Breaking News

पनवेल होर्डिंगमुक्त

आचारसंहितेच्या घोषणेनंतर कार्यवाही

पनवेल ः बातमीदार

आचारसंहितेची घोषणा होताच पनवेल महापालिकेची अतिक्रमणविरोधी पथके सक्रिय झाली आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांच्या आदेशाने पनवेल शहरातील प्रत्येक बेकायदा बॅनर काढण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शनिवारी सुरू झालेली कारवाई सोमवारीदेखील मोठ्या वेगाने सुरू असल्यामुळे पनवेल शहर आचारसंहितेच्या निमित्ताने पुन्हा बॅनरमुक्त झाले आहे.

 विधानसभा निवडणुकीसाठी शनिवारी दुपारी 12 वाजल्यापासून आचारसंहिता लागू झाल्याची घोषणा झाली. आचारसंहितेची घोषणा होताच महापालिका आयुक्तांनी पनवेल महापालिका क्षेत्रातील राजकीय पक्षाच्या बॅनरबाजीसह अन्य खासगी संस्था संघटनांचे बेकायदा बॅनर काढण्याचे आदेश संबंधित प्रभाग अधिकार्‍यांना दिले आहेत. आयुक्त गणेश देशमुख यांनी महापालिकेतील प्रभाग अधिकार्‍यांसाठी विशेष नोटीस काढून सर्व शासकीय कार्यालयातील लेखन, पोस्टर, कटआऊट, होर्डिंग, बॅनर, झेंडे काढून टाकणे, रेल्वेस्थानक, रेल्वेपूल, रस्ते, शासकीय बस, वीज व दूरध्वनी खांब, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या इमारती, खासगी जागेतील सर्व बेकायदा बॅनर काढणे, शासकीय वाहनांवर उमेदवार आणि राजकीय पक्षांच्या वापरासाठी बंदी घालणे, महापालिका वेबसाइटवरील राजकीय नेत्यांचे फोटो काढणे, बांधकाम क्षेत्रातील कामांची यादी जाहीर करणे आदी कामे करण्याचे आदेश देऊन 24 तास, 36 तास आणि तत्काळ, असे विभाजन करण्यात आले होते.

त्याप्रमाणे शनिवारपासूनच महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकांनी बेकायदा बॅनर हटविण्याचे काम सुरू केल्यामुळे पनवेल महापालिका क्षेत्रातील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, कामोठे, तळोजे, कळंबोली, खारघर आदी वसाहतींमधील सर्व बॅनर काढण्यात आले आहेत. दिवसभर महापालिकेच्या गाड्या फिरत असल्यामुळे अवघ्या काही तासांपूर्वी बिगर राजकीय कार्यक्रमांचे लागलेले बॅनरदेखील काढण्यात आल्यामुळे अनेकांची धावपळ झाली. आचारसंहितेमुळे बॅनर काढण्यात आल्याची माहिती कळताच प्रभाग कार्यालयात जप्त केलेले बॅनर घेण्यासाठी संस्थांच्या पदाधिकार्‍यांची धावपळ झाल्याचे चित्र आहे.

Check Also

‌‘नेहले पे देहला‌’ @ ५० वर्षे; पडद्यामागच्या गोष्टी जास्त रंजक

सुनील दत्तच्या वांद्य्रातील पाली हिलवरील अजंठा बंगल्यातील तळघरात असलेल्या मिनी थिएटरमध्ये एखादा चित्रपट अथवा गाणी …

Leave a Reply