नागरी कामे होत नसल्याने धडक
खारघर : प्रतिनिधी
वारंवार निवेदन, पत्र देऊनदेखील सिडकोमार्फत कामे होत नसल्याने खारघर शहरातील भाजप नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शहरातील विभागीय सिडको कार्यालयात सोमवारी (दि. 23) ठिय्या आंदोलन केले. लेखी आश्वासन दिल्याशिवाय कार्यालय सोडणार नाही अशी भूमिका घेत सुमारे पाच तास भाजपचे शिष्टमंडळ सिडकोचे अधिकारी संजय पुदाळे यांच्या दालनात बसले होते. अखेर भाजपचा हा आक्रमक पवित्रा पाहून पुदाळे यांनी शिष्टमंडळाला काम करण्याचे लेखी आश्वासन दिले.
खारघरमधील अंतर्गत रस्ते, नाले, गटार, कोपरा पूल आदींसह विविध कामे सिडकोमार्फत योग्य पद्धतीने होत नसल्याने भाजप शिष्टमंडळाने सोमवारी सकाळी 10 वाजल्यापासून शहरातील सिडको कार्यालयातील अधिकारी संजय पुदाळे यांच्या दालनात ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनात भाजप शहराध्यक्ष ब्रिजेश पटेल, स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील, प्रभाग समिती ‘अ’चे अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक अभिमन्यू पाटील, नरेश ठाकूर, नगरसेविका अनिता पाटील, संजना कदम, हर्षदा उपाध्याय, आरती नवघरे, अनिता पाटील, हर्षदा उपाध्याय, खारघर मंडल उपाध्यक्ष दिलीप जाधव, सरचिटणीस दीपक शिंदे, किर्ती नवघरे,विना गोगरी, संजय घरत, निर्दोष केणी, समीर कदम, संजय घरत, राजेंद्र मांजरेकर, अजय माळी, अशोक पवार, अनिल साबणे, संदीप कासार, विपूल चौटालिया, कुणाल संघांनी, काशिनाथ घरत, विलास निकम, रमेश तपासे, साजिद पटेल, एस. के. डोळस, कृष्णा खडगी, वासुदेव पाटील, अमर उपाध्याय, रेड्डी, उत्तर रायगड जिल्हा चिटणीस गीता चौधरी, खारघर मंडल महिला मोर्चा अध्यक्ष वनिता पाटील, बिना गोगरी, साधना पवार, मोना अडवाणी, निशा सिंग, साम्या पावसकर, चांदणी अवघडे, राजश्री नायडू, अनिल बोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आम्ही दिलेल्या पत्रांची लेखी उत्तरे आम्हाला मिळत नसून शहरातील प्रलंबित कामे कधी पूर्ण होतील याबाबत या वेळी भाजप शिष्टमंडळाकडून सिडको अधिकार्यांना विचारणा करण्यात आली. मागील अनेक महिन्यांपासून रखडलेल्या कोपरा पुलाबाबतदेखील सिडकोचे उदासीन धोरण पहावयास मिळत आहे. नवी मुंबई महापालिकेची जलवाहिनी येथील पुलाला अडथळा ठरत आहे. ती हलविण्यासाठी सिडको नवी मुंबई महापालिकेला प्रस्तावदेखील पाठवत नसल्याचा आरोप करण्यात आला. शहरातील मोठ्या संख्येने कामे सिडकोच्या मार्फत हस्तांतरणाचे कारण दाखवून करण्यास टाळाटाळ केली जात असल्याकडेही लक्ष वेधण्यात आले. लेखी आश्वासन दिल्याशिवाय ठिय्या आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली.
दरम्यान, खारघर पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचार्यांनी सिडको कार्यालय गाठत घटनेचा माहिती घेतली. अखेर भाजपचा आक्रमक पवित्रा पाहून सिडकोचे अधिकारी संजय पुदाळे यांनी महामंडळामार्फत सुरू असलेल्या कामांची माहिती पत्रकाद्वाराने भाजप शिष्टमंडळाला दिली, तसेच आगामी काळात नव्याने उर्वरित कामेदेखील पूर्ण केली जातील, असे लेखी आश्वासन आंदोलनकर्त्यांना दिल्यावर सुमारे पाच तासानंतर भाजप शिष्टमंडळाने ठिय्या आंदोलन मागे घेतले.
RamPrahar – The Panvel Daily Paper