कर्जत : बातमीदार
कर्जत मतदारसंघात अनेक मातब्बर नेते विधानसभा निवडणुकीसाठी गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले असताना उमेदवार म्हणून रोज एका नव्या नावाची चर्चा दोन्ही तालुक्यांत सुरू होती. त्यात राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश केलेले रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे आणि माजी आमदार देवेंद्र साटम यांची नावे आघाडीवर होती, मात्र उमेदवारी अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत दोघांनीही अर्ज सादर केले नाहीत. त्यामुळे त्यांच्या नावाच्या केवळ अफवाच असल्याचे सिद्ध झाले आहे. कर्जत खालापूर मतदारसंघ हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला, मात्र सेनेतील बंडखोरीने आमदारकीची माळ तब्बल दोन वेळा राष्ट्रवादीचे सुरेश लाड यांच्या गळ्यात पडली. 2014 साली शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवलेले महेंद्र थोरवे हे त्या निवडणुकीनंतर पुन्हा शिवसेनेत सक्रिय झाले. या विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार म्हणून थोरवे हे प्रमुख दावेदार होते. महायुतीत शिवसेनेने हा मतदारसंघ राखून ठेवला. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेतून थोरवेंसह तब्बल आठ जण इच्छुक झाले, मात्र शिवसेना पक्षनेतृत्वाने महेंद्र थोरवे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून शिवसेनेत दाखल झालेले सुरेश टोकरे आणि भाजपमध्ये दाखल झालेले माजी आमदार देवेंद्र साटम हे दोघे आमदारकी लढवण्यासाठी इच्छुक होते. दरम्यान, नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा शुक्रवार हा अखेरचा दिवस होता, परंतु दुपारी 3 वाजेपर्यंत देवेंद्र साटम आणि सुरेश टोकरे यांनी नामनिर्देशन पत्र सादर केले नाही. त्यामुळे साटम आणि टोकरे यांच्या नावाच्या फक्त अफवाच असल्याचे सिद्ध झाले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper