
पनवेल ः रामप्रहर वृत्त
मुंबई, पुणे, ठाणे परिसरात कोरोनाचे रुग्ण आढळले असून संसर्ग टाळण्यासाठी भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून खबरदारीचा उपाय म्हणून एकवीरा देवीची यात्रा रद्द करण्यात आली आहे. एकवीरा देवस्थान कार्ला येथील प्रशासकीय समितीने यात्रा न भरवण्याचा निर्णय घेतला असून भाविकांनी गडावर येऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. एकवीरा देवस्थान हे पुणे जिल्ह्यातील वेहेरगावात असून, येथे चैत्री यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात, परंतु पुण्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने येथे आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू करत सर्व सार्वजनिक कार्यक्रम, शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर वडगाव मावळ येथे प्रशासकीय समितीचे अध्यक्ष व वडगाव मावळ येथील दिवाणी न्यायालयाचे न्यायाधीश, सचिव व मावळचे तहसीलदार व सदस्यांसह धर्मादाय आयुक्तांनी भाविक व वेहेरगाव ग्रामस्थांची बैठक घेत हा निर्णय जाहीर केला. दरम्यान, यात्राकाळात तसेच दैनंदिन काळात देवीचे सर्व धार्मिक विधी, पूजापाठ परंपरेनुसार केले जाणार आहेत. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आला नसल्याचे प्रशासकीय समितीने स्पष्ट केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper