Breaking News

खोपोलीत थांबली रस्त्यांची कामे; निधी मंजूर असूनही नगर परिषद प्रशासनाचा कानाडोळा

खोपोली : प्रतिनिधी

शहरातील शास्त्रीनगर भागामधील रस्त्यांच्या कामांना मागील महिन्यात सुरुवात करण्यात आली, त्यावेळी टप्याटप्याने शहरातील सर्वच रस्त्यांची डागडुजी व डांबरीकरण होईल, असे खोपोली नगरपालिकेकडून स्पष्ट करण्यात आले होते. मात्र येथील एकाच रस्त्यांचे काम पूर्ण झाल्यानंतर यंत्रणा गायब झाली. त्यामुळे या भागातील अन्य रस्त्यांचे काय? शहरातील अन्य रस्त्यांची  कामे होणार आहेत की नाही, अशी शंका निर्माण होत असल्याने  नागरिकांत नाराजी व्यक्त होत आहे.

यंदाचे सुवर्ण महोत्सवी वर्ष धडाकेबाज विकासकामांनी साजरा करण्याचा मनोदय खोपोली नगरपालिका प्रशासन व सर्व लोकप्रतिनिधींनी केला आहे. मात्र फेब्रुवारी महिना अर्धा सरला तरी शास्त्रीनगरचा एक रस्ता सोडल्यास पूर्णतः खड्डेमय बनलेल्या येथील रस्त्यांच्या कामांना गती मिळालेली नाही. खड्डेमय रस्ते, सर्वत्र धुळीचे लोट ही खोपोली नगरपालिकेची सुवर्णमहोत्सवी वर्षात सर्वात मोठी समस्या बनली असल्याने नागरिकांत नगरपालिका कारभारावर नाराजी वाढत आहे.

खोपोलीतील रस्ते विकास, दुरुस्ती व डांबरीकरण यासाठी एमएमआरडीएकडून 10 कोटी निधी मंजूर असल्याचे नगरपालिकेकडून मागील तीन महिन्यापासून सांगितले जात आहे.तसेच नगरपालिकेकडून 25 कोटींचा निधी रस्त्यांच्या कामांसाठी खर्च होणार असल्याचेही सर्वसाधारण सभेत सांगितले गेले होते.त्यामुळे एकूण 35 कोटींचा निधी फक्त रस्त्यांच्या कामांसाठी मंजूर असूनही कामे का होत नाहीत, हे न उलगडणारे कोडे बनले आहे. दुसरीकडे रस्त्यांची अतिशय खराब अवस्था झाल्याने नागरिकांना डोळ्यात तेल घालून व जीवमुठीत घेऊन खोपोली शहरात पायी किंवा वाहनाने चालावे लागत आहे.

स्वच्छता व चांगले रस्ते हेच शहराचे खरे वैभव असते. यातून नगरपालिका कारभाराचे प्रतिबिंब व्यक्त होते. मात्र शहरातील रस्त्यांच्या अतिशय खराब स्थितीवरून खोपोली ही खरंच 100 कोटींपेक्षा अधिक बजेट असलेली श्रीमंत नगरपालिका आहे का ? हा प्रश्न निर्माण होत आहे.

-प्रवीण उर्फ बंडू क्षीरसागर,

सामाजिक कार्यकर्ता, खोपोली

शहरातील प्रमुख 16रस्त्यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, तांत्रिक बाबी व निविदा प्रक्रियाही अंतिम टप्प्यात आहे. एमएमआरडीएकडून निधी मंजूर असला तरी अद्याप तो नगरपालिकेला उपलब्ध झालेला नाही. त्यासाठी सतत पाठपुरावा सुरू आहे. नगरपालिकेकडूनही निधीची पूर्तता होण्याची आवश्यकता आहे. लवकरच या अडचणी सुटतील व रस्त्यांच्या कामांना गती येईल. -सुमन औसरमल, नगराध्यक्षा, खोपोली

Check Also

कोप्रोली येथे पाणीपुरवठा योजनेचा शुभारंभ

भाजप तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते भूमिपूजन पनवेल : रामप्रहर वृत्त केंद्र सरकारची महत्त्वपूर्ण योजना …

Leave a Reply