Breaking News

खाडीतील माशांचे प्रमाण घटले

उरण : रामप्रहर वृत्त

विविध विकासकामांसाठी येथील समुद्रातून खाडीत येणार्‍या पाण्यासाठी असलेले नैसर्गिक नाले तसेच खाड्याही बुजविल्या जात असल्याने खाडी किनार्‍यावर येणार्‍या मासळीच्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.

डिसेंबरपासून हिवाळ्याच्या सुरुवातीलाच समुद्रातून लाखोंच्या संख्येने ताजी मासळी खाडीत येते, मात्र या वेळी समुद्राचे पाणीच खाडीत येण्याचे प्रमाण कमी झाल्याने मासळीच्या प्रमाणावर परिणाम होणार आहे. याचा फटका येथील स्थानिक मासेमारीवर होणार आहे. यामध्ये खास करून चिखलातून मिळणार्‍या कोळंबी, निवट्या व खुबे या चविष्ट मासळीला नागरिकांना मुकावे लागणार आहे. शेतीला जोड व्यवसाय म्हणून खाडीतील मासेमारीकडे पाहिले जात होते. समुद्रातून भरतीच्या वेळी मुबलक प्रमाणात नैसर्गिक नाल्यात मासळी येत असल्याने गाव व घराशेजारीच ही मासळी मिळत होती. मात्र, सिडको तसेच चौथ्या बंदरासह इतर विकास कंपन्यांनी या परिसरातील तसेच गावपरिसरातील नैसर्गिक नाले आणि खाडीची मुखे हळूहळू बुजविली आहेत.

त्यामुळे खाडींची मुखेही हळूहळू बंद पाडण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे समुद्रामार्गे खाडीत येणार्‍या पाण्याचा प्रवाह कमी झाला आहे. त्यातून याच प्रवाहाद्वारे खाडीत येणार्‍या ताज्या मासळीचेही प्रमाण मागील अनेक वर्षांत हळूहळू कमी होऊ लागले आहे. खाडीतून नाल्यात येणार्‍या पाण्याच्या प्रवाहावर मासळी पकडणारे स्थानिक मासेमारांचा व्यवसाय हिवाळ्याच्या काळात चांगला होत असतो. मात्र, यंदा त्याला फटका बसणार असल्याची खंत येथील स्थानिक मच्छीमार करीत आहेत.

हिवाळ्याच्या पहिल्याच हंगामात हौशी मंडळी आणि कोळीबांधव खाडीत मासळी पकडण्यास जातात, परंतु यंदा हा हंगाम सुरू होऊनही खाडीत माशांचा वावर अनेकांच्या नजरेस पडलेला नाही. त्यामुळे जाळी टाकून बसलेले काही जण नाराज आहेत. हिवाळ्यातील मासेमारीतून बर्‍यापैकी उत्पन्न हाती लागते, मात्र यंदा ही संधी सुटल्यात जमा आहे.

-मच्छीमार

Check Also

तळोजातील आयशा हॉटेलने केले अनधिकृत बांधकाम; हॉटेलच्या आडून मदरसा

कारवाई करण्याची आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह नागरिकांची मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त तळोजा फेज 1मधील …

Leave a Reply