


कोकणची माणसे साधीभोळी, त्यांच्या काळजात भरली शहाळी, असे म्हणतात ते खरंच आहे, म्हणूनच त्याचा फायदा कोकण रेल्वेने घेऊन त्यांच्यावर सतत अन्याय केला आहे. कोकण रेल्वेच्या माध्यमातून रेल्वेला चांगले उत्पन्न मिळत असतानाही प्रकल्पग्रस्त रायगड जिल्ह्याला रेल्वेने सापत्न वागणूक दिली आहे. त्यामुळेच रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रायगड जिल्हा भाजपचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांना रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांची भेट घेऊन पनवेलसह रायगड जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या सोडविण्यासाठी आग्रही मागणी करावी लागली.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्ह्यातील रेल्वेच्या समस्या सोडविण्यात पुढाकार घेतल्याने रायगडवासीयांना निश्चितच आनंद झाला असेल. कारण कोकण रेल्वे रायगड जिल्ह्यातून जाते. या रेल्वे प्रकल्पासाठी रायगडमधील शेतकर्यांनी आपल्या जमिनी दिल्या, पण या रेल्वेचा फायदा मात्र रायगडवासीयांना फारसा झालाच नाही. दक्षिणेतील केरळ, तामिळनाडू आणि गोवा या राज्यांनाच याचा जास्त फायदा झाला. त्यांचा वेळ आणि पैसा वाचला. त्यांच्या राज्यात दर 20 मिनिटांनी थांबणारी कोकण रेल्वे रायगडमध्ये मात्र थांबत नाही. ज्या गाड्यांना रोहा किंवा माणगाव येथे थांबा दिला आहे, त्या गाड्यांनी सकाळी मुंबईला येऊन काम आटोपून पुन्हा रात्री परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे रायगडवासीयांना लाल परीचा आणि शिवशाहीचाच आधार घ्यावा लागतो. कोकण रेल्वे प्रकल्पासाठी जागा दिली त्या वेळी रायगडमधील शेतकर्यांनी स्वप्न पाहिले होते की आपण आपला शेतमाल घेऊन सकाळी मुंबईला जाऊन रात्री परत घरी येऊ, पण ते स्वप्नच ठरले. त्यामुळे खड्डेमय गोवा महामार्गावरून आदळत -आपटत आपल्या शरीराच्या अनेक भागाला दुखापतग्रस्त करून किंवा कायमचे अधू करून डॉक्टरची बिले मात्र तो देत आहे. त्याचवेळी कोकण रेल्वे धडधडत समोरून जाते व त्यातून दक्षिणेकडील माणूस आरामात प्रवास करीत असल्याचे पाहणे त्यांच्या नशिबी आले आहे. कोकण रेल्वेमार्गावरून जाणार्या गाड्या तोट्यात नाहीत. कोलाड स्टेशनवरून जाणार्या रो-रो सर्व्हिसमुळे कोकण रेल्वेला कोट्यवधींचा फायदा होतो. या मार्गाचे दुहेरीकरणाचे काम सुरू आहे. रोह्यापर्यंतचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आता या मार्गावरून रायगड जिल्ह्यातील लोकांना सोयीस्कर ठरतील अशा गाड्या सुरू करणे आवश्यक आहे.
या गाड्या वीर किंवा माणगावाहून सोडणे आवश्यक आहे. त्यामुळे रायगडबरोबरच रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली व मंडणगड या तालुक्यातील लोकांनाही त्याचा फायदा होईल. ईमू गाडी सध्या 12 डब्यांची असून ती दिवा-रोहा आणि पेण-दिवा चालवली जाते. ती गाडी 15 डब्यांची करून तिच्या फेर्या वाढवणे गरजेचे आहे. पनवेल-कर्जत मार्गावरील गर्दी पाहता या मार्गावरही अशीच गाडी सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. अलिबागसाठी आरसीएफ मार्गावरून शटल सेवा सुरू करण्याची अनेक दिवसांची मागणी आहे. याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात आहे. रायगड जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात साईभक्त शिर्डी, गजानन महाराजांचे भक्त शेगाव व वारकरी पंढरपूर येथे जातात. त्यांच्या सोयीसाठी पनवेलहून गाडी नाही. यासाठी शिर्डीसाठी व विदर्भात नागपूरसाठी गाडी पनवेल किंवा रत्नागिरीहून सोडल्यास व या गाड्यांना तालुक्याच्या ठिकाणी थांबा दिल्यास त्याचा फायदा रायगडवासीयांना होईल. कोकण रेल्वेमार्गावर रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी रेल्वे फाटक आहेत. या ठिकाणी अनेक वेळा अपघात होतात. रोहा आणि पनवेल येथील फाटक उघडल्यामुळे गाड्यांना उशीर होतो. रोहा येथील दोन्ही फाटकांसाठी पूल राज्य आणि केंद्र शासनाच्या सहभागातून बांधण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. पनवेलसाठी भुयारी मार्ग पूर्ण होत आला आहे. नवीन पनवेलमधून जुन्या पनवेलमध्ये (तक्का) जाण्यासाठी रेल्वेचे सुरू असलेले भुयारी मार्गाचे काम डिसेंबर 2017पासून बंद पडले होते. या भुयारी मार्गासाठी 10 कोटींपेक्षा जास्त खर्चाला मंजुरी मिळाली असून रेल्वेमार्गाखाली सिमेंटचे ब्लॉक टाकून झाले आहेत. दोन्ही बाजूला काही मीटर रस्त्याचे काम अपूर्ण आहे. दिवाळीनंतर हा मार्ग सुरू होऊ शकतो. यामधून फक्त छोट्या गाड्याच जाऊ शकतात. मिनीबस, टेम्पो किंवा ट्रक जाऊ शकणार नाहीत. त्यामुळे भविष्यात उसर्ली, विचुंबे किंवा नवीन पनवेलमधून बससेवा सुरू केल्यास या मार्गाचा उपयोग होणार नाही. पनवेलच्या वाढत्या शहरीकरणाचा विचार केला तर या मार्गातून बससेवा सुरू होणे गरजेचे ठरणार आहे. पनवेलमधील भुयारी मार्ग हा फक्त पनवेलकरांच्या सोयीसाठी बनवत असल्याचे रेल्वे दाखवत असली तरी रेल्वे फाटक उघडल्यामुळे रेल्वेला आपल्या अनेक गाड्यांना लिंकमध्ये थांबवावे लागते. त्यामुळे रेल्वेचे वर्षाला कोट्यवधी रुपयांचे नुकसान होते. यासाठी रेल्वे हा खर्च करीत आहे.
-नितीन देशमुख, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper