खोलले. जे.जे.नेदेखील त्याला प्रत्युत्तर देत सुशांत साईलची पकड करीत पहिला गुण घेतला. एअर इंडियाने 7व्या मिनिटाला पहिला लोण देत 11-03 अशी आघाडी घेतली. पुन्हा मध्यांतर होता होता दुसरा लोण देत मध्यांतराला 22-06 अशी आपली आघाडी वाढविली. मध्यांतरानंतर पाचच मिनिटांत तिसरा लोण देत एअर इंडियाने 31-07 अशी सामन्यावर घट्ट पकड बसविली. पंकज मोहिते, सुशांत साईल यांच्या झंझावाती चढाया, त्याला संकेत सावंत, शुभम शिंदे, आदिनाथ गवळी यांच्या भक्कम पकडी यामुळे जे.जे.चा संघ पुरता नामोहरम झाला. त्यांचा मयूर शेख बरा खेळला.

दुसरा उपांत्य सामना अत्यंत चुरशीने खेळला गेला. त्यात देना बँकेने बँक ऑफ इंडियाला 36-35 असे चकवित उपांत्य फेरीत धडक दिली. मध्यांतरापर्यंत दोन लोण देत 25-18 अशी आघाडी घेणार्‍या बँक ऑफ इंडियाला शेवटच्या क्षणी संयम राखणे जमले नाही आणि त्यांना अवघ्या 1 गुणाने चुटपुटता पराभव पाहावा लागला. शेवटची 5 मिनिटे पुकारली तेव्हा 33-30 असा बँक ऑफ इंडियाच्या बाजूने गुणफलक होता. शेवटच्या मिनिटात देना बँकेच्या नितीन देशमुखने 2 गडी टिपत 35-35 अशी बरोबरी साधली आणि शेवटी एक पकड करीत देना बँकेचा विजय साकारला. 40 मिनिटांच्या सामन्यात 38 मिनिटे बँक ऑफ इंडियाचे पारडे जड होते. शेवटच्या दोन मिनिटांत मात्र देशमुखने संयम राखत सामना आपल्या बाजूला झुकवला. देशमुखला या विजयात सागर सुर्वे, आकाश गोजारे यांची उत्तम साथ लाभली. बँक ऑफ इंडियाच्या रोहित आधटराव, संतोष वारकरी, लक्ष्मण दोलतोडे यांच्या उत्कृष्ट खेळावर शेवटच्या दोन मिनिटांत पाणी फेरले गेले. महिंद्राने आनंद पाटील, ओमकार जाधव, ऋतुराज कोरवी, स्वप्नील शिंदे यांच्या तुफानी खेळाच्या जोरावर युनियन बँकेला 48-37 असे नमविले. बँकेकडून रोहन उके, सौरभ पाटील, अक्षय पाटील उत्तम खेळले. शेवटच्या सामन्यात रायगड पोलीसने सेंट्रल बँकेचा 37-10 असा सहज पराभव केला. बिपीन थळे, राजू पाटील, मयूर कदम, संकेत बनकर या विजयाचे शिल्पकार ठरले. बँकेचा धनंजय सरोज एकाकी लढला.

महिलांच्या उपांत्यपूर्व सामन्यात स्वराज्यचा 42-18 असा धुव्वा उडविला गेला. पूर्वार्धातच 3 लोण देत 30-06 अशी मोठी आघाडी घेणार्‍या संघर्षने नंतर मात्र सावध खेळ करीत हा विजय साकारला. कोमल देवकर, प्रणाली नागदेवते, पूजा जाधव, अश्विनी कांबळे यांचा या विजयात महत्त्वाचा वाटा होता. स्वराज्यच्या अंजली रोकडे, ऋतिका घाडीगावकर बर्‍या खेळल्या. अनिकेतने जागृतीवर 30-26 अशी मात करीत आगेकूच केली. मध्यांतराला 16-12

अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेणार्‍या अनिकेतने उत्तरार्धात सावध खेळ करीत हा विजय साकारला. सायली शिंदे, वैशाली जाधव या विजयाच्या शिल्पकार ठरल्या.

शिवशक्तीने शिवतेजला 57-24 असे नमवत गुणांचे अर्धशतक पार केले. मध्यांतराला 20-14 अशी आघाडी घेणार्‍या शिवशक्तीने उत्तरार्धात आणखी जोशपूर्ण खेळ करीत हा विजय मोठ्या फरकाने मिळविला. शेवटच्या सामन्यात महात्मा गांधी संघाने डॉ. शिरोडकर संघाचा 32-17 असा पराभव केला.

Check Also

शिर्डीतील साईबाबांच्या पादुकांचा पनवेलमध्ये दर्शन सोहळा

नियोजन बैठकीत तयारीचा आढावा पनवेल ः रामप्रहर वृत्तपनवेल परिसरातील साईभक्तांसाठी आनंदाची बातमी आहे. येत्या 18 …

Leave a Reply