विंडीजविरुद्ध मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघाच्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत बदलांची मालिका सुरूच आहे. सर्वांत प्रथम पहिल्या टी-20 सामन्याचे ठिकाण बदलण्यात आल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) नो-बॉलचा निर्णय देण्याची जबाबदारी तिसर्या पंचांकडे सोपवली. आता मालिकेला सुरुवात होण्याआधीच भारतीय संघात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. सलामीवीर शिखर धवन दुखापतग्रस्त झाल्यामुळे विंडीजविरुद्धच्या मालिकेला मुकणार आहे. धवनच्या जागी संजू सॅमसनची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे.
बांगलादेशविरुद्ध मालिकेत संजू सॅमसनला भारतीय संघात स्थान मिळाले होते, मात्र त्याला अंतिम संघात खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर विंडीजविरुद्ध मालिकेत निवड समितीने संजूला डावलल्यामुळे चाहत्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती, मात्र शिखर धवनला झालेल्या दुखापतीमुळे संजूला आता भारतीय संघात स्थान मिळाले आहे. सय्यद मुश्ताक अली टी-20 स्पर्धेत खेळत असताना धवनच्या डाव्या गुडघ्याला दुखापत झाली आहे.
पुढील महिन्यात भारत व वेस्ट इंडिजमध्ये तीन सामन्यांची टी-20 मालिका होणार आहे. यातील पहिला सामना 6 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये होणार आहे. दुसरा सामना 8 डिसेंबरला तिरुवअनंतपुरममध्ये, तर अखेरचा सामना 11 डिसेंबरला मुंबईत खेळवला जाणार आहे.