Breaking News

पती निघाला ‘मुन्नाभाई’

पत्नीला फसविल्याचे अकरा वर्षानंतर झाले उघड

पनवेल : रामप्रहर वृत्त

अकरा वर्षांनंतर आपला पती डॉक्टर नसल्याचे समजल्यामुळे त्याच्या डॉक्टर पत्नीने आपल्या पतीविरोधात फसवणूक केल्याचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात दाखल केला आहे. संबंधित डॉक्टरला पनवेल शहर पोलिसांनी रविवारी अटक केली असून त्याला (दि. 5)पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बोगस डॉक्टर म्हणून त्याची ओळख लपविण्यासाठी त्याला सहाय्य केल्याप्रकरणी त्याचे नातेवाईक व ज्या रुग्णालयात हा बोगस डॉक्टर प्रॅक्टीस करीत होता, त्या रुग्णालयाच्या मालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पनवेलमधील उच्च्शिक्षित कुटुंबातील डॉक्टर तरुणीचा विवाह पेण तालुक्यातील डॉक्टर तरुणासोबत झाला होता. महेंद्र बामा पाटील, असे या प्रकरणी अटक असलेल्या तरुणाचे नाव आहे. महेंद्र हा पेण येथील अनेक रुग्णालयात प्रॅक्टीस करीत होता. याच परिसरात त्याची पत्नी वैद्यकीय सेवेचे काम करीत होती. हा तरुण पेण येथील बड्या रुग्णालयांमध्ये वैद्यकीय सेवेसाठी जात असल्याने संबंधित तरुणीचा व तिच्या नातेवाईकांचा तो डॉक्टर असल्यावर विश्वास बसला. 2007साली त्यांचा विवाह झाला. या जोडप्याला सात वर्षांचे अपत्यही आहे.

वैद्यकीय शिक्षण कुठे झाले, या प्रश्नावर नेहमी वेळ मारून नेण्याची उत्तरे पतीकडून मिळत असल्याने पत्नीचा संशय बळावला. या प्रकरणात अटकेत असलेल्या महेंद्र याने अनेक रुग्णांवर पेण येथील विविध खाासगी रुग्णालयांमधून उपचार केले आहेत. डॉक्टरांच्या विविध परिषदांमध्येही तो सामील झाला आहे. अनेक सामाजिक संस्थांच्या तो पदाधिकारी आहे. आपण भारती विद्यापीठ, पुणे व बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे येथे वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले, असे त्याने लग्नापूर्वी पत्नीला सांगितले होेते. त्यानंतर तो पेणमध्ये फिजिशियन म्हणून प्रॅक्टीस करीत होता. त्याचे बिंग फुटल्यावर पत्नीने वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित कोणतेच कामकाज करण्यास त्याला मनाई केली. पण त्याने प्रॅक्टीस चालूच ठेवली. त्याने इमानदारीच्या वाटेवर चालावे, यासाठी तिने त्याला संधी दिली, परंतु त्याच्यात काहीच बदल घडला नाही. उलट त्याने तिच्या चारित्र्यवर शिंतोडे उडविण्यास सुरु केले व ती आपल्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून हे करतेय, असा सगळीकडे बोभाटा करु लागला. पण ती स्वतः आर्थिकदृष्ट्या सक्षम असल्यामुळे तिने कधीच त्याच्याकडून आर्थिक अपेक्षा केली नाही. अखेर ही सर्व सामाजिक फसवणूक असल्याचे मत डॉक्टर पत्नीचे झाल्यावर त्यांनी पोलिसांत धाव घेतल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.

Check Also

नितीन पाटील यांच्या रूपाने पनवेलला मिळणार पहिला आगरी समाजाचा महापौर

उपमहापौरपदासाठी प्रमिला पाटील यांचा अर्ज दाखल पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौरपदाकरिता होणार्‍या …

Leave a Reply