Breaking News

रोपवेची मंजुरी अंतिम टप्प्यात ; जगातील सर्वात लांब ठरणार एलिफंटा-शिवडी प्रकल्प

उरण : बातमीदार

मुंबईच्या किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलण्याच्या प्रयत्नात असलेल्या मुंबई पोर्ट ट्रस्टच्या एलिफंटा-शिवडी रोपवे या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला मंजुरी मिळण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने याबाबत आवश्यक ते सर्व साहाय्य करण्याची ग्वाही केंद्रीय नौकानयन मंत्रालयाला दिली आहे. पर्यटनमंत्र्यांची नुकतीच याबाबत नौकावहन मंत्र्यांसोबत दिल्लीत बैठक झाली. त्यात हा प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे ठरविले आहे.एलिफंटा-शिवडी यांना जोडणारा हा आठ किमी अंतराचा प्रस्तावित रोपवे पूर्ण झाल्यानंतर तो समुद्रावरील जगातील सर्वात लांब रोपवे ठरणार आहे. ‘युनेस्को’च्या हेरिटेज यादीत असलेल्या एलिफंटा येथील गुहांचे दर्शन घेणे पर्यटकांना यामुळे सहज सोपे होईल. या रोपवेची उंची समुद्रसपाटीपासून 50 ते 125 मीटरपर्यंत असेल. यासाठी आठ ते 10 टॉवर समद्रात उभारण्यात येणार आहेत. हा प्रवास सुरक्षित व वेगवान व्हावा यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे. याचा वेग आठ मीटर प्रति सेकंद असेल व किमान 15 मिनिटांत एका टोकावरून दुसर्‍या टोकावर जाणे शक्य होईल. केबिनमध्ये प्रवाशी क्षमता 20 ते 35पर्यंत असेल. मुंबईतील जलपर्यटनाच्या आकर्षणाचा हा केंद्रबिंदू ठरेल. त्यामुळे पर्यटनाला अधिक चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

पनवेल मनपा प्रभाग समित्यांवर भाजप महायुतीचे चारही उमेदवार विजयी

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महानगरपालिका प्रभाग समित्यांच्या सभापतिपदाची निवडणूक मंगळवारी (दि.११) पार पडली. या निवडणुकीत …

Leave a Reply