नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारताविरुद्ध बुधवारी (दि. 13) खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात उस्मान ख्वाजाने शतकी (100) खेळी केली. त्याला पीटर हँड्सकॉम्बने अर्धशतक (52) करून चांगली साथ दिली. या दोघांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 273 धावा केल्या.
नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 43 चेंडूंत 27 धावा करणार्या कर्णधार फिंचला लवकर माघारी परतावे लागले. रवींद्र जडेजाने त्याला त्रिफळाचित केले. त्याने खेळीत चार चौकार लगावले. यानंतर ख्वाजाने आपला फॉर्म कायम राखत शतक ठोकले. 10 चौकार आणि 2 षटकार फटकावून आपले मालिकेतील दुसरे शतक झळकावणारा उस्मान ख्वाजा त्यानंतर लगेचच बाद झाला. त्याने 100 धावा केल्या. ख्वाजापाठोपाठ स्फोटक खेळीसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेल या सामन्यात लवकर बाद झाला. त्याने केवळ 1 धाव काढली. त्यालाही जडेजाने झेलबाद केले. गेल्या सामन्यात शतक झळकावलेल्या पीटर हँड्सकॉम्बने लय कायम ठेवत संयमी अर्धशतक केले. त्याने 55 चेंडूंत 50 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार खेचले. अर्धशतक ठोकल्यावर लगेच तो बाद झाला आणि ऑस्ट्रेलियाला चौथा धक्का बसला. त्याने 60 चेंडूंत 52 धावा केल्या. गेल्या सामन्यात धमाकेदार 84 धावांची नाबाद खेळी करणारा धोकादायक अॅस्टन टर्नर स्वस्तात झेलबाद झाला. याबरोबरच ऑस्ट्रेलियाचा निम्मा संघ तंबूत परतला. त्याने 20 धावा केल्या. स्टॉयनिस (20), कॅरी (3), कमिन्स (15) हे फलंदाजदेखील झटपट बाद झाले, पण तळाच्या फळातील झाय रिचर्डसन याने 21 चेंडूंत 29 धावा करून ऑस्ट्रेलियाला 272 धावांपर्यंत मजल मारून दिली.
भारताकडून भुवनेश्वर कुमारने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मोहम्मद शमी आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी दोन विकेट मिळाल्या; तर कुलदीप यादवला एक विकेट घेण्यात यश आले.