12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी
पनवेल ः प्रतिनिधी
500 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, मात्र वैद्यकीय कारण पुढे करून ते जामिनासाठी धडपड करीत आहेत. त्यांना निवडणूक लढविताना तसेच जेलमध्ये जाईपर्यंत वैद्यकीय कारण कसे आडवे आले नाही, असा सवाल व्यक्त होत आहे.
कोट्यवधी रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याला सर्वप्रथम आमदार प्रशांत ठाकूर आणि आमदार महेश बालदी यांनी कर्नाळा बँक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून वाचा फोडली होती. बँकेचे ठेवीदार, खातेदार यांना त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावे यासाठी या दोन्ही आमदारांनी वेळोवेळी आवाज उठविला. त्याचबरोबर दोषींवर कारवाई व्हावी याकरिता विविध यंत्रणांकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. अखेर बँकचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील यांना 15 जून रोजी ईडीकडून पनवेलमधील राहत्या घरातून अटक करण्यात आली होती. कर्नाळा बँक घोटाळ्यात पैशांची अफरातफर झाल्याचा आरोप आहे.
ईडीने विवेक पाटील यांना सुरुवातीला 25 जूनपर्यंत कोठडी सुनावली होती. त्यानंतर त्यांच्या कोठडीत तीन दिवसांची वाढ करण्यात आली. पाटील यांची ईडी कोठडी 28 जून रोजी संपल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली तसेच त्यांची रवानगी आर्थर रोड तुरुंगात केल्याचे वृत्त आहे.
कर्नाळा बँकेत अनेकांनी आपली आयुष्याची पुंजी मोठ्या विश्वासाने ठेवली होती. यामध्ये सर्वसामान्य ठेवीदार, खातेदारांसह ग्रामपंचायतींचाही समावेश आहे, मात्र विवेक पाटील व त्यांच्या साथीदारांनी बँकेत गैरव्यवहार करीत या रकमेचा अपहार केला.