Breaking News

पनवेल मनपा हद्दीतील श्वान निर्बिजीकरण केंद्र सुरू

पनवेल ः प्रतिनिधी
नवीन पनवेलमध्ये असलेल्या सिडकोच्या श्वान निर्बिजीकरण केंद्राचे हस्तांतरण झाल्यानंतर महापालिकेने ते चालवण्यासाठी मागविलेल्या निविदेला महिन्यापूर्वी स्थायी समितीने मंजुरी दिली. त्यानुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला या केंद्रात श्वान निर्बिजीकरणाला सुरुवात होऊन पहिल्या आठवड्यात 32 श्वानांवर शत्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला.
पनवेल महापालिका हद्दीत श्वानांच्या वाढलेल्या संख्येमुळे व श्वानांच्या हल्ल्याच्या भीतीने धास्तावलेल्या नागरिकांसाठी हे केंद्र सुरू होणे गरजेचे होते. महापालिका हस्तांतरणाच्या वादात ते बंद होऊ नये यासाठी नगरसेवक तेजस कांडपिळे व मनोज भुजबळ यांनी पाठपुरावा केला होता. नवीन पनवेलमधील विचुंबे पुलाजवळ असलेले श्वान निर्बिजीकरण केंद्र इंडिफेन्स ऑफ अ‍ॅनिमल संस्था चालवत होती. त्याचा खर्च सिडको करत होती. पनवेल महापालिका झाल्यानंतर नवीन पनवेलमधील श्वान निर्बिजीकरण केंद्राचा ताबा पनवेल महापालिकेकडे देण्याचा निर्णय सिडकोने घेतला. त्याचा खर्च परवडणारा नसल्याने महापालिकेने ताब्यात घेतले नाही म्हणून जून-जुलै 2017मध्ये हे केंद्र बंद ठेवण्यात आले होते. त्यानंतर दोन महिने संस्थेला मुदतवाढ मिळाली. पुन्हा डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती.
पनवेल महापालिका हद्दीत हे एकमेव केंद्र आहे. पनवेल पंचायत समिती आवारात महाराष्ट्र शासनाचे पशुसंवर्धन केंद्र पनवेल व उरण तालुक्यासाठी आहे. शासन नियमाप्रमाणे तेथे शेतकर्‍यांचे पशुधन गाई-म्हशी, बकर्‍या व कोंबड्यांवर उपचार केले जातात. महिन्याला सरासरी 400 प्राण्यांवर उपचार केले जातात. पनवेल महापालिका क्षेत्रात भटक्या कुत्र्यांची संख्या 30 हजारांवर असल्याचे सांगण्यात येते. त्यापैकी फक्त 1200 ते 1500 कुत्र्यांचेच निर्बिजीकरण झाले आहे.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply