

महाड ़़: प्रतिनिधी
कोकण रेल्वेच्या वामणे स्थानकात सोमवारी (दि. 27) रात्री गाडीतून उतरणारे सहा प्रवासी खाली पडले आणि काही सेकंदात गाडी सुरू झाली, मात्र हे पडलेले प्रवासी एकमेकांना आधार देत बाहेर आल्याने मोठी दुर्घटना टळली, मात्र या धडपडीत यातील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. जुना फलाट काढून टाकल्याने आणि क्षणात रेल्वे सुरू झाल्याने हा अपघात घडल्याची माहिती प्रवाशांनी दिली. कोकण रेल्वेच्या दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. वामणे रेल्वे स्थानकातील जुना फलाटदेखील या कामात काढून टाकण्यात आला आहे. यामुळे रेल्वेतून जमिनीवर उतरावे लागत आहे. वामणे रेल्वेस्थानकातील जुन्या फलाटावर सोमवारी रात्री 9.15 वाजता दादर-रत्नागिरी ही गाडी येऊन थांबली. एका डब्यातून 14 प्रवासी वामणे येथे उतरणारे होते. जुना फलाटदेखील कमी उंचीचा असल्याने शिडीवरून उतरताना प्रवाशांना उशीर झाला. काही जण खाली उतरले तर काही प्रवासी डब्यात असतानाच रेल्वे सुरू झाली. यामुळे डब्यातील प्रवाशांनी उड्या टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातील दत्ताराम सखाराम बोटेकर, दीपाली दत्ताराम बोटेकर, सुजाता गजानन चिविलकर (रा. सापे), नरेंद्र विठोबा रेशीम (रा. शिरगाव), श्रद्धा संजय शिगवण (तेलंगे), वेदांत शिगवण हे प्रवासी खाली पडले. ते एकमेकांना आधार देत बाहेर आले, मात्र त्यात ते जखमी झाले. त्याची माहिती मिळताच कोकण रेल्वे प्रकल्पग्रस्त कृती समितीचे अध्यक्ष मन्सूर देशमुख, वामणे सरपंच प्रवीण साळवी, ग्रामस्थ फौजान देशमुख, फाईक देशमुख, प्रकाश जंगम, मंगेश निर्मल हे तत्काळ वामणे स्थानकात दाखल झाले. त्यांनी जखमींना तत्काळ मदत केली. मन्सूर देशमुख यांनी रेल्वे आणि पोलीस प्रशासनाला घडला प्रकार दूरध्वनीवरून कळविला.
वामणे स्थानकात रेल्वेमार्गाचे दुपदरीकरण व क्रॉसिंगचे काम सुरू आहे. यामुळे जुना फलाट काढून टाकण्यात आला आहे. तेथे प्रवाशांना उतरण्याकरिता मातीचा कमी उंचीचा तात्पुरता फलाट तयार केला. त्यामुळे रेल्वेमधून शिडीने खाली उतरावे लागते. वयोवृद्ध, महिला आणि मुलांना उतरताना कसरत करावी लागत आहे. यामुळे असे अपघात होत असल्याचा आरोप कृती समितीने केला. नवीन होणार्या फलाटाची व सध्या केलेल्या फलाटाची उंची वाढवावी, अशी मागणी समितीमार्फत करण्यात आली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper