खोपोली : प्रतिनिधी
मुंबई-पुणे महामार्गावर खालापूरजवळील वावंढळ पुलावरून दोन दिवसांपूर्वी कोसळलेल्या ट्रकमधील कापूस पेटल्याने ट्रक जळून खाक झाल्याची घटना बुधवारी (दि. 8) दुपारी घडली असून, यामध्ये लाखो रुपयांचा कापूस जळून खाक झाला आहे. पनवेलच्या दिशेने कापूस घेऊन जाणारा ट्रक सोमवारी सकाळी वावंढळ गावानजीक अरूंद पुलावरून कठडा तोडून ओढ्यात कोसळला होता. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या चालकाला तातडीने कामोठे येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले होते. ट्रक मात्र ओढ्यातच पडून होता. बुधवारी दुपारी या ट्रकमधील कापसाने पेट घेतला. दुपारची वेळ असल्याने कापूस भरभर पेटला. स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने चौक पोलिसांना माहिती दिली. तातडीने खोपोली येथील अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. तीन तासांनंतर आग विझविण्यात यश आले, मात्र संपूर्ण कापूस जळून खाक झाला. आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.